कोलंबो : कर्णधार चरिथ असालंकाच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४९ धावांनी पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. (Srilanka)
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव २१४ धावांत संपुष्टात आला. असालंका वगळता श्रीलंकेचे अन्य फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. असालंकाने एकहाती श्रीलंकेला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याने कारकिर्दीतील चौथे शतक झळकावताना १२६ चेंडूंमध्ये १४ चौकार व ५ षटकारांसह १२७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून शॉन ॲबॉटने ४, तर स्पेन्स जॉन्सन, ॲरन हार्डी आणि नॅथन हिल्स यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Srilanka)
श्रीलंकेचे हे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही. पहिल्या दहा षटकांमध्येच कर्णधार स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज माघारी परतले होते. या धक्क्यातून ऑस्ट्रेलियाचा संघ सावरलाच नाही. ॲलेक्स कॅरीने थोडाफार प्रतिकार करत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. अखेर ३४ व्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव १६५ धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेकडून फिरकीपटू महीश तिक्षणाने ४ विकेट घेतल्या. असिथा फर्नांडो आणि दुनिथ वेल्लालगे यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. या मालिकेतील दुसरा सामना १४ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणार आहे. (Srilanka)
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका – ४६ षटकांत सर्वबाद २१४ (चरिथ असालंका १२७, दुनिथ वेल्लालगे ३०, कुसल मेंडिस १९, शॉन अबॉट ३-६१, ॲरन हार्डी २-१३) विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ३३.५ षटकांत सर्वबाद १६५ (ॲलेक्स केरी ४१, ॲरन हार्डी ३२, ॲडम झाम्पा नाबाद २०, महीश तिक्षणा ४-४०, असिथा फर्नांडो २-२३).

स्टार्क
स्टार्कची चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने व्यक्तिगत कारणास्तव आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्टार्कच्या माघारीमुळे ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेपूर्वीच आणखी एक धक्का बसला आहे. अगोदरच, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससह, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि अष्टपैलू मिचेल मार्श हे दुखापतींमुळे या स्पर्धेस मुकणार आहेत. मार्नस स्टॉइनिसने स्पर्धेपूर्वी दहा दिवस अचानक वन-डेतून निवृत्ती जाहीर केली. आता, स्टार्कच्या माघारीमुळे आणखी एक अनुभवी खेळाडू ऑस्ट्रेलिया संघातून कमी झाला. स्टार्कच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे ऑस्ट्रेलियाचे निवड समितीप्रमुख जॉर्ज बेली म्हणाले. दरम्यान, कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथकडे या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीचा सामना २२ फेब्रुवारी रोजी इंग्लंडशी होईल.
Mitchell Starc has withdrawn from Australia’s Champions Trophy squad due to personal reasons. pic.twitter.com/Yd0DwymcEs
— Sky Sports Cricket (@SkyCricket) February 12, 2025
हेही वाचा :
केरळ नाट्यमरीत्या उपांत्य फेरीत