`जागे राहा जागे राहा, रात्र वै-याची आहे`, अशी म्हण पूर्वापार चालत आली आहे. पूर्वी आक्रमणे व्हायची. शत्रूचे सैनिक येऊन गावे, वस्त्यांची लूट करायचे. त्या काळात लोक गस्त घालायचे आणि रात्री लोकांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी `जागते रहो…` अशी हाळी द्यायचे. आजच्या काळातही तशी हाळी दिली जाते, परंतु त्याचे संदर्भ वेगळे असतात. एखाद्या प्रश्नासंदर्भात लोकांना सावध करण्यासाठी आज त्याचा वापर केला जातो. आता त्याची आठवण येण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून त्याद्वारे राज्यात सत्ता कोणाची येणार याचा निर्णय होणार आहे. खरेतर पुढच्या पाच वर्षांसाठी कोणाची सत्ता येणार याचा फैसला होणार आहे, असे म्हणावयास हवे होते. परंतु वर्तमान काळात तसे म्हणणे धाडसाचे ठरू शकेल अशी परिस्थिती महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात आहे. कितीही बहुमताने एखाद्या पक्षाचे सरकार सत्तेवर आले आणि लोकांनी पाच वर्षांसाठी म्हणून ते निवडून दिले असले तरी ते पाच वर्षे टिकेल याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. आमदार फोडून, पक्ष फोडून किंवा आमदारांना राजीनामे द्यावयास लावून बहुमतातले सरकार अल्पमतात आणले जाते आणि पाडले जाते. एक, दोन, पाच, दहा नव्हे तर चाळीस, पन्नास आमदारही होलसेलमध्ये फुटतात. महाराष्ट्रातील फोडाफोडीचे नाट्य संपूर्ण देशाने नव्हे तर जगाने पाहिले आहे. त्याचमुळे तर जगातील ३३ देशांमधले लोक एकनाथ शिंदे यांना ओळखू लागले आहेत, असे दस्तुरखुद्द शिंदे यांनी सांगितले आहे. पक्षांतरबंदी कायद्याचे श्राद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या साक्षीने घातले गेले असल्यामुळे कशाचीच गॅरंटी देता येत नाही. राज्यघटना, कायदे वगैरे सगळे कधीच निकालात काढले गेले आहे. ते काढणारे सरन्यायाधीश सन्मानाने निवृत्त होऊन नव्या नियुक्तीची प्रतीक्षा करीत आहेत. तर मुद्दा आहे, जागे राहण्याचा. आजच्या दिवशी `जागते रहो…`चा इशारा देण्याचे कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार सोमवारी सायंकाळी संपला आहे. आणि कुठलीही गोष्ट जिथे थांबते तिथून ख-या अर्थाने तिची सुरुवात होते असे म्हटले जाते. त्यानुसार जिथे प्रचार थांबला तिथूनच तो ख-या अर्थाने सुरू झाला, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
जाहीर प्रचार राजरोसपणे, निवडणूक यंत्रणेच्या कॅमे-याच्या साक्षीने होत असतो. तो संपल्यानंतर कॅमे-यांची नजर चुकवून आणि इतरही लोकांच्या नजरेस येणार नाही अशा रितीने हा प्रचार असतो. प्रचार म्हणजे थेट पैशांचे वाटप होत असते. मतदानाच्या आदल्या रात्री हे वाटप होत असल्यामुळे जो मतदारराजा जागा राहिला, त्यालाच लाभ झाला, असे म्हणतात. जो लवकर झोपला त्याची अर्थहानी झाली. मत हा अधिकार आहे आणि तो अधिकार विकू नये, असे म्हटले जाते. अनेक कर्तव्यदक्ष मतदार त्याचे पालन करतात. परंतु अलीकडे जाहीर सभांमधून `खा कुणाचेही बटण, पण दाबा आमचेच बटण` असे जाहीर आवाहन केले जाते. त्याचा दुसरा अर्थ असा की, कुणी पैसे वाटत असेल तर पैसे घ्या नाही म्हणू नका, परंतु मतदान आम्हालाच करा. मतदार शहाणा झाला आहे. आमदारांची कमाई काय प्रमाणात असू शकते याची त्याला कल्पना आली आहे. राजकारणात पैसा मिळतो, हे त्याला माहीत होते. परंतु विधानभवनाच्या पाय-यांवर `पन्नास खोके एकदम ओक्के` वगैरे घोषणा ऐकल्यापासून इतका पैसा मिळतो हे पहिल्यांदाच कळले. जर त्यांना इतका पैसा मिळत असेल तर त्यातले काही निवडणुकीच्या निमित्ताने आपल्यापर्यंत येत असतील तर नाही कशाला म्हणा. रात्रीच्या वेळी घरापर्यंत चालत आलेली लक्ष्मी नाकारणेही इष्ट नाही, असेही त्यांचे धोरण असते. त्यामुळे लोक आता पैसे घेताना संकोच बाळगत नाहीत. आपली लोकशाही प्रगल्भ झाली आहे आणि मतदारही प्रगल्भ झाले आहेत. त्यामुळे पैसे नाकारण्याचा दांभिकपणा तो करीत नाही. पैसे घेतले तरी मतदान कुणाला करायचे, याचा अधिकार तो जबाबदारीने बजावत असतो. देशातील मतदारांनी वेळोवेळी आपली प्रगल्भता दाखवली आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही ती दाखवली आहे आणि कालच्या रात्री जागे राहिल्यानंतरही आज तो मतदान करताना जागरूकता दाखवील, याबाबत शंका वाटण्याचे कारण नाही !