Home » Blog » Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्या ते मुंडेंचा राजीनामा

Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्या ते मुंडेंचा राजीनामा

महाराष्ट्राने गेल्या तीन महिन्यांत काय अनुभवले?

by प्रतिनिधी
0 comments
Santosh Deshmukh Murder

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गाव आता देशभरात परिचयाचे झाले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रासह देशभरात मोठी खळबळ उडाली. या हत्येत मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आले आणि विरोधकांसह सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनीही या प्रकरणाला लावून धरले. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर महाराष्ट्रात मराठा विरुद्ध वंजारी असाही संघर्ष झाला. (Santosh Deshmukh Murder)

या प्रकरणात दोषी मानून धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरु लागली होती. अखेर मंगळवारी  (४ मार्च) धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण अजूनही प्रकरण शांत झालेले नाही. धनंजय मुंडेंना बडतर्फ करा आणि त्याची आमदारकी रद्द करा, अशी मागणीही आता जोर धरु लागली आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर घडलेल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी अत्यंत नाट्यमय होत्या. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणाने राजकारण आणि समाजकारण ढवळून काढले होते.

सरपंच संतोष देशमुखांची हत्या ते धनंजय मुंडेंचा राजीनामा. काय आहे घटनाक्रम…?

९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या शब्दश: माणुसकीला काळीमा फासणारी होती. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. (Santosh Deshmukh Murder)

संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली त्या दिवशी नेमके काय घडले होते, यावर त्यांच्या कुटुंबीयांनी भाष्य केले आहे.

संतोष देशमुख यांचे अपहरण झाले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हेही होते.

डोणगावच्या टोलनाक्यावरून अपहरण

संतोष देशमुख यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख यांनी सांगितलेला घटनाक्रम असा होता… ‘‘घटना घडली त्या दिवशी दुपारी २.३० च्या दरम्यान शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांना केजमधे भेटले. त्यानंतर ते दोघे केजमधून त्यांच्या गावाकडे परत येत होते. शिवराज देशमुख गाडी चालवत होते, तर संतोष देशमुख त्यांच्याशेजारी बसले होते. (Santosh Deshmukh Murder)

‘‘दरम्यान डोणगावच्या टोलनाक्यावर अचानक एका चारचाकी गाडीकडून त्यांच्या गाडीला अडवण्यात आले. त्या गाडीतून ५-६ तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करू लागले. नंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या, लोखंडी रॉड तसेच कोयत्याने मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले.’’

शिवराज देशमुख यांनीच सांगितल्याप्रमाणे, ‘‘या दगडफेकीत एक मोठा दगड गाडी चालणाऱ्या शिवराज देशमुखांच्या सीटजवळ आलेला, तो काढून गाडी बाहेर येईपर्यंत अपहरणकर्ते सरपंच संतोष देशमुखांना घेऊन गेले होते.’’ (Santosh Deshmukh Murder)

पोलीस ठाण्यात पोहोचेपर्यंत मृत्यूची बातमी

या मारहाण करणाऱ्या तरुणांमध्ये सुदर्शन घुले, सांगळे, महेश केदार, प्रतिक घुले हे ओळखीचे चेहरे होते, अशी माहितीही शिवराज यांनी दिली होती. घटना घडल्यानंतर शिवराज यांनी लगेच हा सर्व प्रकार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून कळवला.

शिवराज देशमुख पुढे सांगतात, ‘‘या घटनेची माहिती मिळताच धनंजय देशमुख यांनी त्यांना लवकरात लवकर केज पोलीस स्टेशनला पोहोचायला सांगितले. त्यानंतर साधारणतः १० ते १५ मिनिटांत शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला पोहोचले. दरम्यान, अपहरणाच्या जवळपास तीन तासांनंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली.’’ (Santosh Deshmukh Murder)

पवनचक्कीचा वाद, खंडणीला विरोध

या हत्येनंतर साहजिकच हत्येमागच्या कारणांचा शोध सुरू झाला. त्यात पहिले कारण समोर आले ते पवनचक्कीचा वाद. धनंजय देशमुख म्हणजेच मृत संतोष देशमुख यांच्या भावानेच या कारणाची माहिती सर्वप्रथम माध्यमांना दिली.

धनंजय देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘‘६ डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोग येथील असल्याने सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. तसेच मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती.’’ (Santosh Deshmukh Murder)

याच गोष्टीचा राग मनात धरून अपहरणकर्त्यानी त्यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, बीड पोलिसांनी देखील या वादातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला होता.

बीड पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. अजुन काही जणांचा शोध सुरु होता. पोलिसांची पथके त्वरेने कामाला लागली होती. (Santosh Deshmukh Murder)

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चौथ्या आरोपीला म्हणजेच विष्णू चाटे याला अटक करण्यात आली. विष्णू चाटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जवळ पाठलाग करून अटक केली आहे..

दरम्यान या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले होतेच आणि त्यांचाही शोध पोलिस घेत होते.

या दरम्यान बीड जिल्ह्यात या खून प्रकरणामुळे मराठा विरुद्ध वंजारी अशा संघर्षाला सुरुवात झाली. यावर प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख म्हणाले होते की, ‘‘मी आतापर्यंत २२ वर्षांत जे माझ्या घरात अन्न खातोय, ते वंजारी समाजाचे शेतकरी पिकवत आहेत. जातीयवादाचा विषय असता तर त्यांचे आणि आमचे नाते एवढी वर्षे टिकले नसते. या गोष्टीची शहानिशा केली तर हा जातीयवादाचा मुद्दा नाही हे कळेल.” (Santosh Deshmukh Murder)

पोलिसांचा तीन तास टाईमपास

धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर आरोप करताना असेही म्हटले होते, ‘‘केज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता तीन तास टाईमपास केला. जवळपास तीन तासांनंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली. (Santosh Deshmukh Murder)

‘‘पोलिसांनी लवकरात लवकरात तक्रार दाखल करून घेतली असती आणि कारवाई सुरू केली असती तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता,’’ असेही ते पुढे म्हणाले.

कराडचे नाव आले समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवरील कारवाईवर भाष्य केले होते. ते म्हणाले, ‘‘या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे तर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे.’’ संतोष देशमुख प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. हे प्रकरण शांत होतच नव्हते. कारण अजून काही नेत्यांची एन्ट्री या प्रकरणाचे महत्त्व  वाढवणार होती. प्रकरण माध्यमे आणि विरोधकांनी उचलून धरलेले असताना या प्रकरणात नाट्यमय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले तो वाल्मिक कराडचा. या गंभीर हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचा असणाऱ्या वाल्मिक कराडचा सहभाग असल्याची तेथील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. हे प्रकरण तोपर्यंत महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाऊन पोहोचले होते. (Santosh Deshmukh Murder)

संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तत्काळ अटक करून प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही दानवे यांनी सभागृहात केली. १२ डिसेंबर रोजीच दानवे यांनी माध्यमांशी बोलताना पोलीस आणि आरोपींमध्ये संगनमत असल्याची प्रतिक्रिया दिली. १६ डिसेंबरला दानवेंनी हा मुद्दा विधिमंडळात मांडून घटनेचे गांभीर्य सभागृहाला सांगितले.

तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, ‘‘या प्रकरणातील एक आरोपी वाल्मिक कराडची गुन्हेगारी पार्श्वभूमी बीडमधल्या छोट्यातल्या छोट्या पोरांनाही माहीत आहे. वाल्मिक कराडने कोणालीही उचलावे, कोणालाही मारावे आणि त्याचा मृतदेह गायब करावा, असा आजपर्यंतचा बीडचा इतिहास आहे. मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधी हे सगळे घडते आणि त्याची दखलीही घेतली जात नाही. चौकशी करणारे पोलीस आरोपींबरोबर चहापान करताना दिसतात, हे संस्कारक्षम राज्याची मानहाणी करणारे आहे.’’

पंकजा मुंडेचा ‘तो’ व्हिडीओ

आमदार संदीप क्षीरसागर यांनी सोशल मीडियावरुन संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं आहे की, ‘‘आज विधिमंडळ परिसरात केज तालुक्यातील संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या संदर्भाने न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला. वाल्मिक कराडचे फोन कॉल तपासले तर यातील सत्य पुराव्यासह पुढे येईल. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे, अशी मागणी मी केली. आठवडाभरात सरकारने योग्य पावली उचलली नाही तर बीडमधील जनता रस्त्यावर उतरेल. आता या प्रकरणात राज्यातील दिग्गज नेते उतरल्यामुळे धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पनाला लागली होती. त्यातच वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचे पानही हलत नाही असे विधान केलेला पंकजा मुंडे यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आणि कराड आणि धनंजय मुंडेंच्या संबंधांवर शिक्कामोर्तबच झाले.

एसआयटी चौकशीची घोषणा

विरोधकांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, या प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाईल. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्राने गांभीर्यानेच घेतल्या आहेत आणि गांभीर्यानेच घेईल. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी १६ डिसेंबर रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या(CID) पथकाने देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली होती. मृत संतोष देशमुख यांच्या भावाशी या पथकाने संवाद साधला होता. यानंतर या प्रकरणाला गती मिळाली. या संपूर्ण प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर मुख्य आरोपी वाल्मिक कराडविरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याचे समोर आले. त्यानंतर खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला होता.

संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडीओही सीआयडीकडे असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळं आता या प्रकरणी सुनावणी होणाऱ्या सुनावणीत वाल्मिक कराड मुख्य आरोपी असेल हे आता नक्की  झाले होते. पण तरीही अजुन वाल्मिक कराड सापडला नव्हता. ९ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर वाल्मिक कराड अखेर पुण्यातील सीआयडी कार्यालयात ३१ डिसेंबर रोजी शरण आला. सीआयडी कार्यालयातच त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर त्याला केजला पाठवण्यात आले. (Santosh Deshmukh Murder)

वाल्मिक कराडला केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी कराडने एक व्हिडीओ शेअर केला होता त्या तो म्हणाला होता की, केज पोलिस स्टेशनला खोटी फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनीचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे.

आमदार धस यांची एंट्री

कराड शरण येताच एक महत्त्वाचे राजकीय नाव या प्रकरणात हिरीरीने पुढे आले आणि ते म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस. धस यांनी विधिमंडळासह माध्यमांसमोर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या तुफान फैरी झाडल्या. विधिमंडळात बोलताना ते म्हणाले की, ‘‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे, सीआयडीसमोर वाल्मिक कराडला शरण यावे लागले आहे. या कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. सीआयडी अधिकाऱ्यांकडून कराडच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. यामुळेच कराड शरण आला. कराडच्या मालमत्ता लवकरात लवकर जप्त झाल्या पाहिजेत आणि ते झाल्याशिवाय ‘आका’ने केलेले इतर गुन्हे उघडे पडणार नाहीत.

घरगडी ते प्रती पालकमंत्री

हळूहळू कराड हा तपासाचा केंद्रबिंदू झाला आणि त्याच्या संपत्तीच्या, दहशतीच्या चर्चा व्हायला लागल्या. कराडची बेहिशेबी संपत्ती, पुण्यातले आलिशान फ्लॅट आणि शेकडो एकर शेती या सगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या. गोपीनाथ मुंडेंचा घरगडी असणारा कराड बीडच्या राजकारणात प्रतिपालक मंत्री कसा बनला त्याचा प्रवास समोर आला. पोलिसांवर, सरकारी अधिकाऱ्यांवर त्याचा असलेला दबाव या सगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या. सोबत परळीच्या राजकारणात आणि अर्थकारणात महत्वाची भूमीका असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प चर्चेत आला. या प्रकल्पात तयार होणाऱ्या राखेच्या अवैध वाहतुकीने इथल्या राजकारणावर अंकुश ठेवल्याचेही समोर आले.

मुंडेंचा राजीनामा…

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाही पुढे आल्या होत्या. पण या प्रकरणात आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. तोपर्यंत सर्वच आरोपींची नावे समोर आली होती. त्यात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे ही नावे समोर आली. अखेर दोन महिन्यांनी देशमुख हत्या प्रकरणातले हादरवून टाकणारे फोटो समोर आले. महाराष्ट्राच्या पायाखालची वाळू सरकली. कोणत्याही संवेदनशील माणसांच्या मेंदूपर्यंत कळ पोहोचवणारे हे क्रुरतेचा कळस गाठणारे हे फोटो माध्यमांनी दाखवले. मग मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला काही क्षणच उरलेत अशीच स्थिती निर्माण झाली. विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि या प्रकरणाला पुन्हा एक वळण मिळाले.

हेही वाचा :
फडणवीस, अजित पवारांची अब्रू धुळीला मिळवून धनंजय मुंडे यांचा राजीनामा

 दोन महिन्यांपूर्वी फोटो येऊनही फडणवीसांना झोप कशी लागली?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00