Home » Blog » स्वप्नवत हम्पी

स्वप्नवत हम्पी

सफरनामा : स्वप्नवत हम्पी

by प्रतिनिधी
0 comments
Hampi

– कुमार कांबळे

हम्पीतील वास्तुशिल्प, भव्य मंदिरे, गोपुरे त्यावरील सुबक नक्षीकाम, कलाकुसर समजून घेताना भान हरपून जाते. वास्तूंचे खांब, तुळई आणि छतही नक्षीदार कलाकुसरीने मंडीत केलेले. लयबद्धता येथील रचनांमध्ये ठासून भरलेली. एखाद्या सिनेमाचा सेट नुकताच लावून ठेवलेला असावा आणि कॅमेऱ्याच्या सिंगल फ्रेममध्ये सामावला जावा, अशी देखणी रचना.

शांत, चांदण्या रात्री पडल्या पडल्या पापण्या मिटाव्यात. सुंदर स्वप्न पडावं. रेखीव आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला भव्य महाल, जाळीदार कमानी, भव्य मंडप, गवाक्ष, सगळ्या भिंती आणि खांबांवर आखीव-रेखीव मूर्ती, त्यांची लयबद्ध रचना, आकाशाशी लगट करणारी भव्य गोपुरे… भव्य साम्राज्यात आपला विहार सुरू असल्याचे भास व्हावेत… अचानक स्वप्नातून जागे व्हावे आणि प्रत्यक्ष स्वप्नातली साम्राज्याची ती भव्यता समोर उगवल्यासारखी प्रकटावी… कर्नाटकातील हम्पी म्हणजेच विजयनगरच्या साम्राज्याची शिल्पश्रीमंती पाहताना अनुभूतीची ही श्रीमंती प्रत्यक्ष अनुभवता येते.

विशेष म्हणजे येथील प्रत्येक वास्तू नुकतीच पूर्ण झालीय नि ती आपल्यासमोर खुली झालीय इतका ताजेपणा अनुभवता येतो. अत्यंत विचारपूर्वक आणि रेखीव पद्धतीने वसवलेले हे नगर. प्रत्येक वास्तूंचे स्थापत्य अजोड, अप्रतिम आणि नेत्रसुखद अनुभव देणारे.

तमिळनाडू, कर्नाटकातील अनेक ठिकाणची मंदिरे, प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू पाहताना हा अनुभव येतोच. म्हणूनच हम्पी, बदामी, पट्टदकल आणि ऐहोळे येथील शिल्पसमूह सहकुटुंब आवर्जून पहावीत, अशीच आहेत. प्राचीन इतिहास, मानववंशशास्त्र आणि पुरातत्त्व अभ्यासकांसाठी तर हा परिसर पर्वणीच म्हणावी लागेल. म्हणूनच देश-विदेशातील अभ्यासक या ठिकाणी वर्षोनवर्षे ठाण मांडून असतात. अनेक विदेशी पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात.

भव्य गोपूर असलेल्या विजय विठ्ठल मंदिरापासून आमची हम्पीची सहल सुरू झाली. माणूस, देव-देवतांच्या रेखीव कलाकृतींनी अलंकृत केलेले गोपूर, भव्य पटांगण, दगडी रथ, त्यावरची बारीक कलाकुसर, तुळशी कट्टा, आणि समोर मूळ मंदिराचा गाभारा, बाजूला संगीत महल, एखाद्या सिनेमाचा सेट नुकताच लावून ठेवलेला असावा आणि कॅमेऱ्याच्या सिंगल फ्रेममध्ये सामावला जावा, अशी देखणी रचना. मंदिराचा भूमिगत प्रदक्षिणा मार्ग. तिथून वरती आले की मंडप आणि शिखरादरम्यान ठेवलेली पोकळी. नैसर्गिक उजेड थेट येईल, अशी रचना. गाभाऱ्यात अंधार जाणवणार नाही, अशी निसर्गस्नेही रचना. मंदिर परिसरातील इमारतींचा प्रत्येक खांब, तुळई, कमानी आणि तोरणे अलंकृत केलेली. जणू अभिजात चित्रकृतीच.

उजवीकडे संगीत महल. चबुतऱ्यावर उभी राहिलेल्या या इमारतीच्या प्रत्येक खांबातून वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज निघतात. दूरवरून वाऱ्याच्या सुखद आणि शांत झुळकीमुळे निर्माण होणारी बारीक शीळ मनात एक प्रकारचे तरंग उमटवत जाते. अर्थात हा परिसर पाहताना येथील बारकावे गाईड घेतल्याशिवाय समजत नाहीत. म्हणून गाईड घेतलाच पाहिजे.

रंगमहल आणि पुष्करणी हा आणखी एक महत्त्वाचा परिसर. वार्षिक उत्सवासाठी बांधलेला दुमजली रंगमहल. या महलासमोरच गुप्त खलबते करण्यासाठी बांधलेली भूमिगत खोली. बाजूला दगडात कोरलेला फोटो अल्बम, अल्बमवरील कोरलेली बहुतेक चित्रे मातृसत्ताक राज्य पद्धतीचे दर्शन घडवणारी. शिकार करणाऱ्या आणि ती वाहून नेणाऱ्या स्त्रिया, युद्धाच्या मोहिमेतील स्त्री सैनिक.

शेजारीच सुंदर आणि आकर्षक पुष्करणी, पुष्करणीसाठी सायफन पद्धतीने पाणी वाहून आणण्यासाठी बांधलेला दगडी पाट, दगडातच कोरलेली जेवणाची ताटे तत्कालीन जीवनपद्धतीचे समग्र दर्शन घडवणारी.

लोटस महल, दसरा उत्सव आणि हत्ती महल पाहताना राजेशाहीची भव्यता आणि सांस्कृतिक उंचीचे दर्शन घडवणारे. भरपूर वारा, उजेड असलेला मोकळा-ढाकळा परिसर. त्यांच्या मध्यभागी रेखीव कमानींनी तोललेला लोटस महल पाहताना वेगळीच अनुभूती येते. याची बांधकाम शैली विजापूरच्या गोलघुमटाच्या धर्तीची. मोर, पोपट, लता-वेली आणि फुलांच्या आकारांनी त्याच्या कमानी मंडीत केलेल्या. त्यामुळे खरोखरीच हा महल तत्कालीन ऐश्वर्यसंपन्नता आणि निर्मिकाच्या सौंदर्यदृष्टीची साक्ष देणारा.

या महलच्या शेजारीच दसरा महोत्सवाचा भव्य मंडप आणि हत्ती शाला. कृषी संस्कृतीचा भव्य उत्सव साजरा करण्याची परंपरा आजही सर्वत्र जपली जाते. म्हैसूरचा दसरा उत्सव जगप्रसिद्ध आहे. या उत्सवाची प्रेरणा हम्पीतील या उत्सवाकडून घेतल्याचे सांगण्यात येते. शेजारीच असलेल्या हत्ती शालेची रचनाही अत्यंत सुबक. ही शाला म्हणजे एक भव्य महलच. तत्कालीन राजवटीत येथे अकरा हत्ती झुलत असत. महलाचा थाटही राजेशाही असाच आहे.

याशिवाय तुंगभद्रेच्या काठी असलेले आणि भव्य गोपूर असलेले विरूपाक्ष मंदिर, उग्र नरसिंहाची वैशिष्ट्यपूर्ण आणि भव्य मूर्ती, भूमिगत शिव मंदिर, राणीचे स्नानगृह या सुबक रचना अत्युत्तम सौंदर्यदृष्टीची साक्ष देणाऱ्या. म्युझियममधील कलाकृतीही अभ्यासण्यासारख्या.

तुंगभद्रा धरण आणि त्यावरील लोभस रोषणाई संध्याकाळ रमणीय करते. तुंगभद्रेच्या विशाल जलाशयात विहार करण्याची व्यवस्थाही असल्यामुळे येथे दिवसा मनसोक्त विहार करता येतो. पर्यटनस्थळे माणसाचे आयुष्य वाढवतात. किंबहुना, तशी तेथील लोकांची मानसिकताही असावी लागते. तरच पर्यटन बहरते आणि पर्यटकही सुखावतात. हम्पीत हा अनुभव पावलोपावली येतो.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00