विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जाहीर प्रचाराला बंदी असली तरी गाठीभेटी सुरू असतात आणि अंतिम टप्प्यातील जोडण्या लावल्या जात असतात. सरळ सरळ हा काळ म्हणजे आर्थिक गणितांच्या आधारे मतांची फिरवाफिरवी करण्याचा असतो. प्रत्येक मतदारसंघात पैशाचे वाटप याच दिवशी होत असते, हे उघड गुपित आहे. निवडणुका निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात घेण्याच्या बाता मारणा-या निवडणूक आयोगालाही त्याची पुरेपूर कल्पना असते. त्यामुळे कारवायांची खोटी खोटी नाटके केली जातात. एकीकडून करोडो रुपयांची वाहतूक केली जात असताना कुठेतरी लाखांच्या पटीतली छोटी रक्कम पकडून आपली कार्यरतत्परता दाखवली जाते. त्यातून कधीतरी मोठा मासा किंवा मोठी रक्कम हाती लागते, नाही असे नाही. परंतु ते अपघाताने जुळून येत असते. जसे नाशिकच्या हॉटेलमध्ये सोमवारी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवाराशी संबंधित काही कोटी रुपयांचे घबाड सापडले. खरेतर निवडणूक यंत्रणेला आपण कोणावर कारवाई करायला जातोय, याची माहिती असती तर त्यांनी ती कारवाई केलीच नसती किंवा संबंधितांना आधीच टिप देऊन सावध केले असते. मंगळवारी विरारमध्ये घडलेले नाट्य मात्र विधानसभा निवडणुकीतील नाट्यमय घटनांचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. एखाद्या सिनेमाचा क्लायमॅक्स वाटावा, अशा प्रकारचा प्रसंग देशवासीयांना पाहावयास मिळाला. विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडे आणि नालासोपारामधील भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना सुमारे चार तास घेराव घातला. आपण पैसे वाटण्यासाठी नव्हे, तर उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेसंदर्भात कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यासाठी आलो होतो, असा खुलासा तावडे यांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आणि निवडणूक यंत्रणेने तपास करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही तावडे यांनी केली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्यासह संयुक्तपणे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी तावडे यांनी दर्शवली होती, परंतु निवडणूक आयोगाने अशा प्रकारे पत्रकार परिषद घेण्यास विरोध दर्शवल्यामुळे तो बेत रद्द झाला. परंतु एकूणच विरार आणि विनोद तावडे प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले. मतदानाच्या आदला दिवस हा तसा बातम्यांच्यादृष्टिने भाकड दिवस असतो. परंतु या प्रकरणामुळे वृत्तवाहिन्यांचा दिवस साजरा झाला आणि महाराष्ट्रासह देशातील जनतेचेही मनोरंजन झाले.
एवढी मोठी घटना घडल्यानंतर विरोधकांनी त्याचा लाभ उठवणे स्वाभाविक होते. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या घटनेचा समाचार घेतला. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा हा `नोट जिहाद` असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. दौ-यादरम्यान वारंवार बॅगा तपासल्याचा रागही ठाकरे यांनी व्यक्त केला असून आमच्या बॅगा तपासणारा निवडणूक आयोग भाजपचे लोक कोट्यवधी रुपये वाटप करताना कुठे असतात, असा प्रश्नही उपस्थित केला. या सगळ्या प्रकारानंतर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत राजकारणाचीही चर्चा सुरू झाली आहे. विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आले असल्याची माहिती आपल्याला भाजपच्या नेत्यानेच दिली असल्याचे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही त्याकडे निर्देश केला असून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदींचे पंख कापण्यात आले. तावडे यांना तर विधानसभेला उमेदवारीही नाकारण्यात आली होती. पुढे त्यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आणि ते ती उत्तम रितीने पार पाडत होते त्यामुळे अमित शाह यांचे विश्वासू बनले होते. साहजिकच भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा माध्यमांतून सुरू झाली होती. राष्ट्रीय नेते असल्यामुळे आपल्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही, असा तावडे यांचा समज असावा, त्यांचा तो समज यानिमित्ताने फोल ठरला. राजकीय आयुष्यात त्यांचा दुस-यांदा गेम झाला आहे. स्वपक्षीयांकडूनच त्यांचा दुस-यांदा करेक्ट कार्यक्रम झाला आहे!