मणिपूर, वृत्तसंस्था : मणिपूरच्या जिरिबाम जिल्ह्यात कुकी दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. बोरोबेकरा उपविभाग जिरीबामच्या जकुराधोर करोंगमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी ११ कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईत सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.
मणिपूरचे इम्फाळ खोरे वांशिक संघर्षाने त्रस्त आहे. यासोबतच या परिसरात दहशतवाद्यांनी दहशत निर्माण केली आहे. शेतकऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. त्यांच्या दहशतीमुळे शेतकरी भयभीत झाला आहे. यामुळे शेतकरी शेतात कामाला जाणेही टाळत आहेत.
सोमवारी (दि.११) इम्फाळमधील टेकड्यांवरून अतिरेक्यांनी गोळीबार केला. यात शेतात काम करणारा शेतकरी जखमी झाला. सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांवर हल्ला झाला. जखमी शेतकऱ्यावर येनगांगपोकपी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. सध्या शेतकऱ्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. याआधी शनिवारी चुरचंदपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागातून दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यामध्ये विष्णुपूर जिल्ह्यातील सेटोन येथे शेतात काम करणाऱ्या ३४ वर्षीय महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. रविवारी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील सानसाबी, थमनापोकपी आणि सबुंगखोक खुनौ येथेही असेच हल्ले झाले. गेल्या वर्षी मे महिन्यापासून इंफाळ खोऱ्यातील मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू झालेल्या वांशिक संघर्षात आतापर्यंत २०० हून अधिक लोक मारले गेले आहेत.अशा हल्ल्यांमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याचा शेतातील कामांवर परिणाम होत आहे.
सुरक्षारक्षकांचे सडेतोड प्रत्युत्तर
एका अधिकाऱ्याने सांगितले की, शेतकऱ्यांवर गोळीबाराची घटना सकाळी ९.२० च्या सुमारास घडली. कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागातील अतिरेक्यांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. तिथे पोहोचतात सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडेतोडे प्रत्युत्तर दिले. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये काही काळ गोळीबार झाला. या गोळीबारात सुरक्षा दलाच्या जवानांनी ११ कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केला. या गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला.
सुरक्षा दलांची जोरदार कारवाई
गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा दलाचे जवान मणिपूरमध्ये शोधमोहीम राबवत आहेत. यात सुरक्षा दलांना अनेक शस्त्रे, दारूगोळा आणि आयईडी जप्त केले आहेत. शनिवारी आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने एके ३०३ रायफल, दोन ९ एमएम पिस्तूल, सहा १२ सिंगल बॅरल रायफल, एके २२ रायफल, दारूगोळा अशा वस्तू जप्त केल्या.