Home » Blog » सध्याच्या कठिण काळात साहित्यिकांवर मोठी जबाबदारीःशरद पवार

सध्याच्या कठिण काळात साहित्यिकांवर मोठी जबाबदारीःशरद पवार

सध्याच्या काळात साहित्यिकांवर मोठी जबाबदारी असल्याचे मत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

by प्रतिनिधी
0 comments

नवी दिल्लीः काळ झपाट्याने बदलत आहे. समाजाच्या एकात्मतेची वीण उसवत चालल्याचे चित्र दिसते. समाज कठिण आणि नाजूक स्थितीतून जातोय. अशा काळात साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. (Delhi Sahitya Sammelan)

दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार बोलत होते. लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. सारस्वतांचा मेळा यमुनाकाठी जमला आहे, हा केवळ मराठीसाठीच नव्हे, तर इतर भारतीय भाषांसाठीही आनंद सोहळा आहे, असे सांगून पवार म्हणाले, चंद्रभागेकाठी आषाढी, कार्तिकीला दरवर्षी लाखो वारकरी भक्तिभावाने जमतात. त्याच पद्धतीने या साहित्य संमेलनासाठी हजारो साहित्यप्रेमी दरवर्षी पदरमोड करून येत असतात. देशाच्या राजधानीत या सर्वांचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली, हा माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण  यांची आज आठवण येणे स्वाभाविक आहे. साहित्य-संस्कृतीशी राज्यकर्त्यांनी कसे संबंध ठेवावेत, याचा वस्तुपाठ यशवंतरावांनी घालून दिला. त्यांच्याबरोबरच काकासाहेब गाडगीळ यांची आठवण येते. १९५४ मध्ये दिल्लीत ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. त्यांनी जी जबाबदारी पार पाडली होती, ती आज माझ्याकडे आली आहे. त्या संमेलनाचे अध्यक्ष होते, महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा देणारे प्रकांड पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. देशाचे त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संमेलनाचे उद्घाटन केले होते. त्याचीच पुनरावृत्ती होताना त्यानंतर सत्तर वर्षांनी होणा-या या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

तारा भवाळकर यांची निवड

मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राबाहेर, त्यातही राजधानी दिल्लीत संमेलन होत आहे. ही विशेष नोंद घेण्याजोगी बाब आहे. या संमेलनाची माझ्या दृष्टिने आणखी एक उल्लेखनीय आणि मला विशेष आनंद देणारी बाब म्हणजे लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची अध्यक्षपदी झालेली निवड. चिपळूणच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी मी एक खंत व्यक्त केली होती. की, आतापर्यंत इतकी संमेलने झाली, परंतु फक्त चारच महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला आणि ही गोष्ट काही बरोबर नाही. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड केलीत.  मी डॉ. तारा भवाळकर यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या निवडीसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळालाही धन्यवाद देतो. (Delhi Sahitya Sammelan)

मराठी साहित्याची पताका देशभर

वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या चार मराठी लेखकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध भारतीय भाषांमध्ये त्यांचे साहित्य पोहोचले आहे आणि त्याद्वारे मराठी भाषेची पताका देशभऱ फडकत राहिली असल्याचे सांगून पवार म्हणाले, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या नाटककाराची नाटके देशभरात सादर केली जातात. तेंडुलकरांनीही कुणाचा मुलाहिजा न ठेवता लेखन केले. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईँडर या त्यांच्या नाटकांमुळे त्यांनाही काही घटकांच्या रोषाला सामोरे जावे लागले, परंतु ते आपल्या भूमिकेपासून हटले नाहीत. नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, नारायण सुर्वे यांची कविता देशाच्याच नव्हे, तर जगाच्या मंचावर लक्ष वेधून घेते. अण्णा भाऊ साठे यांनीही गावकुसाबाहेरचे, उपेक्षितांचे जगणे मराठी साहित्यात आणले. त्यांच्या साहित्याचा डंका रशियापर्यंत वाजला. स्त्रियांनीही मराठी साहित्यात मोठी भर घातली असून ती संख्यात्मक आहे, तशीच गुणात्मकसुद्धा आहे. महानुभाव पंथातील महदंबेपासून जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, सावित्रीबाई फुले, शांता शेळके, इंदिरा संत, अरुणा ढेरे, अशी कवितेतही सशक्त परंपरा दिसून येते.

साहित्य आणि राजकारणाचे संबंध

राजकीय नेत्यांनी संमेलनाच्या मंचावर यावे की येऊ नये,यासंदर्भात दरवर्षा वाद झडतात, याचा उल्लेख करून पवार म्हणाले, आम्ही राजकारणी संमेलनात आलो तर वाद होतो. आमच्या क्षेत्रात साहित्यिक आले तर आम्ही कधी वाद करीत नाही.  आचार्य प्रल्हाद केशव अत्रे राजकारणात आले. विरोधी पक्षाचे प्रभावी नेते म्हणून त्यांनी काम केले त्याचा आम्हाला अभिमान आहे. अलीकडच्या काळात निसर्ग, शेतीवर काव्य करणारे ना. धों. महानोर विधिमंडळात आले, भाष्यकविता लिहिणारे रामदास फुटाणे आले, उपराकार लक्ष्मण माने आले, तर त्याची तक्रार विधिमंडळात कुणी केली नाही. ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल चर्चा होऊ शकत नाही. मराठी माणसाच्या सर्व वर्गामध्ये ज्यांच्याबद्दल प्रचंड आस्था असा महाकवी मराठीत होऊन गेला. त्यांनी लिहिलेले गीतरामायण आजही मराठी माणसांच्या ओठावर आहे. अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीच्या काळातही महाराष्ट्रात सगळीकडे ऐकू येत होते, ते गदिमांनी लिहिलेले गीतरामायणच. त्यांनी काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळात येऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवला. राजकारण आणि साहित्य यांचा परस्परसंबंध दुतर्फा आहे. लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण अशी नावे घेता येतील, ज्यांनी या दोन्ही क्षेत्रांना प्रतिष्ठा दिली. साहित्याला राजाश्रय दिला असे नव्हे, तर राजांनीच साहित्यकला जोपासली. बुधभूषणकार संभाजी महाराज हे त्याचे मोठे उदाहरण. राजकारण आणि साहित्य परस्परपूरक. (Delhi Sahitya Sammelan)

वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी

पूर्वी पुस्तकांसाठी ग्रंथालयांवर अवलंबून राहावे लागायचे. सुविधा मुबलक नव्हत्या तरीही वाचनसंस्कृती रुळली होती. आता साधने वाढली परंतु वाचनाला अनेक पर्याय आले. दूरचित्रवाणी आली. मनोरंजनाच्या वाहिन्या आल्या, वृत्तवाहिन्या आल्या. स्मार्टफोन आले. माणसांना गुंतवून ठेवणारी अशी अनेक साधने आली. असे असले तरी पुस्तके मोठ्या प्रमाणावर छापली जात आहेत. चांगली पुस्तके खपलीही जात आहेत. गावोगावी ग्रंथप्रदर्शने भरवली जात आहेत. त्या माध्यमातून लोकांपर्यंत पुस्तके पोहोचत आहेत. तरीसुद्धा नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी याची काळजी घेम्याची नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. (Delhi Sahitya Sammelan)

बदलत्या काळात साहित्यिकांची जबाबदारी

काळ झपाट्याने बदलत आहे. समाजाच्या एकात्मतेची वीण उसवत चालल्याचे चित्र दिसते. समाज कठिण आणि नाजूक स्थितीतून जातोय. अशा काळात साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. महानुभाव, वारकरी परंपरांचे भान ठेवून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, न्या. रानडे, र. धों. कर्वे, आगरकर वगैरे सुधारकांच्या वाटेने समाजाला नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. (Delhi Sahitya Sammelan)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00