-विजय चोरमारे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी मुंब्रा- कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रतोदपदी तासगाव- कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रोहित आर. आर. पाटील आणि प्रतोद म्हणून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जाणकर यांची निवड झाली. पक्षाच्या अवघ्या दहा जागा निवडून आल्या असतानाही शरद पवार यांनी निवडी करताना सामाजिक समीकरणांचे भान ठेवलेले दिसते. गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून ओबीसी चेहरा पुढे केला आहे, रोहित आर. पाटील यांच्या निमित्ताने तरुण पिढीकडे जबाबदारी सोपवली आहे, तर जानकर यांच्या माध्यमातून धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. गटनेतेपदी निवड झालेल्या जितेंद्र आव्हाड यांची आता खरी कसोटी लागणार असून त्यांना राजकीय आखाड्यात थेट उतरून संघर्ष करावा लागणार आहे.
युवकांमध्ये लोकप्रिय नेतृत्व
राजकीय पक्षाच्या पलीकडं जाऊन राज्यभरातील पुरोगामी विचारधारेच्या युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा समावेश होतो. आव्हाड यांनी दीर्घकाळ भूमिकेतील हे सातत्य टिकवल्यामुळे आजच्या सोशल मीडियाच्या प्रभावाच्या काळात पुरोगामी विचारधारेच्या युवकांना ते आपले नेते वाटतात. विरोधी पक्षात असताना भूमिका घेऊन लढण्यासाठीची सज्जता स्वाभाविक असते, परंतु सत्तेत आल्यानंतर अनेकांचा असा जोश कमी होत असतो. आव्हाड त्याला अपवाद ठरलेले नेते आहेत. सत्तेत येऊन प्रस्थापित झाल्यानंतरही त्यांनी आपल्यातील कार्यकर्त्याचा पिंड जपला. दहीहंडी उत्सव साजरा करणारा ठाण्यातील नेता ते पुरोगामी विचारधारेचा राज्यातील तरुणांचा आवडता नेता हा त्यांचा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र ठरणारा असला तरी त्यांची यापुढची जबाबदारी आव्हानात्मक असून तिथे त्यांची खरी परीक्षा होणार आहे.
शरद पवार यांचा युवा अनुयायी म्हणून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास त्यांना आज जिथवर घेऊन आला आहे, त्यामागं त्यांचं पुरोगामी राजकारणातलं सातत्य आणि शरद पवार यांच्यावरील निष्ठा हे दोन घटक कारणीभूत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला, तेव्हा राज्यभरातील शिवप्रेमींनी त्याविरोधात आवाज उठवला. त्यावेळी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासारख्या विचारवंतांपासून ते अनेक पुरोगामी नेत्या-कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसन्मान परिषदांचं आयोजन करण्यात आव्हाड यांचा पुढाकार होता. एकाचवेळी पुरंदरेसमर्थक मंडळी, प्रसारमाध्यमे आणि राज्यसरकार यांच्याविरोधात संघर्ष करण्याची ही भूमिका कुणाही राजकीय कार्यकर्त्यासाठी जोखमीची होती, परंतु राजकीय नफा-नुकसानीचा विचार न करता आव्हाडांनी त्याविरोधात रान उठवले होते.
पुरोगामी भूमिकेसाठी संघर्ष
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ठाण्यात एकदा धार्मिक तणावाची मोठी घटना घडली होती. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमध्ये दोन समूहांमध्ये संघर्ष उफाळला होता. प्रचंड पोलिस फौजफाटा गोळा झाला होता आणि परिसराची नाकेबंदी केली होती. अशा परिस्थितीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित ठिकाणी जाऊन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आव्हाडांनी केल्याचे आठवते. तणावग्रस्त परिसरात जाणे धोक्याचे आहे, असे पोलिस सांगत असतानाही आव्हाड तिथं गेले, लोकांशी चर्चा केली, शांततेचं आवाहन करून परत आले होते. तणाव निर्माण करणारे किंवा तणाव निर्माण झाल्यावर आगीत तेल ओतणारे अनेक नेते असतात परंतु तणावग्रस्त परिसरात स्वतः जाण्याची जोखीम आव्हाडांनी तेव्हा घेतली होती. नंतरच्या काळातही सातत्यानं ते अशा प्रकारची जोखीम घेत आले आहेत.
ठाण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले, त्यावेळची घटना आहे. संमेलनानिमित्त जी स्मरणिका काढली होता, त्यामध्ये नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणारा मजकूर होता. संबंधित लेखिकेनं त्यात `पंडित नथुराम गोडसे` यांच्या कार्याचं गुणवर्णन केलं होतं. संमेलनाचा उदघाटन समारंभ संपता संपताच ही बाब कुणाच्यातरी लक्षात आली आणि अचानक टीव्हीवर त्यासंदर्भातील बातम्या सुरू झाल्या. त्यादिवशी दुपारी जितेंद्र संमेलनाच्या मंडपात आले. आव्हाड आलेत म्हटल्यावर काही लोक भोवतीने जमले. काही लोक जमले म्हटल्यावर आणखी काही लोक आले आणि थोडी गर्दी झाली. तिथं आव्हाडांनी स्मरणिकेची होळी केली आणि छोटंसं भाषण करून ते आले तसे निघून गेले. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख आश्रयाखाली होणाऱ्या संमेलनात एकट्यानं येऊन अशा रितीनं निषेध नोंदवणं मोठं धाडसाचं काम होतं. या घटनेचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे आणि त्यामुळं अस्वस्थ झालेले एकनाथ शिंदेही सायंकाळी पाहायला मिळाले.
शिवसेना-भाजप युतीचं सरकार जाऊन काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी सुरुवातीच्या काळात नारायण राणे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी एकदा आमदारांसह विधानभवनाच्या दारातच धरणे देऊन सत्ताधा-यांना विधानभवनात जाण्यापासून रोखलं होतं. त्यावेळीही ठाण्याहून जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते आल्यानंतर आंदोलकांना तुडवत सत्ताधारी लोक विधानभवनात शिरले होते.
पवारांवरील वार झेलणारा शिलेदार
शरद पवार हे सातत्याने काँग्रेससह विरोधकांच्या निशाण्यावर असत. पवारांच्यावर अनेक हल्ले झाले. पवारांच्यावरील टीकेचे उत्तर देण्यासाठी पक्षातील अन्य लाभार्थी नेते पुढे येत नव्हते. अशा काळात पवारांवरील वार झेलणारी आणि संबंधितांना प्रत्त्युत्तर देणारी जी दोन माणसं होती, त्यापैकी एक होते आर. आर. पाटील आणि दुसरे जितेंद्र आव्हाड. देवेंद्र फडणवीसांचं सरकार सत्तेवर असतानाही आव्हाडांचा सातत्यानं संघर्ष सुरू असायचा, तो प्रामुख्यानं सामाजिक पातळीवर. सामाजिक पातळीवर भूमिका घेऊन कोणत्याही विषयाला थेट भिडणं, हे आव्हाडांचं इतर राजकीय नेत्यांहून वेगळेपण आहे. अशा भूमिका घेणं राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांनाही गैरसोयीचं असतं. अशा भूमिका प्रत्येकवेळी पॉलिटिकली करेक्ट असतात असं नव्हे, परंतु त्याचा विचार न करता आव्हाड वेळोवेळी त्या घेत आले आहेत. मंत्रिपदावर आल्यानंतरही त्यांच्या वृत्तीत फरक पडलेला दिसला नाही.
टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या निवासासाठी व्यवस्था करणे असो किंवा दरडीखाली गाडलेल्या महाड तालुक्यातील तळिये गावाच्या पुनर्वसनाच्या निमित्ताने त्यांची संवेदनशीलताही दिसून आली.
आव्हाडांच्यासंदर्भात अशा अनेक गोष्टी सांगता येत असल्या तरी त्यांनी आजवर थेट मैदानात उतरून राजकीय लढाई केलेली नाही, ही बाबही लक्षात घ्यावी लागते. संभाजी भिडे, बाबासाहेब पुरंदरे किंवा तत्सम लोकांच्या विरोधात भूमिका घेऊन संघर्ष केला. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे संगनमताचे राजकारण सर्वज्ञात होते, परंतु एका प्रकरणात शिंदे यांनी त्यांच्यावर अन्याय करणारी भूमिका घेतल्यामुळे त्यांनी शिंदे यांच्याविरोधात उघड संघर्ष पुकारला. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी मात्र त्यांनी अद्याप दोन हात करणे टाळले आहे. आता विधानसभेत पक्षाचे गटनेते म्हणून काम करताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याशी संघर्ष करावा लागेल. फडणवीस यांच्याशी संघर्ष करणारांची काय अवस्था होते, हे नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय राऊत यांच्या उदाहरणावरून दिसून येते. तेवढी जोखीम घेऊन राजकीय संघर्ष करावा लागेल, तेच आव्हान आव्हाड यांच्यासमोर आहे.