कोल्हापूर; प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा पहिला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार नामवंत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुथाडिया यांना जाहीर झाला आहे. रोख रुपये २१ हजार आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या वर्षीपासून परिषदेच्यावतीने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ४ ऑक्टोबर रोजी परिषदेचे विश्वस्त आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. परिषदेचे १०० वे नाट्यसंमेलन आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त कोल्हापूर शाखेच्या वतीने हा महोत्सव होत आहे. त्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात उद्योग मंत्री व नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होईल. पालकमंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षतेखाली आणि आ. सतेज पाटील प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी दि.५ ऑक्टोबर रोजी नाट्य कलेचा जागर हा विशेष कार्यक्रम आणि सायंकाळी पाच वाजता ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
रविवारी, दि.६ रोजी सायंकाळी चार वाजता महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी डॉ. वासुदेव देशिंगकर संकलित आणि संशोधित ‘मराठी रंगभूमीचे प्रतिभावंत नाटककार’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी कला क्षेत्रात उलेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यासागर अध्यापक, मयूर कुलकर्णी, सागर बगाडे, मंजुश्री गोखले आणि ऑलिंपिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचा सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर अभिराम भडकमकर लिखित आणि ऋषिकेश जोशी दिग्दर्शित ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी मोफत प्रवेशिका उपलब्घ करून देण्यात आल्या आहेत.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, नाट्य परिषदेचे कार्यवाह गिरीश महाजन, श्रीकांत जोशी, शिवकुमार हिरेमठ, प्रा. शशिकांत चौधरी, श्रीमती हेमसुवर्णा मिरजकर, आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
महोत्सवात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम
- शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर, दुपारी ३.३० वा. : महोत्सवाचे उदघाटन आणि संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा. त्यानंतर ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रम : सादरकर्ते : संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी
- शनिवार, दि. ५ ऑक्टोबर, सकाळी ११ वा. नाट्यकलेचा जागर : सादरकर्ते : नाट्य परिषद, मुंबई. सायं. ५ वा. अमेरिकन अल्बम (मराठी नाटक)
- रविवार दि. ६ ऑक्टोबर, दुपारी ४.३० वाजता समारोप आणि ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’चे सादरीकरण.