Home » Blog » Sharad Pawar honoured : किल्लारी, भूज आणि मुंबई बॉम्बस्फोट…

Sharad Pawar honoured : किल्लारी, भूज आणि मुंबई बॉम्बस्फोट…

शरद पवारांनी सांगितल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या आठवणी; महायोद्धा पुरस्काराने गौरव

by प्रतिनिधी
0 comments
Sharad Pawar honoured

कोल्हापूर : प्रतिनिधी : महापूर, वादळ, आग, भूकंप अशा आपत्ती आल्यावर सरकारी यंत्रणा धावून जाते. अशावेळी आपत्ती व्यवस्थापनात मदत करणाऱ्या संस्था जीव धोक्यात घालून आपत्तीच्या कामात स्वत:ला झोकून देतात. अशा संस्थांना बळ देण्यासाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.  खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते पवार यांना व्हाईट आर्मी संस्थेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.  त्यावेळी त्यांनी किल्लारी भूकंप, मुंबई बॉम्बस्फोट आणि भूजमधील भूकंपांच्या आपत्तीवेळी कसे व्यवस्थापन केले याच्या आठवणी सांगितल्या.  (Sharad Pawar honoured)

यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र कुलगुरू पी. एस. पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे, शाहू संस्थेचे समरजीत घाटगे, उद्योगपती व्ही. बी. पाटील प्रमुख उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापनात काम केलेल्या आणि व्हाईट आर्मी संस्थेला मदत करणारे माजी अतिरिक्त मुख्य सचिव उमेश सारंगी, सुभाष दळवी, माजी महापालिका आयुक्त दत्तात्रय मेतके यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. (Sharad Pawar honoured)

आपत्ती निवारण कार्यात झोकून देण्यासाठी व्हाईट आर्मीने कार्यकर्त्यांचा संच तयार केला आहे. गेले पंचवीस वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यांत आपत्ती झालेल्या भागात ते काम करतात. अशा संस्थेचे निमंत्रण मी नाकारू शकलो नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवारांनी भाषणात त्यांनी आपत्ती काळात केलेल्या कार्याची माहिती दिली.

सकाळी सातला किल्लारीत…

शरद पवारांनी किल्लारी भूकंपाची आठवण सांगितली, ते म्हणाले, लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात भूकंप झाला त्यावेळी संपूर्ण राज्यभर सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुका सुरू असताना रात्रभर जागा होतो. राज्यातील सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अडीच वाजता झोपलो असताना खिडकीच्या काचा जोराने वाजल्या. महाराष्ट्रात भूकंप झाल्यावर सर्वप्रथम भूकंपाचे केंद्र असलेल्या कोयना धरणाच्या ठिकाणी संपर्क साधला. पण भूकंपाचे केंद्र कोयना नसून लातूर जिल्ह्यातील किल्लारी असल्याचे सांगितले. किल्लारीशी संपर्क साधून माहिती घेतली मोठी हानी झाल्याची माहिती मिळाली. सकाळी सात वाजता विमानाने लातूरला पोचलो. लातूरहून किल्लारीला जाताना अनेक गावांत हानी झाल्याची लक्षात आले. गावागावांत घरे पडली होती. लोक जखमी झाले होते. किल्लारीत सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. लातूर, सोलापूर जिल्ह्यासह राज्य, देश-विदेशातून मदत मागवली. रात्री तीन साडेतीन वाजेपर्यंत सर्व सरकारी अधिकारी माझ्यासोबत काम करत होते. शासकीय अधिकाऱ्यांचे काम वाखाखण्यासारखे होते, असे पवारांनी सांगितले. (Sharad Pawar honoured)

नरसिंहरावांनी ऐकले…

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव किल्लारीला भेट देण्यासाठी येणार होते असे पवारांनी सांगितले. ते म्हणाले,  मी मुख्यमंत्री असूनही पंतप्रधानांना तुम्ही येऊ नका असे सांगितले. तुम्ही आला तर सर्व यंत्रणा तुमच्या सुरक्षा व्यवस्थेत गुंतून पडेल, आपत्ती व्यवस्थापनात अडथळे येतील असे सांगितले. माझी विनंती पंतप्रधानांनी मानली. त्यानंतर आम्ही देशविदेशातील मदत, केंद्र आणि राज्य सरकारची मदत, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने किल्लारी गावांसह अन्य गावांना उभे करु शकलो. (Sharad Pawar honoured)

बॉम्बस्फोटानंतर थांबलेली मुंबई पुन्हा मुंबई सुरू केली

१९९२-९३ मध्ये मुंबईत मोठी दंगल झाली. त्यावेळी मी सरंक्षणमंत्री असतानाही पंतप्रधानांनी मुंबईला मुख्यमंत्री म्हणून पाठवले, असे सांगून पवारांनी थांबलेली मुंबई सुरू करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाने चांगली मदत केली. लोकल, बस, दूध आणि भाजी पुरवठा सुरू झाल्यावर मुंबई पुन्हा धावू लागली. दंगल शमल्यानंतर थोड्याच दिवसात मुंबई परकीय शक्तींनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. बॉम्बस्फोट घडवून पुन्हा मुंबईत हिंदू मुस्लिम दंगल घडवायची होती. पण मी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर अकरा बॉम्बस्फोट झाले असताना बारावा बॉम्बस्फोट महमद अली जीना रोडवर झाल्याचे सांगितले. त्यामुळे हिंदू मुस्लिम दंगल टळली आणि पुन्हा मुंबई सुरू झाली, अशी आठवण सांगितली. (Sharad Pawar honoured)

आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा झाला

गुजरातच्या भूजमध्ये भूकंप झाल्यानंतर लातूर भूकंपाचा अनुभव असल्याने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वायपेयी यांनी भूजमधील भूकंपाचे आपत्ती व्यवस्थापन करण्यास सांगितले. भूजमधील आपत्ती निवारणाचे काम झाल्यावर देशात ज्या ज्यावेळी आपत्ती येतात तेव्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा करण्याची गरज मी पंतप्रधान वायपेयी यांना बोलून दाखवली. त्यानंतर मी आणि केंद्रातील सचिव व्ही. के. मिश्रा यांनी ज्या ज्या देशात आपत्ती उद्भवतात त्या जपान, अमेरिकेसह अन्य देशांना भेटी देऊन अभ्यास केला. केंद्र सरकारला त्याआधारे आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा बनवायला भाग पाडले, असे पवार यांनी सांगितले. (Sharad Pawar honoured)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले.

हेही वाचा :
दावोसमध्ये महाराष्ट्रातील कंपन्यांशी सामंजस्य करार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00