कोल्हापूर : प्रतिनिधी : शास्त्रीनगर मैदानावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ झाला. सांगली विभाग आणि रायगड विभागाने प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजयी सलामी दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कामगार कल्याण समिती, कोल्हापूर विभागाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शास्त्रीनगर मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात ठाणे विभागाने नाणेफेक जिंकून सांगली विभागास फलंदाजीस पाचारण केले. सांगली विभागाने २० षटकात सर्व गडी बाद १११ धावा केल्या. त्यामध्ये शितल कुंभार याने २२ धावा, विनायक कोळीने १६ धावा अविनाश तुपेने १३ धावा केल्या. ठाणे विभागातर्फे गोलंदाजीत संदेश उरणकर व भरत साळवे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले तर संजय ठोकळे याने दोन बळी घेतले.
उत्तरार्धात ठाणे विभागाचा डाव १८.५ षटकात ९४ धावावर आटोपला. ठाणे विभागातर्फे योगेश पाटीलने २२ धावा तर मनोज टोणपेने १७, योगेश आरेकरने १६ धावा केल्या. सांगली विभागातर्फे गोलंदाजीत दीपक पाटील याने १६ धावा तीन तर अविनाश तुपेने १७ धावात दोन बळी घेतले. सांगली विभागाने ठाणे विभागावर १७ धावांनी मात केली. सांगलीचा कर्णधार दीपक पाटील सामनावीर ठरला.
दुपारच्या सत्रातील सामना रायगड विभाग विरुद्ध लातूर विभाग यांच्यात होऊन रायगड विभागाने हा सामना १०९ धावांनी जिंकला. रायगड संघाकडून फलंदाजी करताना ऋषिकेश अडसुळेने ३४ धावा सतीश देशमुख यांनी २५ हरेश्वर पाटीलने १६ धावा तर अतुल म्हात्रेने १९ धावा केल्या. लातूर विभागातर्फे गोलंदाजीत सत्यवान म्हेत्रे आणि अरुण कांबळे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर अमोल पोळ व रफिक शेख यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
उत्तरार्धात लातूर विभागाचा डाव १२.३ शतकात अवघ्या ४३ धावात आटोपला. त्यांच्या अनिल मरेवाड यांनी एकाकी झुंज देत १९ धावा केल्या. रायगड विभागाकडून गोलंदाजीत संकेत वेताळ यांनी तीन तर स्वप्निल पवार राजेंद्र गुरव आणि सतीश देशमुख यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. रायगड संघाचा कर्णधार सतीश देशमुख सामनावीर ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन मध्यवर्ती कार्यालय मुंबईचे मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर, कोल्हापूर विभाग नियंत्रक शिवराज जाधव, यंत्र अभियंता (चालन) यशवंत कानतोडे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, कामगार अधिकारी संदीप भोसले, विभागीय सांख्यिकी अधिकारी अनिल पार्टे, विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, दीपक घारगे उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन बाळासाहेब माने, आकाश सूर्यवंशी, युवराज जाधव, संदेश मराठे, प्रभुदास सोनुले, ओंकार पाटील, दिगंबर कांबळे, तेजस विचारे, सचिन मलके यांनी केले.
मंगळवार सामने असे
१. मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी विरुद्ध मध्यवर्ती कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर सकाळी ठीक नऊ वाजता.
२. सोलापूर विरुद्ध जालना विभाग दुपारी ठीक दीड वाजता.