मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील ९० हजार कोटींच्या ठेवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डोळा आहे, अशी टीका शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली. (Sanjay Raut)
खासदार राऊत म्हणाले, “शिवसेनेची सत्ता असताना महापालिकेची अर्थव्यवस्था सक्षम आणि मजबूत होती. उद्धव ठाकरे यांनी ९० हजार कोटींच्या ठेवी या सुरक्षा म्हणून ठेवल्या होत्या. तीन वर्षांपासून निवडणूक नसल्याने प्रशासकीय कारभार आहे. महापालिकेतील या ९० हजार कोटींच्या ठेवींवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून पंतप्रधान मोदींचाही डोळा आहे”. हा जनतेच्या कराचा पैसा आहे. हा पैसा मुंबईच्याच नव्हे तर राज्याच्या सुरक्षेसाठी ठेवलेला पैसा होता. त्या ठेवी मोडून कारभार करत असाल तर याचा अर्थ तुमचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलडमडलेले आहे. आणि मुंबईची अवस्था बकाल आणि बिकट झालेली आहे असेही संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
खासदार राऊत यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, “जम्मू काश्मीरमधली लोक आंदोलन करतील आणि काश्मीर भारतात येईल असे राजनाथ सिंह म्हणाले. गेली १०वर्ष राजनाथ सिंह असेच म्हणत आहेत. राजनाथ सिंह, जयशंकर, अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की पाकव्याप्त काश्मीर आम्ही हिंदुस्थानात आणू. गेली १०ते ११ वर्ष सांगत आहेत. राजनाथ सिंह यांच्या हातात सैन्य आहे, त्यांना कुणी अडवलंय? निवडणुका आहेत म्हणून तुम्ही बालाकोटवर फेक हल्ला करू शकता. पुलवामात ४० जवानांच्या हत्या झाल्या, त्याचा बदला अद्याप घेऊ शकला नाहीत. हे ढोंग बंद करा असेही राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
परराष्ट्रमंत्री जयशंकर लंडनमध्ये यांनी जो पर्यंत पाकव्याप्त कश्मीर भारतात येत नाही तोवर कश्मीरचा प्रश्न सुटणार नाही, असे वक्तव्य केले आहे असे सांगून खासदार राऊत यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणी अडवलंय? असा प्रश्न केला. ५६ इंचाचे एवढे मोठे पंतप्रधान आहेत त्यांनी हालचाल करावी. देश तुमच्या पाठीशी राहिल. पण नुसतं बोलायचं, टाळ्या मिळवायच्या, लोकांना भ्रमित करायचे, अशी टीकाही राऊत यांनी केली. पाकिस्तान हा कमजोर देश आहे, चीनने आमची ४० हजार वर्ग मीटर जमीन गिळलेली आहे. चीन लडाखच्या पुढे आलेले आहेत, पँगाँग लेक त्यांनी ताब्यात घेतला आहे. त्या चीनने बळकावलेली जमीन आपल्याला परत घ्यायची आहे, हे बहुतेक राजनाथ सिंह विसरलेले आहेत असेही संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut)
हेही वाचा :
उपराष्ट्रपती धनखड हॉस्पिटलमध्ये दाखल
मणिपुरात संघर्ष उफाळला; निदर्शकाचा मृत्यू