Home » Blog » Shooting : भारताच्या सिफत कौरला सुवर्ण

Shooting : भारताच्या सिफत कौरला सुवर्ण

५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये यशस्वी कामगिरी; चैन सिंहला ब्राँझ

by प्रतिनिधी
0 comments
Shooting

ब्युनॉस आयरिस : भारताची नेमबाज सिफत कौर समाराने आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजीमधील यंदाच्या मोसमातील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. दरम्यान, याच प्रकारामध्ये पुरुष गटात भारताचा चैन सिंह ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. (Shooting)

सिफतने २०२२ च्या हांगझोऊ आशियाई स्पर्धेत ५० मी. थ्री-पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकताना विश्वविक्रमाचीही नोंद केली होती. शनिवारी तिने ४५ शॉट्सच्या अंतिम फेरीत ४५८.६ गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीअखेर सिफत ५९० गुणांसह गुणतक्त्यात अग्रस्थानी होती. अंतिम फेरीत मात्र, निलिंगच्या १५ शॉट्सअखेर केवळ १४७.२ मिळवता आल्याने ती ७.२ गुणांच्या पिछाडीसह अखेरच्या स्थानी फेकली गेली. त्यानंतर, प्रोन प्रकारात प्रभावी कामगिरी करत तिने पदकासाठीचे आव्हान जिवंत ठेवले.(Shooting)

अखेरच्या स्टँडिंग प्रकारामध्ये सिफतने अव्वल दर्जाची कामगिरी केली. या प्रकाराच्या अखेरीस तिने जर्मनीची नेमबाज अनिता मॅनगोल्डपेक्षा ३.३ गुणांनी आघाडीवर राहून सुवर्णपदक निश्चित केले. मॅनगोल्ड ४५५.३ गुणांसह रौप्य, तर कझाखस्तानची ॲरिना ॲल्तुखोवा ४४५.९ गुणांसह ब्राँझपदक विजेती ठरली. २३ वर्षीय सिफतच्या कारकिर्दीतील हे वर्ल्ड कपमधील पहिलेच सुवर्ण ठरले.(Shooting)

पुरुष गटामध्ये भारताच्या चैन सिंहने ४४३.७ गुणांसह ब्राँझपदक जिंकले. या गटात प्राथमिक फेरीतून भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर (५९४), चैन सिंग (५८९), नीरज कुमार (५८७) या तिघांनी अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मात्र, ऐश्वर्य ४३२.६ गुणांसह चौथ्या, तर नीरज ४०२.७ गुणासंह सातव्या स्थानी राहिला. विशेष म्हणजे, निलिंग व प्रोन प्रकारांअखेर ऐश्वर्य चैनपेक्षा २.४ गुणांनी आघाडीवर होता. मात्र, चैनने स्टँडिंग प्रकारात ही पिछाडी भरून काढत ब्राँझपदक जिंकले.

हेही वाचा :
न्यूझीलंडचे निर्भेळ यश
सूर्यकुमारच्या आठ हजार धावा पूर्ण

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00