Home » Blog » SpaceX Dragon: सुनीता विल्यम्सना आणण्यासाठी ड्रॅगन झेपावले

SpaceX Dragon: सुनीता विल्यम्सना आणण्यासाठी ड्रॅगन झेपावले

स्पेसएक्सच्या यानाचे यशस्वी प्रक्षेपण

by प्रतिनिधी
0 comments
SpaceX Dragon

फ्लोरिडा : गेल्या जूनपासून अंतराळात अडकलेल्या ‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान शुक्रवारी संध्याकाळी झेपावले. ‘नासा’ आणि ‘स्पेसएक्स’ने ही संयुक्त मोहीम आखली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) ही क्रू मोहीम सुरू झाली आहे. (SpaceX Dragon)

ड्रॅगन अंतराळयान शुक्रवारी संध्याकाळी ७:०३ वाजता फ्लोरिडा येथील ‘नासा’च्या केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेसएक्स फाल्कन ९ रॉकेटने उड्डाण केले. भारतीय प्रमाण वेळेनुसार शनिवार सकाळी ४.३३ वाजता ही मोहीम सुरू झाली.

“तुम्हा सर्वांना अंतराळात खूप मजा येईल! #Crew10. शुक्रवारी, १४ मार्च रोजी संध्याकाळी ७:०३ वाजता ET (२३०३ UTC) नासा केनेडी येथून उड्डाण केले,” असे अमेरिकन अंतराळ संस्था-नासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. (SpaceX Dragon)

 “फाल्कन ९ ने क्रू-१० लाँच केले. ड्रॅगनची अंतराळ स्थानकावर १४ वी मानवी अंतराळ मोहीम सुरू,” असे स्पेसएक्सने पुढे म्हटले आहे.

या क्रू-१० मोहिमेत ‘नासा’चे अंतराळवीर अ‍ॅन मॅकक्लेन आणि निकोल आयर्स, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश आहे. हे सर्व अंतराळवीर ड्रॅगन अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर पोहोचतील. (SpaceX Dragon)

या अंतराळयानाला अंतराळ स्थानकात पोहोचण्यासाठी सुमारे २८.५ तासाचा अवधी लागेल, असे ‘नासा’ने म्हटले आहे.

क्रू-१० कक्षीय प्रयोगशाळेत पोहोचेल. त्यानंतर ‘नासा’चे स्पेसएक्स क्रू-९ मोहिमेतील ‘नासा’चे अंतराळवीर निक हेग, सुनी विल्यम्स, बुच विल्मोर आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांना घेऊन त्याचा पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू होईल.

आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी ‘नासा’ची ही मोहीम मूळतः १३ मार्च रोजी सुरू होणार होती. त्यादृष्टीने प्रक्षेपणाचे नियोजनही करण्यात आले होते. परंतु रॉकेटवरील ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्मसह हायड्रॉलिक सिस्टममध्ये काही समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे नियोजित प्रक्षेपणाच्या एक तासापूर्वीच ते रद्द करण्यात आले. (SpaceX Dragon)

बोईंगच्या स्टारलाइनरच्या तांत्रिक समस्यांमुळे सुनीता विल्यम्स आणि विल्मोर गेल्या जूनपासून अंतराळात अडकले आहेत. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात थांबवण्यात आले आहे. तेथे गेल्या जूनपासून त्यांचा मुक्काम आहे. आता ड्रॅगनचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यामुळे हे अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर सुखरूप पोहोचतील. (SpaceX Dragon)

यापूर्वी, हे अंतराळवीर मार्चअखेरपर्यंत पृथ्वीवर परतणार होते, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांना लवकर परत आणण्याची विनंती केली. त्यानंतर या मोहिमेसंदर्भात हालचाली गतिमान झाल्या.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00