Home » Blog » Solar Plant : सौर प्रकल्पातून ५२४९ शेतकऱ्यांना दिवसा वीज

Solar Plant : सौर प्रकल्पातून ५२४९ शेतकऱ्यांना दिवसा वीज

जिल्ह्यात नवीन दोन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

by प्रतिनिधी
0 comments
Solar Plant

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील तिसरा प्रकल्प सातवे (ता.पन्हाळा) येथे तर चौथा प्रकल्प आळते (ता. हातकणंगले) येथे कार्यान्वित झाला आहे. या दोन्ही प्रकल्पांची यशस्वी चाचणी नुकतीच पूर्ण झाली असून यामुळे जिल्ह्यात कार्यान्वित प्रकल्पांची संख्या चार झाली आहे. या चार प्रकल्पातून एकूण ५२४९ शेतकऱ्यांना शेतीकरिता दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे.  (Solar Plant)

कोल्हापूर जिल्ह्यात सातवे येथील उपकेंद्रास जोडलेल्या सातवे या चार मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पातून सावर्डे कृषी वाहिनीवरून ७३०, मोहरे कृषी वाहिनीवरून ३९३ तर सातवे कृषी वाहिनीवरून २०१ शेतकऱ्यांना शेतीकरिता दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. तर हातकणंगले येथील उपकेंद्रास जोडलेल्या आळते या चार मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पातून आळते कृषी वाहिनीवरून १४१८ शेतकऱ्यांना व निमशिरगाव कृषी वाहिनीवरून ५०१ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. जिल्ह्यात किणी (ता. हातकणंगले) व हरोली (ता. शिरोळ) येथे यापूर्वीच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून यातून अनुक्रमे १२१६ व ७९० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. (Solar Plant)

कोल्हापूर जिल्ह्यात ५३ प्रकल्प प्रस्तावित

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५३ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता १७० मेगावॅट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ४८ कृषी वाहीन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे. (Solar Plant)

सौर प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करा – महावितरण

जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा. तसेच या प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रकल्प सुरु झाल्या पासून पहिले तीन वर्षे पाच लाख अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी सबंधित ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. (Solar Plant)

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शनावेळी कोल्हापुरात बळाचा वापर

कार्बनशोषक तंत्रज्ञान विकासाची गरज

दाभोळकर, टापरे, पावसकर, झिंब्रे यांचा होणार सत्कार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00