मुंबई : मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादवने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात टी-२० कारकिर्दीतील ८,००० धावांचा टप्पा ओलांडला. सूर्याने केवळ ५,२५६ चेंडूंमध्ये हा टप्पा ओलांडला असून सर्वांत कमी चेंडूंत ८,००० धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आंद्रे रसेलपाठोपाठ दुसरा आहे. (Suryakumar)
सूर्याने कोलकात्याविरुद्ध ९ चेंडूंमध्ये ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद २७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ८,००० धावांच्या टप्प्याला गवसणी घातली. सूर्याने ३१२ सामन्यांमध्ये ३४.२१ च्या सरासरीने आठ हजार धावा केल्या असून त्यामध्ये ६ शतके आणि ५४ अर्धशतकांचा समावेश आहे. भारत, केकेआर, मुंबई इंडियन्स आणि मुंबई या चार संघाकडून खेळताना सूर्याने या धावा केल्या. टी-२० क्रिकेटमध्ये ८,००० धावा करणारा सूर्या हा भारताचा पाचवा फलंदाज ठरला. त्याच्याअगोदर विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी टी-२०मध्ये ८,००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. सर्वांत वेगवान ८,००० धावांचा विक्रम रसेलच्या नावावर असून त्याने ४,७४९ चेंडूंत हा टप्पा ओलांडला आहे. यासह मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी केकेआरविरुद्धच्या सामन्यात अन्य काही विक्रम नोंदवले. (Suryakumar)
३० – मुंबईच्या ट्रेंट बोल्टने डावाच्या पहिल्याच षटकात सुनील नरेनची घेतलेली विकेट ही आयपीएलमधील त्याची पहिल्या षटकातील तिसावी विकेट ठरली. आयपीएलमधील पहिल्या षटकातील सर्वाधिक विकेटचा विक्रम बोल्टच्या नावावर असून यांपैकी ११ विकेट त्याने मुंबईकडून, तर १९ विकेट राजस्थानकडून घेतल्या आहेत.
१५ – पदार्पणामध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा अश्वनी कुमार हा आयपीएलमधील पंधरावा खेळाडू ठरला. अश्वनीने पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेला बाद केले. यापूर्वी, २०२२ च्या मोसमात चेन्नईतर्फे मथिषा पथिरनाने पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. अश्वनीच्या रूपाने तब्बल १२ वर्षांनी भारतीय खेळाडूने पदार्पणात पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. यापूर्वी, २०१३ च्या मोसमात भारताच्या हनुमा विहारीने अशी कामगिरी केली होती.
हेही वाचा :
पदार्पणातच ‘मोहाली बॉय’ चा विक्रम
हॉकीपटू वंदना कटारिया निवृत्त