सातारा; प्रशांत जाधव : कास, महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनाची ठिकाणे म्हणजे सातारा जिल्ह्याला लाभेलेले मोठे वरदान आहे. येथील पर्यटनामुळे याठिकाणी बाजारपेठा वाढल्या. हॉटेल, फार्म हाऊस यांचेही प्रमाण वाढले. त्यामुळे हेच निसर्गाचे वरदान आता जिल्ह्यातील तरूणाईला शाप ठरताना दिसत आहे. याठिकाणी असलेल्या काही हॉटेलात पुणे, मुंबईच्या कॉल गर्ल, बारबाला यांची छमछम वाढली आहे. परिणामी हीच जागतिक पर्यटनस्थळे आता ‘मे तेरी रानी तू मेरा…,’ अशा गाण्यावर नशेच्या तंद्रीत ठेका धरत आहेत. पुणे, मुंबईच्या या छमछमुळे या पर्यटनस्थळांना बदनामीचे ग्रहण लागले आहे. (Satara Crime News)
सातारा जिल्हा हा जसा सैनिकांचा जिल्हा तसाच तो गडकिल्यांचा आणि निसर्गाची उधळण असलेला जिल्हा म्हणूनही याचा लौकिक. या लौकिकाला सौंदर्य लाभले ते महाबळेश्वर, पाचगणी आणि जागतिक स्तरावर नाव असलेल्या कास पठाराचे. मात्र, हाच लौकिक आणि हेच कासचे सौंदर्य आता खुलण्याऐवजी दिवसेंदिवस नको त्या घटनांनी बदनाम होत आहे.
पुणे, मुंबईच्या बारबालांची पावले साताऱ्याकडे
पुणे, मुंबई या दोन्ही शहरात असलेले बारबाला, कॉल गर्ल आणि अमली पदार्थांचे पीक आता सातारा जिल्ह्यात चांगलेच रूजले आहे. खरेतर या अशा गोष्टींसाठी साताऱ्याची माती नक्कीच पोषक नासली तरी, पैसा आणि घुंगराच्या आवाजामुळे नृत्यांगणांचे पाय सातारा जिल्ह्यात थिरकताना दिसत आहेत. परिणामी कास, महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनाची ठिकाणे आता रात्री जागू लागल्याचे चित्र आहे. त्यातच तुर्रा नशेत घुंगराच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई आणि त्यांचा खिसा रिकामा करणाऱ्या नृत्यांगणामुळे पर्यटनाच्या जागतिक वारशाला बदनामीचे ग्रहण लागले आहे. (Satara Crime News)
गावकुसात ढोलकीच्या तालावर
केवळ, पर्यटनस्थळावरच आता घुंगराचे बोल आणि नृत्यांगणाचे पाय थिरकत नाहीत तर आता खेड्यापाड्यात, डोंगरदऱ्यात ‘निवांत आडोशाला ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर…,’ या गाण्यांचे बोल कानी पडू लागले आहेत. मोठ्या शहरातील हे पीक छोट्या शहरात आले ते आलेच पण आता रात्री आठला दिवे बंद करून झोपी जाणाऱ्या खेड्यापाड्यात पण आले. दिवसभर मिळेल ते काम करून पैसे कमवणाऱ्यापासून ते कोट्यावधी रूपयांचा मालक सोने-चांदी दुकानदारापर्यंत हा नाद दिसून येतो.
कॉल केला, गर्ल सेवेसाठी हजर
नृत्यांगणाचा प्रकार तसाच वाढत्या हॉटेलमुळे कॉल गर्ल्सचा प्रकार वाढला आहे. सातारा ते पुणे अगदी दोन तासांचे अंतर असल्याने आले मनात केला कॉल गर्ल सेवेसाठी हजर, असे चित्र आहे. कास, महाबळेश्वर, पाचगणी याठिकाणी काही हॉटेल याचसाठी ओळखली जात आहेत. त्याठिकाणी तरुणाईची ये-जा सतत असते. अनेकदा तर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून कॉल गर्लचे फोटो दाखवून व्यवहार ठरवला जातो आणि त्यांना पुण्यावरून बोलवून घेतले जाते. (Satara Crime)
कमराबंद वेश्या व्यवसायाचा बोलबाला
बारबाला, कॉल गर्ल पुण्यावरून काहीवेळासाठी साताऱ्यात येतात. काम उरकत आणि परत जातात. मात्र, सातारा, कराड, वाई, दहिवडी, फलटण ही शहरे कमराबंद वेश्या व्यवसायाच्या मोठ्या समस्येला सामोरे जात आहेत. याठिकाणी राहणाऱ्या दलाल लोकांनी बाहेरून वेश्या व्यवसायासाठी मुली आणून त्यांना राहण्यासाठी याच शहरात फ्लॅट घेतले आहेत. त्यांचे फोटो ग्राहकाला मोबाइलमध्ये दाखवून व्यवहार केला जातो. त्यानंतर त्यांची ठरलेली काही हॉटेल अथवा मुलींसाठी घेतलेल्या फ्लॅटच्या एखाद्या खोलीत ग्राहकासोबत त्या मुलीला पाठवले जाते.
पोलिसांची तोंडदेखली कारवाई
महाबळेश्वर, पाचगणी, कास याठिकाणासह सातारा, कराड, दहिवडी, फलटण, वाई या शहरात बाहेरच्या मुलींना वेश्या व्यवसायासाठी कायद्याच्या भाषेत डांबले जाते. याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी मुली आणल्या असल्याची खबर शेकडो किलोमीटर ग्राहकांना जाते, पण ‘सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या’ पोलिसांना लागत नाही? माध्यमांत बातम्या आल्यावर वरिष्ठांनी झापाझापी केली की केवळ तोंडदेखली कारवाई करून कागदी घोडे रंगवण्याचे काम स्थानिक पोलिसांकडून केले जाते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (Satara Crime News)
सायबर सेल खरच अॅक्टिव्ह आहे का?
बारवाला, नृत्यांगणा, कॉल गर्ल, कमराबंद वेश्या व्यवसाय हे सगळे कमी आहे म्हणून आता सोशल मीडियावर सेक्स रॅकेटबाबत जाहिराती दिल्या जात आहेत. त्या जाहिराती खऱ्या किती, खोट्या किती याबाबत माहिती नसली तरी पोलिसांच्या सायबर सेलने अशा जाहिरात देणाऱ्या किती सोशल खात्यावर कारवाई केली हा प्रश्न आहे.
‘एएचटीयू’चे अस्तित्व किती?
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभाग हा प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असतो. तसाच सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी आहे. अल्पवयीन बालकांना भीक मागण्यास लावणे, मुली, महिलांना देहविक्री करण्यास भाग पाडणे, अल्पवयीन मुलींचे अपहरण यांसारख्या गोष्टींना पायबंद घालणे हे महत्वाचे काम अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभाग करतो. या विभागाला साताऱ्यात अधिकारी, कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू असताना या विभागाचे अस्तित्व दिसून न येणे हे दुर्दैवी आहे.
हेही वाचा :
- ‘एक राष्ट्र, एक निवडणूक,’ चालू अधिवेशानातच
- दिल्लीत शरद पवार, अजित पवारांची भेट
- बीडचा बिहार झाल्याची विरोधकांची टीका