फ्लोरिडा : ड्रॅगन अंतराळ यान भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ३.२७ वाजता यशस्वीरित्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर उतरण्यात आले. नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स, क्रू-9 चे सदस्य बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव हे सुमारे नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर परत आले. सर्व अंतराळवीर ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर आले आहेत. नासा आणि स्पेसएक्स टीमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे जगाने हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. (sunita williams return)
पॅराशूटसह चारही प्रवाशांना घेऊन आलेले ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात उतरण्यात आले. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांची सुरक्षित घरवापसी ही जगासाठी एक मोठी बातमी आहे. या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेताना ‘नासा’च्या नियंत्रण कक्षातील सर्व वैज्ञानिकांनी तसेच जगभरातील लाखो अंतराळप्रेमींनी श्वास रोखून धरले होते. (sunita williams return)

कॅप्सूल समुद्रात उतरल्यानंतर जवळपास दहा मिनिटे कॅप्सूलची सुरक्षा तपासणी केली गेली. कॅप्सूल थेट उघडले जात नाही. आत आणि बाहेरच्या तापमान समान पातळीवर येईपर्यंत वाट पहावी लागते. जेव्हा कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो, तेव्हा उष्णतेमुळे लाल होते. म्हणूनच समुद्रात उतरल्यावरही त्याचे तापमान सामान्य होण्याची प्रतीक्षा केली जाते.(sunita williams return)
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर पाच जून २०२४ रोजी नासाच्या मिशन अंतर्गत बोईंगच्या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उडाले होते. ही मोहीम फक्त दहा दिवसांची होती. परंतु अंतराळ यानात दोष आल्यामुळे दोन्ही पृथ्वीवर परत येऊ शकले नाहीत. दहा दिवसांची ही mohim नऊ महिने लांबली. आता सुनीता आणि बुच दोघे निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव या अंतराळवीरांसह परत आले.
वैद्यकीय चाचण्या
लँडिंगनंतर सर्व अंतराळवीरांच्या महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या होतील. अंतराळात अनेक महिने राहिल्यामुळे त्यांच्याववर होणारे अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास करण्यात येईल. त्यासाठी त्यांना टेक्सासमधील ह्युस्टन येथील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये नेले जाईल. तज्ज्ञांच्या मते, अंतराळात दीर्घकाळ राहिल्यामुळे अनेक परिणामांचा त्यांना सामना करावा लागू शकतो.
किमान ४५ दिवसांचा या पुनर्प्राप्ती कालावधी असणार आहे. ‘सर्वसाधारणपणे, बहुतेक क्रू सदस्यांच्या शारीरिक प्रणाली या कालावधीत नॉर्मल होतात,’ असे अंतराळ संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. दीर्घकाळ अवकाशात राहिल्यामुळे शारीरिक असेच मानसिक परिणाम होतात. त्यामुळे ही काळजी घ्यावी लागते.
कोण आहेत सुनीता विल्यम्स?
ओहायोमध्ये भारतीय आणि स्लोव्हेनिय दाम्पत्याच्या पोटी सुनीता विल्यम्स यांचा जन्म झाला. त्या आता वयाची ६० वर्षे पूर्ण करीत आहेत. ‘नासा’च्या वेबसाइटनुसार, त्यांनी यूएस नेव्हल अकादमीमधून भौतिकशास्त्रात पदवी तर फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात मास्टर ऑफ सायन्स केले आहे.
नौदलात असताना, विल्यम्सने ३० हून अधिक वेगवेगळी विमाने, बहुतेकवेळा हेलिकॉप्टरने उड्डाण केले आहे. जवळपास ३,००० हून अधिक तास उड्डाण केले. त्यानंतर त्यांची लवकरच यूएस नेव्हल टेस्ट पायलट स्कूलसाठी निवड झाली. १९९८ मध्ये त्यांची अंतराळवीर म्हणून निवड झाली. त्यांनी अवकाश केंद्रावर दोन दीर्घ कालावधीच्या मोहिमांसाठी उड्डाण केले.
डॉल्फिन्सने केले स्वागत
हे ऑपरेशन सुरू असताना, अंतराळवीरांना एक सुंदर आणि अनपेक्षित दृश्य दिसले. समुद्रातून ड्रॅगन कॅप्सूल बाहेर काढत असताना डॉल्फिन त्याच्याभोवती पोहताना दिसले. या खेळकर सागरी सस्तन प्राण्यांनी अंतराळयानाभोवती प्रदक्षिणा घातल्या. पृथ्वीवर येण्याचा आनंदाचा क्षण अनुभवत असतानाच अंतराळवीरांना या अनपेक्षित जादुई क्षणाची अनुभूतीही आली. त्यामुळे सारेच सुखावून गेले.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर विज्ञान, तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व प्रात्यक्षिके आणि देखभालीचे महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आले. त्यानंतर सुनीता, बुच, निक आणि अलेक्झांडर घरी परतल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे.
जेनेट पेट्रो, ‘नासा’च्या कार्यवाहक प्रशासक