दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारताच्या महंमद शमी आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वन-डे कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे ओलांडले. शमीने वन-डे क्रिकेटमधील २०० विकेटचा टप्पाही पूर्ण केला, तर रोहित शर्माने वन-डेतील ११,००० धावांचा टप्पा ओलांडला. (Shami)
या सामन्यात शमीने ५३ धावांत ५ विकेट घेताना २०० विकेटचा टप्पा ओलांडला. २०० विकेटचा टप्पा गाठणारा तो भारताचा आठवा गोलंदाज ठरला. त्याने १०४ सामन्यांमध्ये २०० विकेट घेतल्या असून सर्वांत कमी सामन्यांमध्ये हा टप्पा पूर्ण करणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहे. सर्वांत वेगवान २०० विकेटचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावे असून त्याने १०२ सामन्यांत ही कामगिरी केली आहे. त्याखालोखाल पाकिस्तानचा सकलेन मुश्ताक आणि शमीने १०४ सामन्यांत हा टप्पा गाठला. यापूर्वी, भारतातर्फे सर्वांत वेगवान २०० विकेटचा विक्रम अजित आगरकरच्या नावावर होता. त्याने १३३ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. (Shami)
सर्वांत कमी चेंडूंमध्ये २०० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मात्र शमीने स्टार्कला मागे टाकत पहिले स्थान पटकावले. शमीने ५,१२६ चेंडूंमध्ये हा टप्पा पूर्ण केला असून स्टार्कला २०० विकेटसाठी ५,२४० चेंडू, तर सकलेनला ५,४५१ चेंडू लागले होते.
याबरोबरच, शमीने वन-डे क्रिकेटमध्ये पाचव्यांदा डावात ५ विकेट घेण्याची कामगिरी नोंदवली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. वन-डेमध्ये सर्वाधिक १३ वेळा डावात ५ विकेट घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या वकार युनूसच्या नावावर आहे. (Shami)

रोहितच्या ११,००० धावा पूर्ण
रोहितने या सामन्यामध्ये १२ धावा पूर्ण करताच त्याच्या वन-डे कारकिर्दीतील ११,००० धावा पूर्ण झाल्या. हा टप्पा ओलांडणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दहावा, तर भारताचा चौथा फलंदाज ठरला. त्याच्याअगोदर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांनी वन-डे क्रिकेटमध्ये ११,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वांत कमी सामन्यांमध्ये ११,००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित विराटखालोखाल दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने २६१ डावांमध्ये हा टप्पा ओलांडला. सर्वांत वेगवान ११,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराटच्या नावे असून त्याने २२२ डावांत ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा :
पॉवरलिफ्टिंगवेळी राष्ट्रीय विजेतीचा अपघाती मृत्यू