कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ३५ वे साहित्य संमेलन येत्या ९ मार्च रोजी (रविवार) वाई (जि. सातारा) येथे होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची संमेलनाध्यक्षपदी आणि कलासागर ॲकॅडमीचे प्रा. लहुराज पांढरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वाई येथे पहिल्यांदाच दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन होत आहे. सावकार लॉन्स, शहाबाग (वाई) येथे संमेलन होईल. रविवारी ९ जानेवारीला सकाळी दहा वाजता संमेलनाचे उदघाटन होईल. संमेलनात प्रकट मुलाखत, कविसंमेलन आणि कथाकथन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.(Sunilkumar Lawate)
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयाच्या अठरा खंडांचे संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे त्याचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे. डॉ. लवटे यांनी अथक परिश्रमातून साकारलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे औचित्य साधून यावर्षीचे साहित्य संमेलन वाई येथे घेण्याचा, तसेच त्याच्या अध्यक्षपदाचा बहुमान डॉ. लवटे यांना देण्याचा निर्णय दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने घेतला. कलासागर ॲकॅडमी या संस्थेने संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. (Sunilkumar Lawate)
‘दमसा’ संमेलनाचे अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची आतापर्यंत ३४ संमेलने झाली आहेत. ग. ल. ठोकळ, रणजित देसाई, आनंद यादव, वसंत बापट, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, म. द. हातकणंगलेकर, शिवाजी सावंत, प्रा. चंद्रकुमार नलगे, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. फ. मुं. शिंदे, आ. ह. साळुंखे, प्रा. एन. डी. पाटील, वामन होवाळ, डॉ. जयसिंगराव पवार, लक्ष्मण माने, गौतमीपुत्र कांबळे, अशोक नायगावकर, प्रमोद कोपर्डे, वसंत केशव पाटील, बाबा कदम, अनंत तिबिले, रंगराव बापू पाटील, डॉ. द. ता. भोसले, ज्ञानेश्वर मुळे, डॉ. आनंद पाटील, प्रा. मोहन पाटील, अप्पासाहेब खोत, किशोर बेडकिहाळ आदी नामवंत साहित्यिकांनी ‘दमसा’च्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. (Sunilkumar Lawate)
डॉ. सुनीलकुमार लवटे यांची साहित्य संपदा
- आत्मकथा : आत्मस्वर, खाली जमीन वर आकाश
- समीक्षा ग्रंथ : भारतीय भाषा व साहित्य, भारतीय साहित्यकार, समकालीन साहित्यिक
- लेखसंग्रह : एकविसाव्या शतकातील समग्र शिक्षण, एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न, नवे शिक्षण नवे शिक्षक, निराळं जग निराळी माणसं, महाराष्ट्रातील
- बालकल्याण : दशा आणि दिशा, वंचित विकास : जग आणि आपण, शब्द सोन्याचा पिंपळ
- कविता संग्रह : सरल्या ॠतूचं वास्तव
- चरित्रे : कोल्हापूरचे स्वातंत्र्योतर समाजसेवक, प्रेरक चरित्रे, भाषण संग्रह आकाश संवाद, वि.स.खांडेकर चरित्र.
- संपादन : वि.स. खांडेकरांच्या समग्र अप्रकाशित व असंकलित साहित्याचे संपादन, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्.मय (१८ खंड)
- कादंबरी : नवी स्त्री
- कथासंग्रह : दुःखहरण, भाऊबीज, विकसन, सरत्या सरी, स्वप्न आणि सत्य, क्षितिजस्पर्श
- लघुनिबंधसंग्रह : अजुनि येतो वास फुलांना, मुखवटे, रानफुले, सांजसावल्या (२००४)
- वैचारिक लेखसंग्रह : अज्ञाताच्या महाद्वारात, दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी, वन्हि तो चेतवावा (२००४)
- आत्मकथनात्मक : पहिली पावलं, सशाचे सिंहावलोकन
- मुलाखत संग्रह : ॠतू न्याहाळणारं पान
- व्यक्तिचित्रणे : साहित्यशिल्पी, समाजशिल्पी, जीवनशिल्पी