कराची : दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या ‘ग्रुप बी’मधील अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडचा ७ विकेटनी पराभव केला. गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे आफ्रिकेने इंग्लंडचा डाव १७९ धावांत संपवून हे आव्हान ३ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह आफ्रिकेने उपांत्य फेरीत धडक मारली असून ‘ग्रुप बी’मध्ये अग्रस्थानही पटकावले आहे. उपांत्य फेरीत आफ्रिकेचा सामना ‘ग्रुप ए’मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल. (South Africa)
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, हा निर्णय त्यांच्यासाठी लाभदायक ठरला नाही. डावाच्या पहिल्याच षटकात सलामीवीर फिल सॉल्टला मार्को यान्सनने बाद केले. त्यानेच तिसऱ्या षटकात जेमी स्मिथचीही विकेट काढली. सातव्या षटकात यान्सनने बेन डकेटला २४ धावांवर बाद केल्यानंतर इंग्लंडची अवस्था ३ बाद ३७ अशी झाली होती. मागच्या सामन्यातील शतकवीर जो रूटने हॅरी ब्रुकच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी रचत संघाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सतराव्या षटकात केशव महाराजने ब्रुकला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर ठरावीक अंतराने इंग्लंडचे फलंदाज बाद होत राहिल्याने त्यांचा डाव एकोणचाळीसाव्या षटकात १७९ धावांत संपला. इंग्लंडकडून रूटने ४४ चेंडूंमध्ये ४ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ३७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे यान्सन आणि वियान मुल्डर यांनी प्रत्येकी ३, तर केशव महाराजने २ विकेट घेतल्या. (South Africa)
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर ट्रिस्टन स्टब्जचा जोफ्रा आर्चरने तिसऱ्या षटकात शून्यावर त्रिफळा उडवला. आर्चरनेच दुसरा सलामीवीर रायन रिकलटनलाही त्रिफळाचीत केले. त्यानंतर मात्र, रॉसी व्हॅनडेर डुसन आणि हेन्रिक क्लासेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी रचून आफ्रिकेला विजयाच्या समीप नेले. रशीदने क्लासेनला बाद करून ही जोडी फोडली, तोपर्यंत फार उशीर झाला होता. क्लासेनने ५६ चेंडूंमध्ये ११ चौकारांसह ६४ धावा केल्या. डुसनने ८७ चेंडूंमध्ये ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. तिसाव्या षटकात डेव्हिड मिलरने षटकार खेचून आफ्रिकेचा विजय साकारला. याबरोबरच आफ्रिकेचा संघ साखळी फेरीत अपराजित राहिला, तर इंग्लंडवर एकाही विजयाशिवाय स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढावली. (South Africa)
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड ३८.२ षटकांत सर्वबाद १७९ (जो रूट ३७, बेन डकेट २४, जोफ्रा आर्चर २५, मार्को यान्सन ३-३९, वियान मुल्डर ३-२५) पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २९.१ षटकांत ३ बाद १८१ (रॉसी व्हॅनडेर डुसन नाबाद ७२, हेन्रिक क्लासेन ६४, रायन रिकलटन २७, जोफ्रा आर्चर २-५५, आदिल रशीद १-३७).
हेही वाचा :
ध्रुव-तनिशा उपांत्य फेरीत पराभूत