नवी दिल्ली : निवडणुकांत मतदारांचा व्यापक सहभाग रहावा, यासाठी देशपातळीवर राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल भारतीय माहिती सेवा अधिकारी संतोष अजमेरा यांना २०व्या आंतरराष्ट्रीय निवडणूक व्यवहार संगोष्ठी आणि पुरस्कार समारंभात सन्मानित करण्यात आले. (Santosh Ajmera)
१५ ते १८ डिसेंबर दरम्यान डोमिनिकन रिपब्लिक येथे हा कार्यक्रम पार पडला. इंटरनॅशनल सेंटर फॉर पार्लमेंटरी स्टडीज (ICPS) ने ‘जुंटा सेंट्रल इलेक्टोरल डे’ला पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. रिपब्लिका डोमिनिकाना यांच्या सहकार्याने कार्यक्रम झाला. अजमेरा यांच्या वतीने डोमिनिकन रिपब्लिकमधील भारतीय राजदूतांनी पुरस्कार स्वीकारला.
अजमेरा यांनी भारतीय निवडणूक आयोगातील कार्यकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. तिथे त्यांनी साडेतीन वर्षांहून अधिक काळ सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन कार्यक्रमाचे नेतृत्व केले. माध्यमविषयक विशेष मोहिमा, मतदारांचा सहभाग, आणि सहकार्याद्वारे भारताच्या विविध लोकसंख्याशास्त्रीय आणि सांस्कृतिक परिदृश्यात मतदार जागरूकता वाढविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (Santosh Ajmera)
चुनाव का पर्व, देश का गर्व
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान, अजमेरा यांनी ‘चुनाव का पर्व, देश का गर्व’ या बॅनरखाली एक महत्त्वाकांक्षी प्रचार मोहीम राबवली. या उपक्रमात शहरी मतदारांबद्दलची उदासीनता, पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये जागरूकतेचा अभाव आणि निवडणुकीत महिलांच्या सहभागातील अडचणी यावर मात कशी करता येईल, या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
अजमेरा यांनी विविध मंत्रालये/विभाग, कॉर्पोरेट हाऊसेस/स्टार्ट-अप्स, सेलिब्रिटी, संस्था इत्यादींशी सक्रिय आणि सतत संपर्क साधला. त्यामुळे तळागाळापर्यंत जागृती वाढली. जनसंवाद माध्यमांतील मोहिमा आणि समाज माध्यमातून प्रचंड जनजागृती केली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. (Santosh Ajmera)
नागरिकांना निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणून त्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवला. तसेच मतदारांचे सर्वंकष समाधान केले त्याबद्दल त्यांना हा आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, असे या प्रशस्तिपत्रात नमूद करण्यात आले आहे.
अजमेरा हे कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. शिवाय ते एक उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू, लेखक, स्तंभलेखकही आहेत. यापूर्वी, डिजिटल स्पेस क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारने २०१४ चा वेबरत्न प्लॅटिनम पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. (Santosh Ajmera)
आंतरराष्ट्रीय संस्थेकडून असा सन्मान मिळाल्याचा खूप आनंद आहे. संपूर्ण लोकशाही व्यवस्थेत भारतीय निवडणूक आयोग ही महत्त्वाची संस्था आहे. भारतीय निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या संपूर्ण निवडणूक यंत्रणेच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाची ही पोचपावती आहे.
-संतोष अजमेरा
हेही वाचा :
- झोपेत श्वास अडखळणाऱ्या विकारावरील औषधाला मंजुरी
- ‘पेगासस-एनएसओ’ला अमेरिकन कोर्टाचा तडाखा
- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीला वेग