दुबई : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आपल्या फिरकीची जादू दाखवणारा भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. वरुणचे स्थान तब्बल २५नी वधारले असून नव्या क्रमवारीत तो पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, टी-२० मधील भारताचा भरवशाचा फलंदाज तिलक वर्मा टी-२० फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. (T-20 Ranking)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे टी-२० क्रिकेटची नवी क्रमवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने वेस्ट इंडिजच्या अकिल होसेनला मागे टाकत अग्रस्थान पटकाले आहे. रशीदच्या खात्यात ७१८, तर अकिलच्या खात्यात ७०७ गुण आहेत. मागील आठवड्यामध्ये अकिल पहिल्या स्थानी होता. या क्रमवारीत श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा (६९८) आणि ऑस्ट्रेलियाचा ॲडम झाम्पा (६९४) हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहे. वरुण या क्रमवारीत ६७९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. मागील आठवड्यात वरुण ३० व्या स्थानावर होता. परंतु, इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीमुळे तो ‘टॉप फाइव्ह’मध्ये पोहोचला. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये १० विकेट घेतल्या आहेत. (T-20 Ranking)
या क्रमवारीतील आघाडीचे पाचही गोलंदाज फिरकीपटू आहेत. विशेष म्हणजे, वरुणने भारताच्याच रवी बिश्नोईला हटवून पाचवे स्थान मिळवले. नव्या क्रमवारीत बिश्नोईचे स्थान पाचनी घसरले असून तो ६५९ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. भारताचा अर्शदीप सिंग ६६४ गुणासह नवव्या स्थानी कायम आहे, तर अक्षर पटेल सोळाव्यावरून ११व्या स्थानी पोहोचला आहे. (T-20 Ranking)
टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत तिलक वर्माचे स्थान एकने सुधारले असून तो ८३२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ८५५ गुणांसह अग्रस्थानी कायम आहे. भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव हा ७६३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत भारताचा हार्दिक पंड्या अग्रस्थानी असून त्याच्या नावावर २५५ गुण आहेत. या क्रमवारीतील आघाडीच्या दहा खेळाडूंमध्ये तो एकमेव भारतीय आहे. (T-20 Ranking)
हेही वाचा :
शिवाजी विद्यापीठाचे फुटबॉल खेळाडू रेल्वेतून पळाले
बुमराह ‘क्रिकेटर ऑफ दि इयर’