कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा करावा, या मागणीसाठी मी तेलंगणाचे अधिवेशन सोडून कोल्हापूरला आलो आहे. नामविस्ताराची मागणी एका महिन्याच्या आत पूर्ण करावी. आम्हाला विधानसभेवर मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमची मागणी नक्की पूर्ण करतील अशी आम्हाला आशा आहे. आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही नामविस्ताराचा फलक विद्यापीठाच्या इमारतीवर लावू, असा इशारा तेलंगणाचे भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी दिला. (T.Rajasingh)
शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ,’ असा करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने सोमवारी (१७ मार्च) कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी राजासिंह बोलत होते. दसरा चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. तिथून आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला. मोर्चात शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले. मोर्चाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (T.Rajasingh)
निवेदनात म्हटले आहे की, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेवेळी कारणे ग्राह्य धरता येणार नाहीत. छत्रपती ही फक्त राजा म्हणून पदवी नव्हे तर हिंदवी स्वराज्य संस्थापक, लोककल्याणकारी शासक, स्वराज्याचे संरक्षक याचे प्रतीक असून त्यांच्या नावाचा संपूर्ण उल्लेखच केला तर योग्य सन्मान होईल. (T.Rajasingh)
यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सुनील घनवट, सनातन संस्थेचे अभय वर्तक, शिवसेनेचे सत्यजित कदम आदींची भाषणे झाली. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक स्वाती खाड्ये, प्राणलिंग स्वामी, रविकिरण इंगवले, उदय भोसले, अनिरुद्ध कोल्हापुरे, किशोर घाटगे, शिवानंद स्वामी, राजू यादव, गजानन तोडकर, आशिष लोखंडे, रुपाराणी निकम, सुरेश यादव, यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर विविध सरदार घराण्यांचे वंशज उपस्थित होते.
हेही वाचा :
एकेरी उल्लेख नको; शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करा
गोडसेचा गौरव करणाऱ्याला बढती कशी मिळते?
सपकाळांकडून भाजपला ‘हे’ प्रत्युत्तर