चेन्नई : भारताचा सर्वांत यशस्वी टेबल टेनिसपटू आचांता शरथ कमालने बुधवारी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. या महिनाअखेरीस चेन्नईमध्ये रंगणारी वर्ल्ड टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धा ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा ठरणार आहे. २५ ते ३० मार्चदरम्यान ही स्पर्धा होईल. (Sharath Kamal)
शरथने बुधवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून निवृत्तीची घोषणा केली. माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली स्पर्धा मी चेन्नईमध्ये खेळलो होतो. अखेरची आंतरराष्ट्रीय स्पर्धाही मी चेन्नईमध्येच खेळेन, असे ४२ वर्षीय शरथने या पोस्टमध्ये म्हटले आहे. दोन दशकांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीमध्ये शरथने बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा फडकावला. त्याच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील सात सुवर्णपदके आणि आशियाई स्पर्धेतील दोन ब्राँझपदके जमा आहेत. त्याचप्रमाणे, पाच ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारा तो भारताचा एकमेव टेबल टेनिसपटू आहे. त्याने टेबल टेनिसमध्ये विक्रमी दहावेळा राष्ट्रीय विजेतेपदही पटकावले. (Sharath Kamal)
मी कारकिर्दीमध्ये राष्ट्रकुल व आशियाई पदके जिंकू शकलो. ऑलिंपिक पदक मला जिंकता आले नाही. भारतीय टेबल टेनिसमध्ये येणाऱ्या नव्या पिढीसाठी मी हे स्वप्न ठेवून जात आहे, असे भावनिक विधानही शरथने केले आहे. माझ्या बँडाना आणि रॅकेटला विश्रांती देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते. या कारकिर्दीबद्दल मी पुरेपूर समाधानी आणि कृतज्ञ आहे. या सर्व वर्षांमध्ये या खेळाने मला खूप आठवणी आणि खूप चांगले लोकही जोडून दिले आहेत, असेही शरथने नमूद केले आहे. (Sharath Kamal)
शरथ सध्या जागतिक टेबल टेनिस क्रमवारीमध्ये ४२ व्या स्थानावर असून तो भारताचा सर्वोच्च स्थानी असणारा टेबल टेनिसपटू आहे. २०१९ मध्ये तो जागतिक क्रमवारीत तिसाव्या स्थानापर्यंत पोहोचला होता. त्याला २००४ मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर २०२२ मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, २०१९ मध्ये भारत सरकारने त्याला पद्मश्री देऊन गौरवले होते. (Sharath Kamal)
हेही वाचा :
स्टीव्ह स्मिथ वन-डेतून निवृत्त