Home » Blog » साष्-टांग नमस्कार : पाव-भाजी रेवडीवाले

साष्-टांग नमस्कार : पाव-भाजी रेवडीवाले

साष्-टांग नमस्कार : पाव-भाजी रेवडीवाले

by प्रतिनिधी
0 comments
Special Article

वय वर्षे साठ – याला काट, त्याला काट मूळ व्यवसाय प्लास्टिक पाईपवाले प्रधानसेवकांचे जवळचे सल्लाकल्लागार अमितभाई शाह यांसी तसेच वय वर्षे ब्याऐंशी, अजूनही राजकारणाचे हौशी, भा. रा. काँग्रेसचे अध्यक्ष मपन्ना मल्लिकार्जुन खरगे यांसी – दोन्ही कर जोडोनी विनम्र बालकाचा

साष्-टांग नमस्कार!

मागच्या रविवारी १० नोव्हेंबरला आपण दोघाही मान्यवरांनी आपापल्या पक्षांच्या घोषणा कागद सुरळ्या प्रकाशित केल्या, तेव्हा आनंदाने बेशुद्ध पडलो ते तब्बल आठवड्याने म्हणजे आज रविवारी सकाळी जागे झालो. काय करणार! येत्या २० नोव्हेंबरला मतदान करावे लागणार आहे, त्यामुळे त्या आधी तीन-चार दिवस तरी जागे असलेले बरे, असा विचार करून स्वत:ला जबरदस्तीने जागे करावे लागले. (पुढे २१ नोव्हेंबरपासून) ५ वर्षे झोपूनच राहायचे म्हटल्यावर, आणि मग आम्हा मतदारांना आरामच आराम असल्याने, आता हे तीन-चार दिवस डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून, पण तोंड बंद ठेवून मतदान करावयाचे आहे. महोदय, पूर्वी सरसकटपणे अशा सुरळ्यांना जाहीरनामे म्हटले जायचे. पण काहीतरी परिवर्तन आणि विकास तरी पाहिजे म्हणून भाजपा युतीने ‘संकल्पपत्र’ आणि महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्रनामा’ या नावाने हे जाहीरनामे प्रसारित केले आहेत तरीही मतदार मात्र दोघांनाही ‘रेवडीवाले’ म्हणून संबोधायला लागले आहेत, याचे कारण काय असावे बरे?

इडली, डोसे यांचा कंटाळा आला की फारशी मेहनत न करता झटपट होणारा पदार्थ म्हणून आणि करणाऱ्यालाही उगाचंच बरं वाटतं म्हणून बटाट्याची पातळ भाजी, फरसाण नि कांदा आणि सोबत पाव अशी डिश सजवली जाते. तद्वतच आपले संकल्पपत्र आणि महाराष्ट्रनामा झटपट सजवण्यात आले आहेत, कोणाच्या पदार्थाला अधिक मस्त चव आहे, हे २३ तारखेला दिसून येईल. पण तोपर्यंत ही पाव-भाजी वाढत राहण्याचे कर्तव्य करणे दोघांनाही भाग आहे.

महिलांना प्रतिमहा देण्यात येणारी १५०० रुपयांची रक्कम २१०० रुपये करण्यात येईल, महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल अशी लोकप्रिय आश्वासने संकल्पपत्रात देण्यात आलेली आहेत. तर आघाडीचे सरकार आल्यास, पहिल्या १०० दिवसांत महिला सबलीकरणासाठी राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याचे वचन देण्यात आलेले आहे. महोदय, आश्वासने ही कधीच पाळायची नसतात आणि दिलेली वचने विसरायची असतात, हे समस्त जनतेला ठाऊक असल्याने हे ‘संकल्पपत्र’ कपिल शर्माने आपल्या कॉमेडी शोमध्ये आणि समीर चौघुलेने ‘हास्ययात्रा’मध्ये ‘महाराष्ट्रनामा’ वाचून दाखवावा अशी मागणी जनतेकडून करण्यात आली आहे. आपण या मागणीचा मान राखून जनतेचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कराल, अशी आशा वाटते. कोणताही निकष न लावता सरसकट सगळ्या महिलांना अशी प्रतिमहा २१०० रु. ची रेवडी वाटणे, याचा अर्थ राज्यातील सर्व महिला २०२४ सालीही दारिद्र्यरेषेखाली आहेत किंवा त्यातील काही रेषेच्या वर असल्या तरी लाडक्या भावांकडे पैसे जास्त झालेत हे वाटून टाकायचेत, असा संदेश सर्वत्र गेलेला आहे आणि तुम्ही आघाडीवाल्यांनी पक्षांतर्गत एकमेकांच्या तंगड्या ओढण्यासाठी आपली शक्ती वाया न घालवण्याचा कायदा स्वत:वर बंधनकारक करून घेतल्यास जनतेवर उपकार होतील.

संकल्पपत्रात, विशेष एआय विद्यापीठाची स्थापना करणार, सन २०२७ पर्यंत राज्यात ५० लाख लखपती दीदी करणार, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करणार, वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार अशा उडवलेल्या रेवड्यामुळे यावेळी युतीचे उमेदवार २८८ चा आकडा पार करून निवडून येतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. बाकीच्या घोषणांची अंमलबजावणी केली नाही तरी चालेल, पण अमितजी आपणास विनंती अशी की एआय विद्यापीठ मात्र अवश्य स्थापन करून जेणेकरून केवळ आपल्याकडे असलेली काळी जादू विद्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि प्रधानसेवकांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सही देशात सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल. वीजबिलात ३० टक्के कपात होणार याचाही आनंद नागरिकांना झालेला आहे. मात्र सौर ऊर्जेवर भर न देता आपल्या पक्षातील एकाहून एक वरचढ विद्वानांच्या अकलेच्या दिव्यांचा प्रकाश सर्व देशभर पोहोचत असल्यामुळे त्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्याची विनंती आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केल्यास त्याच्या जोडीने जयदीप आपटे आणि मंडळी आशाआकांक्षा केंद्रेही स्थापन करावीत अशी याचना करण्यात येत आहे.

खरगे साहेब, आपण प्रकाशित केलेल्या ‘महाराष्ट्रनामा’मध्ये राज्य नागरी आयोग स्थापन करणार, एमपीएससीची सदस्यसंख्या व कर्मचारी संख्या वाढविणार, राज्यासाठी नवे शैक्षणिक धोरण आखणार, शहरांजवळच्या मोठ्या गावांसह तालुक्यातही एसआरए योजना राबवणार, वर्क फ्रॉम होम टाऊन धोरणाला प्रोत्साहन देणार अशा महत्त्वाकांक्षी घोषणा करण्यात आल्या आहेत. या सर्व घोषणांची पूर्ती व्हायची असेल तर आधी आपणास म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या आघाडीला जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून आपले सरकार स्थापन करावे लागणार. नंतर मग पुढच्या गोष्टी. युतीपेक्षा आघाडीच्या जागा जास्त निवडून आल्यास मुख्यमंत्री सर्व सहमतीने आणि आनंदाने ठरविणार, मंत्रिपदे वाटण्यासाठी फारसे भांडणतंटे करणार नाही, पाच वर्षे व्यवस्थित सरकार चालवून दाखविणार ही महत्त्वाची वचने ‘महाराष्ट्रनामा’मध्ये दिसत नाहीयेत. तेव्हा आपल्या आघाडीच्या जाहीरनाम्यास तसे पुरवणीपत्र जोडावे, ही विनंती.

आघाडी आणि युती यांचे संयुक्त सरकार यावे अशी इच्छा बाळगणारा….

आपला,

विनम्र बालक.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00