Home » Blog » Manmohan Singh : स्टेट्समन

Manmohan Singh : स्टेट्समन

जगभरातून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली

by प्रतिनिधी
0 comments

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल अमेरिका, रशिया आणि चीनसह जगभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. एक निष्कलंक चारित्र्य असलेला नेता, मुत्सद्दी आणि सकारात्मक राजकारण करणाऱ्या सर्वसमावेशी नेता भारताने गमावला, अशा शब्दांत डॉ. सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. (Manmohan Singh )

भारताच्या आर्थिक सुधारणांचे नेतृत्व करणारे डॉ. सिंग यांचे गुरुवारी रात्री वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या निधनाबद्दल रशिया, चीन आणि अमेरिकेसह विविध राष्ट्रांच्या राजनैतिक प्रतिनिधींनी शुक्रवारी शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली. डॉ. सिंग उत्कृष्ट नेते होते. भारताच्या विकासासाठी त्यांनी समर्पित भावनेने काम केले. भारतातील फ्रेंच दूतावासाने, डॉ. सिंग यांच्या नेतृत्वामुळे ‘भारताची जागतिक स्थिती मजबूत झाली आणि फ्रान्ससोबतचे संबंध मजबूत झाले,’असे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.(Manmohan Singh )

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी, एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अशी ओळख असलेले डॉ. मनमोहन सिंग हे भारतातील लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यशस्वी झाले. त्यांची विद्वत्ता, प्रामाणिकपणा, सभ्यता आणि विनयशीलता वाखाणण्यासारखी होती, अशा शब्दांत मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली.

भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी म्हटले आहे की,‘हा भारतासाठी आणि रशियासाठी अत्यंत दुःखाचा क्षण आहे. भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान अतुलनीय होते. त्यांची विनम्र वर्तणूक नेहमीच प्रिय होती. त्यांची विद्वत्ता, अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची भारताच्या प्रगतीसाठी वचनबद्धता अतुलनीय होती. या कठीण काळात आम्ही डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांसोबत आणि भारतीय नागरिकांसोबत आहेत.

अमेरिकन राजदूत एरिक गार्सेटी यांनी सिंग यांचा भारत-अमेरिका संबंधांमध्ये एक ऐतिहासिक अध्याय सुरू करणारा नेता, अशा शब्दांत गौरव केला आहे.(Manmohan Singh )

‘अमेरिकेचे प्रिय मित्र आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निःस्वार्थ योगदानाचे यावेळी स्मरण होते. त्यांनी अमेरिका-भारत संबंधांमध्ये एक ऐतिहासिक अध्याय सुरू केला. भारताच्या विकास आणि समृद्धीसाठी त्यांचे समर्पण आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्व आणि दूरदृष्टीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,’ असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी डॉ. सिंग यांचा ‘सच्चे मित्र’ असा उल्लेख केला आहे. आधुनिक भारताच्या अर्थव्यवस्थेचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला आहे. डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. भारताची अर्थव्यवस्था भक्कम करण्यात त्यांनी दिलेले योगदान कुणीही विसरू शकत नाही, असे इब्राहिम यांनी म्हटले आहे.

चीनचे राजदूत झू फीहॉन्ग यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, ‘भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले. भारताने एक उत्कृष्ट आणि आदरणीय नेता गमावला. त्यांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांप्रति मनापासून संवेदना.’

‘डॉ. मनमोहन सिंग हे जगभरात एक प्रशंसनीय राजकारणी होते. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताची जागतिक स्थिती मजबूत झाली. त्यांच्याच काळात भारत आणि फ्रान्सदरम्यानचे बंध मजबूत झाले. त्यांनी आपला करुणा आणि प्रगतीचा वारसा पुढील पिढ्यांसाठी मागे सोडला आहे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रति मनापासून सहवेदना व्यक्त करतो,’ अशा शब्दांत फ्रेंच दूतावासाने त्यांना आदरांजली वाहिली आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00