न्यूयॉर्क: `रॉकस्टार’ फेम अभिनेत्री नरगिस फखरी (Nargis Fakhri) हिची बहिण, आलिया फखरी हिला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर माजी बॉयफ्रेंड आणि त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळण्याचा आरोप आहे. (Aliya Fakhri)
नेमके काय घडले?
नरगिस फखरीची बहिण आलिया आणि एडवर्ड जेकब एक वर्षापूर्वीपर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. एडवर्डच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, दोघे एक वर्षापूर्वी वेगळे झाले होते. मात्र, आलियाला हा ब्रेकअप मान्य नव्हता. त्यामुळे तिला बदला घेण्याच्या भावनेने पछाडले होते. त्यातूनच तिने हा अघोरी प्रकार केल्याचे सांगण्यात येते. आलियावर दोन मजली गॅरेजला आग लावल्याचा आरोप आहे. त्या गॅरेजमध्ये तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर एडवर्ड आणि त्याची ३३ वर्षीय मैत्रीण अनास्तासिया एटियेन होते. गॅरेजला लागलेल्या आगीत दोघांचाही जळून मृत्यू झाला. ‘डेली न्यूज’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, दोघांचा मृत्यू थर्मल इंज्युरीमुळे झाला. आलिया फखरीच्या आईने आपल्या मुलीवरील आरोप फेटाळले आहेत. “माझी मुलगी कोणाचीही हत्या करू शकत नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.
एडवर्ड जेकब्स आणि अनास्तासिया एटियेन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आलियामुळे लागलेल्या आगीतून निर्माण झालेल्या धुरामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप आलियावर ठेवण्यात आला आहे. आलियावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला असून दोषी ठरली तर तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. नऊ डिसेंबरला तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नरगिसचे स्पष्टीकरण..
बहीण आलिया फखरीच्या या प्रकरणावर नरगिसकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वीस वर्षांपासून दोन्ही बहिणी एकमेकींच्या संपर्कात नाहीत. (Aliya Fakhri)
न्यूयॉर्कच्या क्वीन्समध्ये हा प्रकार घडला. क्वीन्सच्या जिल्हा अटर्नी मेलिंडा कॅट्झ यांच्या मते, आलिया फखरीने दोन मजली गॅरेजला आग लावली. तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर एडवर्ड जेकब आणि त्याची मैत्रीण अनास्तासिया एटियेन तिथे झोपले होते. आग लागल्याचे कळल्यानंतर आधी एटियेन खाली पळाली, पण जेकबला जागे करण्यासाठी परत वर गेली. त्यावेळी आग संपूर्ण इमारतीत पसरली होती आणि त्यातून दोघेही अडकून पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
नरगिस आणि आलियाचे बालपण
आलिया फखरी ही नरगीस फखरीची छोटी बहीण असून तिचे पालनपोषण न्यूयॉर्कच्या क्वीन्समध्ये वडिल मोहम्मद फखरी आणि आई मेरी फखरी यांनी केले. तिचे वडिल पाकिस्तानी आणि आई चेक नागरिक होती. दोन्ही बहिणींनी बालपणी अनेक उलथापालथी पाहिल्या. लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. काही वर्षांनी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. नरगीस चित्रपटांच्या माध्यमातून लोकप्रिय बनली, मात्र आलिया प्रसिद्धीपासून दूर राहिली.
प्लंबर आणि तीन मुलांचा बाप
व्यवसायाने प्लंबर असलेला आलियाचा माजी प्रियकर एडवर्ड तीन मुलांचा बाप होता. दोघांनीही एक वर्षांपूर्वी नाते तोडले होते. परंतु त्यानंतरही आलियाने त्याचा पिच्छा सोडला नव्हता. एडवर्डने वारंवार नकार दिल्यानंतर संतापाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा :