– मुकेश माचकर
एकदा एक राजा चक्रवर्ती सम्राट बनला. चक्रवर्ती सम्राट म्हणजे सगळ्या जगाचा राजा. देवलोकातून त्याच्यावर पुष्पवृष्टी वगैरे झाली, मग सुमेरू पर्वतावर स्वाक्षरी करण्यासाठी त्याला पाचारण करण्यात आलं. ती त्या काळातली पद्धतच होती. मृत्युलोकात जो कोणी चक्रवर्ती सम्राट होईल, त्याला देवलोकातल्या त्या सर्वोच्च पर्वतावर स्वाक्षरी करण्याचा बहुमान मिळत असे.
नवे चक्रवर्ती सम्राट फुल टू बँडबाजा घेऊन, समर्थकांच्या झुंडींसह देवलोकाच्या दारात पोहोचले.
द्वारपाल म्हणाला, सम्राटसाहेब, स्वाक्षरी करायला तुम्ही एकट्यानेच आत जावं लागेल. ही सगळी वरात आत अलाउड नाही.
सम्राट म्हणाले, अर्रर्रर्र, एकट्यानेच जाऊन स्वाक्षरी करण्यात काही मजा नाही. बघायला, टाळ्या वाजवायला कोणी नको का? तो प्रसंग टिपायला फोटोग्राफर नको का?
द्वारपाल म्हणाला, तसा मोह होणं स्वाभाविक आहे तुम्हाला. पण, स्वाक्षरी ही फार खासगी गोष्ट आहे. शिवाय आमच्या अनुभवाचे बोल सांगतो. एकाच्या स्वाक्षरीत दुसऱ्याला काडीचाही रस नसतो. ज्याला त्याला आपलीच स्वाक्षरी लफ्फेदार वाटत असते.
सम्राट एकटाच आत गेला. समोर आभाळाला टेकलेला भव्य पर्वत होता.
द्वारपालाने त्याच्या हातात एक छिन्नी आणि हातोडा दिला. म्हणाला, एक लक्षात घ्या. पर्वतावर कोणत्याही कोपऱ्यात इंचभर सोडा, सेंटीमीटरभरही जागा शिल्लक नाहीये. कोणाची ना कोणाची स्वाक्षरी खोडून काढून तुम्हाला आपली स्वाक्षरी करावी लागेल.
सम्राट म्हणाला, बापरे, या एवढ्या भव्य पर्वतावर माझ्या स्वाक्षरीसाठी जागाच उरू नये, इतके चक्रवर्ती सम्राट माझ्याआधी होऊन गेले आहेत?
द्वारपाल म्हणाला, नाही सम्राटसाहेब, हे एक शतांशही नसतील, माझे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, अशा आमच्या असंख्य पिढ्या इथे द्वारपाल आहोत. त्या सगळ्यांच्या काळातही इथे जेवढ्या स्वाक्षऱ्या झाल्या, त्या आधीच्या चक्रवर्ती सम्राटांच्या स्वाक्षऱ्या खोडूनच कराव्या लागल्या आहेत.