सिंगताओ : आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय संघाला ‘ग्रुप डी’मध्ये दक्षिण कोरियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे ‘ग्रुप डी’मध्ये भारत कोरियाखालोखाल दुसऱ्या स्थानावर राहिला. (South Korea)
कोरियाविरुद्ध मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो ही जोडी डाँग जू की-ना एऊन जेआँग यांच्याकडून २१-११, १२-२१, १५-२१ अशी पराभूत झाली. ५६ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात भारताच्या जोडीने पहिला गेम जिंकून आघाडी घेतली होती. परंतु, कोरियन जोडीने जोरदार पुनरागमन करत पुढचे सलग दोन गेम जिंकून विजय निश्चित केला. महिला एकेरीच्या सामन्यात कोरियाच्या यू जिन सिमने भारताच्या मालविका बनसोडला अवघ्या २७ मिनिटांमध्ये २१-९, २१-१० असे नमवले. या पराभवानंतर भारत ०-२ अशा पिछाडीवर पडला होता. त्यानंतर, पुरुष एकेरीमध्ये सतीशकुमार करुणाकरनने कोरियाच्या चो गेनयोपचा तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत १७-२१, २१-१८, २१-१९ असा पराभव केला. हा सामना एक तास १२ मिनिटांमध्ये जिंकून सतीशने भारताचे विजयाचे खाते उघडले. (South Korea)
महिला दुहेरीमध्येही ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद ही भारतीय जोडी विजयी ठरली. त्यांनी कोरियाच्या मिन जी किम-यू जंग किम या जोडीवर १९-२१, २१-१६, २१-११ अशी मात केली. या सान्यानंतर दोन्ही संघांमध्ये २-२ अशी बरोबरी झाल्यामुळे पुरुष दुहेरी सामन्यावर लढतीचा निकाल अवलंबून होता. मात्र, एम. आर. अर्जुन-सात्विकसीराज रंकीरेड्डी या भारताच्या जोडीला ५३ मिनिटांच्या संघर्षांनतरही हा सामना जिंकण्यात अपयश आले. जिन याँग-संग सेआँग या जोडीने हा सामना २१-१४, २५-२३ असा जिंकून कोरियाचा ३-२ असा विजय साकारला. (South Korea)
गुरुवारी झालेल्या अन्य लढतींत, ‘ग्रुप बी’मध्ये इंडोनेशियाने मलेशियावर ३-२ अशी मात केली. ‘ग्रुप ए’मध्ये चीन आणि चायनीज तैपेई यांच्यात चुरशीची लढत सुरू असून चीन २-१ ने आघाडीवर आहे. ‘ग्रुप सी’मध्ये थायलंडने जपानविरुद्धच्या लढतीत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा :