बॅसेल : स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे आव्हान शनिवारी संपुष्टात आले. भारताच्या ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद या जोडीली महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीत भारताचा शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यम उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. (Swiss Badminton)
या स्पर्धेमध्ये, ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद यांना चौथे, तर लिऊ शेंग शू-तान निंग यांना अग्रमानांकन आहे. सामन्यातील पहिला गेम ट्रिसा-गायत्री जोडीने २१-१५ असा जिंकून झोकात सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या गेममध्ये चीनच्या जोडीने जोरदार पुनरागमन केले आणि हा गेम २१-१५ असा जिंकून त्यांनी सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या गेमच्या सुरुवातीलाच चीनच्या जोडीने आघाडी घेतली. ट्रिसा-गायत्री जोडीने कडवी लढत देत ही आघाडी कमी करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. गेमच्या मध्यावर लिऊ-तान जोडी ११-८ अशी आघाडीवर होती. गेमच्या उत्तरार्धात ट्रिसा-गायत्री यांना ही पिछाडी भरून काढण्यात यश आले नाही. हा गेम २१-१२ असा जिंकत चीनच्या जोडीने १ तास ३२ मिनिटांनी विजय निश्चित केला. (Swiss Badminton)
तत्पूर्वी, भारताच्या शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यमलाही उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. फ्रान्सच्या ख्रिस्तो पोपोव्हने सुब्रमण्यमला २१-१०, २१-१४ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. शुक्रवारी सुब्रमण्यमने डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित आंद्रेस अँटॉन्सनविरुद्ध सनसनाटी विजय नोंदवून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यामुळे, साहजिकच त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. उपांत्यपूर्व फेरीत मात्र पोपोव्हविरुद्ध त्याला आदल्यादिवशीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. पोपोव्हने अवघ्या ४० मिनिटांमध्ये सुब्रमण्यमचा पराभव करत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. (Swiss Badminton)
हेही वाचा :
आयपीएल २०२५ मधील संभाव्य नवे विक्रम
अर्जेंटिना पात्रतेच्या उंबरठ्यावर