सतीश ज्ञानदेव राऊत
“साहेब मोठे आहेत पण मी साहेबांपेक्षा मोठा आहे !” असे खुदकन हसत विनम्र कोटी करणाऱ्या धुवाळी साहेबांचे निधन झाले. साहेबांपेक्षा वयाने मोठे असणारे धुवाळीकाका अखेरपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या प्रेमापोटी त्यांच्यासोबत काम करत होते. (T. N. Dhuvali)
जे साहेबांना ओळखतात त्या बहुतेक सर्वांना ‘टी. एन. धुवाळी’ हे नाव चिरपरिचित आहेत. माझी साहेबांकडे वर्णी लागली तेव्हा मुंबईतील एका मित्राने सांगितले. “सतीश , तुम साहब के पास जा रहें हो, वहाँ एक बुढेसे, पतले से आदमी हैं ‘धुवाली साब’ ! उनसे अच्छे संबंध बना के रखना ! साहब के वो बहूत पुराने भरोसेमंद आदमी हैं.”
पहिली भेट
१३ जून ,२००९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे धुवाळी साहेबांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा मनात अनेक विचार घोळत होते. ‘इतकी महत्वाची व्यक्ती कशी दिसत असेल ? कशी वागत असेल? मी त्यांना भेटून काय बोलू? ते माझी विचारपूस तरी करतील ना !” असे नाना विचार सोबत घेऊन मी पाचवा मजला लिफ्टने चढून अगदी समोर असलेल्या लहानशा केबिनच्या बाहेर थांबलो.
एका-दोघांची गर्दी कमी झाली की, मी खाली मान घालून कागदावर काहीतरी लिहित असलेल्या धुवाळी साहेबांना ‘नमस्ते’ म्हटले. त्यांनी वर पाहताच ‘’’सर, मी सतीश ज्ञानदेव राऊत, साहेबांकडे अतिरिक्त खाजगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्याने आपल्याला भेटायला आलोय !” हे ऐकल्यावर क्षणात आगंतुकाकडे पाहणाऱ्या चेहऱ्यावर गोड हसू आले. साहेबांच्या परिवारात नवीन पाहुणा आल्याने ते आनंदले; लगेच खुर्चीवर बसायला सांगितले; विचारपूस केली. मला त्यांच्या मनात ओतप्रोत आपुलकी साठलेली जाणवली आणि त्यांच्या मधुर हास्यातून ती दिसत होती. मनात घोळत असलेले विचार कधीच ओघळून गेले होते.
पहिल्याच भेटीत मनाचे आणि वयाचे अंतर पार करून आम्हा परस्परांत मैत्री झाली. मैत्रीला वय नसतं, जातपातीचा रंग नसतो. भेदातीत नातं म्हणजे मैत्री. ‘शेअर आणि केअर’ करावंसं जेथे वाटतं त्या स्थानाला मैत्री म्हणतात. आणि त्यातूनही पोक्त, वयस्क माणसाची मैत्री सर्वात चांगली. खूप काही शिकता येतं त्यांच्या अनुभवातून ! खूप आधार वाटतो अशा मित्रांचा ! धुवाळी साहेब अशा मैत्रीची मिसाल आहेत. (T. N. Dhuvali)
आठवणींचा खजिना रिताच…
मला त्यांच्याकडून साहेबांबद्दलचे अनुभव ऐकण्याचे खूप कुतूहल असे. मी कोणतीही चर्चा निघाली तरी फिरून-फिरून ती साहेबांच्या विषयाकडे वळवायचो. धुवाळीकाकांनी साहेबांची सेवा अगदी लीनतेने केली. पण त्यांना साहेबांच्या चार-पाच सोडल्या तर फारशा आठवणी शब्दांत सांगता येत नाही. याचे मला नेहमी आश्चर्य वाटते. एक प्रसंग मात्र त्यांच्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेला आहे. एकदा प्रचंड प्रवास झाला. साहेबांचा कॉन्व्हॉय एका तालुक्याच्या ठिकाणी विश्रामगृहावर अगदी पहाटेच्या वेळी पोहोचला.
सगळे रात्रभराच्या प्रवासाने थकून गेले असतील या जाणिवेने साहेबांनी गाडीतून उतरताच ‘धुवाळी पीए आणि गामा यांना रूम उघडून द्या; ते जोपर्यंत उठणार नाहीत तेवढा वेळ झोपू द्या. मी उठलो तरी त्यांना उठवू नका’ अशी सूचना साहेबांनी विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याला दिली. हा प्रसंग ते पुन्हा पुन्हा सांगतात. आपण राऊतांना हा प्रसंग किमान दहा वेळा सांगितला असावा हे मात्र ते विसरतात. एका प्रसंगाने त्यांच्यावर कृतज्ञतेचे किती दीर्घ संस्कार केले हे मात्र त्यातून दिसून येते.
धुवाळीकाका साहेबांच्या १९७२ ते आजपर्यंतच्या प्रदीर्घ ऐतिहासिक कारकीर्दीचे साक्षीदार आहेत. त्यांनी माणसे जपली पण आठवणी जपून ठेवल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या शब्दात जरी लिहून ठेवल्या असत्या तर त्यावर भाषेचे साज- अलंकार मी चढवले असते. इतिहासाचा एक दस्तावेज तयार झाला असता.(T. N. Dhuvali)
फोनबरोबर माणसेही जोडली
आम्हाला काही समस्या आली, अडचण आली की, निराकरणाचा मार्ग धुवाळी- वहिनी ( साहेबांच्या सौ.) – साहेब असा जात असे. पहिल्या दोन टप्प्यांतच अडचणीतून मार्ग निघालेला असे. साहेब सगळ्यांचा आधारवड आहेत पण ह्या वटवृक्षाच्या सावलीत पांथस्थाला आश्वस्त करणारे धुवाळी साहेब आहेत. साहेबांच्या प्रदीर्घ सहवासात धुवाळीकाकांच्या प्रचंड ओळखी झाल्या. आजकाल त्याला ‘पी.आर. वाढला, एक्पोजर मिळाले’ असे म्हणतो. साहेबांना फोन जोडून देताना त्यांनी माणसे देखील जोडली. अगदी मुख्य सचिवांपासून गावातील एखाद्या संस्थेच्या सचिवांपर्यंत माणसे ते जोडत गेले. मोठ्या व्यक्तीबरोबर काम करताना नवनव्या, मोठमोठ्या ओळखी होतात. पण त्या ओळखींचे वैयक्तिक मैत्रीत रूपांतर होतेच असे नाही.
धुवाळी साहेबांची मात्र वैयक्तिक मैत्री बड्या सनदी अधिकाऱ्यांपासून ते सामान्य वर्गातील माणसांपर्यंत झाली. ‘क्वीड-प्रो-क्यू’ अशी मैत्री प्रयोजन परत्वे असते; ती फार काळ टिकत नाही. निगर्वी आणि निस्वार्थी मैत्री चिरंतन टिकते. धुवाळीकाकांमध्ये हे गुण ओतप्रोत भरलेले आहेत. ओळखीच्या श्रृंखलेत ते आपल्यालाही गुंफून घेतात. त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना अजिबात नसते. केवळ निस्वार्थी, निरपेक्ष आणि निखळ मनाची व्यक्तीच असे करु शकते. इतक्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी जमवलेला मैत्रीचा ठेवा असा एकदम दुसऱ्याच्या हाती देण्यात मोठी दानत लागते. काही जणांनी त्यांच्या ह्या प्रांजळपणाचा गैरफायदा घेतला, केलेल्या मदतीची जाणीव ठेवली नाही. पण धुवाळी साहेब प्रचंड क्षमाशील आहेत. अशी व्यक्ती समोर आली की, त्यांच्या मनातील खंत विसरून ते निर्भेळपणे संवाद साधतात; पुन्हा त्याला मदत करतात; टाकून बोलत नाहीत तर त्याच्यासाठी शब्द टाकतात.
जमिनीवर पाय
धुवाळी साहेबांकडून खूप काही शिकलो. सतत सत्तेच्या तारामंडळात असताना जमिनीवर पाय असलेला पितृतुल्य माणूस म्हणजे धुवाळी. तब्येतीच्या बाबतीत ते अतिशय जागरूक असतात. संध्याकाळी चालण्याचा व्यायाम कधीही चुकवत नाहीत. आम्हाला न सापडणारा मोबाईल नंबर त्यांच्याकडे सापडतो. त्यांना मेसेज करा, तात्काळ रिप्लाय येतो. फेसबुक-वॉट्स अपवर ते कमालीचे क्रियाशील असत. धुवाळी साहेबांचा दोन मुलांचा परिवार आहे. नातवंडे त्यांच्यावर भरभरून प्रेम करत. त्यांच्या मोबाईलमधील फोटो पाहिले तरी आपल्याला त्यांच्या घरात भरून वाहणारे वात्सल्य नजरेस पडे. (T. N. Dhuvali)
मनाने जोडलेला प्रचंड मित्रसंग्रह त्यात दिसतो. धुवाळी साहेबांना फिरायला फारसे आवडत नसे. त्यांचे वीकएंड डिस्टीनेश म्हणजे लोणावळा ! लोणावळ्याचा घाट उतरून पलिकडे पुण्याला ते खचितच गेले असतील. परदेशी जाण्याचं तर नाव देखील घेतले नाही. माझ्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला मात्र न चुकता आले होते. असे प्रेमाचे नाते आहे आमच्यात ! माझ्या चांगल्या-वाईट दिवसांत ते सतत माझ्या सोबत राहिले आहेत.
मायेचा उबदार स्पर्श
कृतज्ञतेने कंठ दाटून आणणारा एक प्रसंग सांगतो. एका ख्रिसमसच्या रात्री ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये माझ्या आईची तब्येत गंभीर झाली. मेंदूचा रक्तस्त्राव आणि जुना हृदयरोग यांच्या कैचीत सापडलेला आईचा जीव व्हेंटिलेटरवर विसंबला. मला २६ डिसेंबर च्या पहाटे तीन वाजून ३१ मिनिटांनी ब्रीच कँडीतून फोन आला. पहाटेचा फोन म्हणजे मी समजून चुकलो होतो. दवाखान्यात पोचलो तेव्हा डॉक्टर्सचा चेहरा सगळे काही सांगत होता. आईचा समोर मंद होत चाललेला श्वास पाहून डबडबलेल्या डोळ्यांचा सांडवा फुटला. फार वेळ थांबता येत नव्हतं. डॉक्टरने सिस्टर्सच्या कक्षात असलेल्या स्क्रिनकडे बोट दाखवले. त्यावर आईच्या खालावणाऱ्या प्रकृतीची परिमाणे दिसत होती.
आईचा शेवटचा प्रवास मी भरल्या डोळ्यांनी पाहत होतो. अधून मधून अश्रूंच्या पुराची आवर्तने येत आणि जात. सकाळी साडेसात वाजता अचानक माझ्या खांद्याला मायेचा उबदार स्पर्श झाला. मागे वळून पाहिले तर तो धुवाळी साहेबांचा हात होता. त्यांना पाहून पुन्हा अश्रूंचा बांध फुटला. धुवाळी साहेबांना कुठून समजले माहित नाही पण घरातील व्यक्ती सोडल्या तर तेच एकमेव की जे धीर देण्यासाठी आणि नंतरच्या सांत्वनासाठी हजर होते. मग आम्ही दोघेही त्या स्क्रिनकडे एक टक पाहत राहिलो.
तीन तासांनी आईचा श्वास शेवटच्या घटका मोजू लागला. स्क्रिनवरील रक्तदाब, ऑक्सिजनची पातळी निचांकी गेली. बाकीच्या उंचसखल रेषांचे तरंग थांबले. मी ढसढसून त्यांच्या मिठीत रडलो. मागे त्यांनाही हृद्याचा त्रास झाला त्यामुळे नंतर हल्ली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातूनच कामकाज पाहत. मी फार दिवस फोनवर बोललो नाही की “मला विसरला का रे ! नाराज आहेस का माझ्यावर ?”असे मृदू हसून व्यथा मांडत. माझ्या आयुष्यातील आत्यंतिक दु:खाच्या क्षणी माझ्या सांत्वनासाठी ज्यांचे हात खांद्यावर होते त्यांना मी कसा विसरेल ? माझ्या प्रेमभऱ्या एखाद्या वाक्यानेही त्यांचं समाधान होई.
धुवाळी सरांना मी तरी आयुष्यात विसरणे शक्य नाही. साहेब इतिहास पुरूष आहेत आणि साहेबांवर खूप काही लिहिलं जातंय. इतिहास साहेबांच्या सांगातींमधील मांदियाळीत धुवाळीकाकांची देखील आवर्जून नोंद घेईल याचा मला विश्वास आहे.