दुबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती. ३६ व्या वर्षी निवडून आलेले ते सर्वांत तरुण आयसीसी अध्यक्ष आहेत. ‘आयसीसी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असून आयसीसीचे संचालक आणि सदस्य यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी ऋणी आहे,’ असे शहा म्हणाले. आयसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव असण्याबरोबरच जय शहा हे आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदावरही आहेत. २०२५ च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये नियोजित असणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या यजमानपदावर तोडगा काढणे, हे अध्यक्ष म्हणून शहा यांच्यासमोरील पहिले आव्हान असेल.
I am deeply honoured to begin my role as ICC Chair today. Cricket is a sport that unites millions across the globe, and this is a moment of immense responsibility and opportunity.
— Jay Shah (@JayShah) December 1, 2024