Home » Blog » SU Awards : भवाळकर, जाधव, चव्हाण यांना शिवाजी विद्यापीठाचे पुरस्कार

SU Awards : भवाळकर, जाधव, चव्हाण यांना शिवाजी विद्यापीठाचे पुरस्कार

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची घोषणा; ९ एप्रिलला वितरण

by प्रतिनिधी
0 comments
SU Awards

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा सोमवारी (७ एप्रिल) रोजी करण्यात आली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष पत्रकार परिषद झाली. त्यात ही घोषणा करण्यात आली. (SU Awards)

त्यानुसार सन २०२५ चा ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक, लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. शाल, श्रीफळ, रक्कम रू. १ लाख ५१०००, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (SU Awards)

ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सन्मानाने माननीय डॉ. तारा भवाळकर यांना शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. बुधवार (९ एप्रिल) दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

डॉ. भवाळकर यांची साहित्य संपदा

डॉ. तारा भवाळकर यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांमध्ये मराठी लोकसाहित्य, संत साहित्य आणि स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तके यांचा समावेश आहे. त्यांमध्ये राणीसाहेब रुसल्या (एकांकिका), मधुशाला (हरिवंशराय बच्चन यांच्या काव्याचा अनुवाद),       यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा, लोकांगण, लोकनागर रंगभूमी, महामाया, आकलन आणि आस्वाद, लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा, लोकसंस्कृतीच्या पाउलखुणा, लोकसाहित्य, वाङ्मयप्रवाह, मायवाटेचा मागोवा, प्रियतमा (गडकरी यांच्या साहित्यातील स्त्री प्रतिमा), अभ्यासक स्त्रिया (२५ ज्येष्ठ अभ्यासक स्त्रियांचा परिचय), तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक), निरगाठ सुरगाठ (ललित लेखसंग्रह) सीतायन, लोकसंचित आदी महत्त्वाच्या पुस्तकांचा समावेश आहे. (SU Awards)

डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार

संत साहित्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी देण्यात येणारा ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील’ पहिला पुरस्कार तळाशी (ता. राधानगरी) येथील मारुतीराव जाधव (तळाशीकर गुरुजी) यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये एक लक्ष, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे.

२३ सप्टेंबर २०२४ रोजी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. (तथापि, गुरूजींचे २९ सप्टेंबर रोजी निधन झाले.) या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत प्रा. सदानंद मोरे यांच्याच हस्ते बुधवार, ९ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रम होईल.

दुर्गम भागात राहून संत साहित्याचा ध्यास

दिवंगत मारुतीराव जाधव यांनी राधानगरी तालुक्यातील तळाशीसारख्या दुर्गम आणि शेतकरी कुटुंबात राहून ध्यासपूर्वक संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या साहित्याचा अभ्यास केला. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनासाठी त्यांनी ‘तुकारामबोवांच्या गाथेचे निरूपण’ (खंड एक आणि दोन) हा सुमारे १८०० पृष्ठांचा आणि ‘कान्होबाची गाथा’ हा सुमारे ४०० पृष्ठांचा ग्रंथ सिद्ध केला. त्यांनी निरूपण केलेली तुकारामबोवांची गाथा अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्याची दुसरी आवृत्तीही विद्यापीठाने प्रसिद्ध केली. (SU Awards)

तळाशी गावातील मंदिराचा जिर्णोद्धार करण्याबरोबरच लोकजागृतीसाठी श्री ज्ञानेश्वरी व अध्यात्मावर ज्ञान देणारी ‘आनंदाश्रम’ संस्थेरची स्थापना त्यांनी केली. १९५६ पासून पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीचे संयोजन त्यांनी केले. गावोगावी प्रवचनाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रबोधनाचे काम त्यांनी अखंडितपणे केले. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले.

पुरस्कार निवड समितीत डॉ. रमेश वरखेडे (नाशिक), डॉ. एकनाथ पगार (देवळा), प्रा. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांचा समावेश होता. सदस्य सचिव म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी काम पाहिले.

.

द्गुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे पुरस्कार

शिवाजी विद्यापीठाकडून संत साहित्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रंथकाराला किंवा ग्रंथासाठी ‘सद्गुदरू डॉ.गुरुनाथ मुंगळे अध्यात्मिक तत्त्वज्ञान साहित्य पुरस्कार’  देण्यात येणार आहे. सोलापूर येथील डॉ. गौरी कहाते यांच्याकडून त्यांचे वडील स्व. सद्गुररू डॉ.गुरुनाथ मुंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठास दिलेल्या देणगीमधून हा पुरस्कार सुरू केला आहे. पहिला पुरस्कार प्रा. समीर चव्हाण (आय.आय.टी, कानपूर, उत्तरप्रदेश) यांना सप्टेंबर २०२४ मध्ये जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रु. ५१ हजार, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे. (SU Awards)

तुकारामांच्या अभंगांकडे पाहण्याची नवी दृष्टी

प्रा. समीर चव्हाण हे कानपूर आय.आय.टी. येथे गणित विषयाचे प्राध्यापक आहेत. चव्हाण यांनी ‘अखईं ते जाले (तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात)’ हा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला. तुकोबांच्या कवितेचा भारतीय परिप्रेक्ष्यात नव्या पद्धतीने घेतलेला शोध म्हणजे हा ग्रंथ. यातून तुकारामांकडे आणि त्यांच्या अभंगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतो. तुकारामांच्या लेखनामागे असणाऱ्या भारतीय पातळीवरील दार्शनिक प्रेरणांचा शोध आणि भारतीय परिप्रेक्ष्यात तुकारामांच्या गाथेचे स्थान या ग्रंथात चर्चिले गेल्याने या ग्रंथाचे महत्त्व अधिक आहे. याबरोबरच त्यांच्या नावावर हौस, काळाची सामंती निगरण, रात्रीची प्रतिबिंबे इत्यादी कवितासंग्रह तर समकालीन गझलः एक व्यासपीठ, समकालीन गझलः एक अवलोकन हे समीक्षाग्रंथही प्रसिद्ध आहेत. ‘समकालीन गझल’ या मराठी नियतकालिकाचे ते संपादक आहेत.

पुरस्कार निवड समितीचे सचिव म्हणून संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी काम पाहिले. सदस्य म्हणून डॉ. एकनाथ पगार (देवळा), डॉ. रमेश वरखेडे (नाशिक), प्रा. प्रविण बांदेकर (सावंतवाडी) यांनी काम पाहिले.

या पुरस्काराचे वितरण येत्या बुधवारी, ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात ज्येष्ठ विचारवंत प्रा. सदानंद मोरे यांच्या हस्ते होईल.

या पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.ए. खोत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा :
युवकांच्या प्रचंड प्रतिसादात राहुल गांधींची पदयात्रा  
रुद्रांक्ष पाटीलला सुवर्ण

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00