सेंच्युरियन : नवव्या क्रमांकाच्या जोडीने केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा २ विकेटनी पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले आहे. (South Africa)
विजयासाठी १४८ धावा असताना दक्षिण आफ्रिकेने शनिवारी तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावामध्ये ३ बाद २७ धावा झाल्या होत्या. रविवारी पहिल्या सत्रात एडन मार्क्रम आणि कर्णधार तेंबा बावुमा यांनी सावध फलंदाजी केली. मंहमद अब्बासने मार्क्रमला बाद करून ही जोडी फोडली. मार्क्रमने ३७ धावा केल्या. बावुमाने ७८ चेंडूंमध्ये ४ चौकार व एका षटकारासह ४० धावा केल्या. (South Africa)
त्यानंतर, आफ्रिकेने तीन षटकांत ४ विकेट गमावल्यामुळे त्यांची अवस्था ८ बाद ९९ अशी झाली होती. त्यावेळी आफ्रिकेला विजयासाठी आणखी ४९ धावांची गरज असल्याने पाकला विजयाची संधी होती. तथापि, कॅगिसो रबाडा आणि मार्को यान्सन या जोडीने नवव्या विकेटसाठी नाबाद ५१ धावांची भागीदारी रचून पाकचा विजयाचा घास हिरावला. रबाडाने पाकच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत २६ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह नाबाद ३१ धावा फटकावल्या. यान्सनने नाबाद १६ धावांसह त्याला उपयुक्त साथ दिली. पाकच्या महंमद अब्बासने ५४ धावांत ६ विकेट घेऊन विजयासाठी घेतलेले प्रयत्न व्यर्थ ठरले. (South Africa)
अंतिम फेरीतील स्थान निश्चित
या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतक्त्यात अग्रस्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेची गुणांची टक्केवारी ६६.६७ इतकी झाली आहे. आफ्रिकेचा वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेतील सलग सहावा विजय असून त्यांचा केवळ एक सामना शिल्लक आहे. पाकविरुद्धची पुढील कसोटी आफ्रिकेने गमावली, तरी त्यांची टक्केवारी ६१.११ पर्यंतच खाली येईल. गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया ५८.८९ टक्क्यांसह दुसऱ्या, तर भारत ५५.८९ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. या दोन संघांमध्ये सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका सुरू असून दोन सामन्यांचे निकाल अद्याप बाकी आहेत.
ऑस्ट्रेलिया यानंतर श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. हे उर्वरित चारही सामने जिंकल्यास ऑस्ट्रेलिया गुणतक्त्यात अग्रस्थानी येईल व त्यांची टक्केवारी ६७.५४ इतकी होईल. असे झाले तरीही दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी कायम राहणार असल्याने त्यांचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित आहे. दुसरीकडे भारताला मात्र अंतिम फेरीसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील, अन्यथा ऑस्ट्रेलिया-श्रीलंका मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
हेही वाचा :
मेलबर्नमध्ये नितीशची विक्रमी खेळी
भारताचा एकतर्फी मालिका विजय