जत : तालुक्यात दोन ठिकाणी गांजाची शेती उध्वस्त करून तब्बल ४६ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली जत पोलिसांनी केली. दोन्ही ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर, बिळूर येथील आरोपी फरार झाला असून डोर्ली येथील संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. (Sangli News)
जत तालुक्यातील बिळूर येथे गांजाच्या पिकाची लागवड सुरू असल्याची माहिती जत पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. हे पथक बिळूरमधील कल्लाप्पा भविकट्टी यांच्या डोण हद्दीत असलेल्या शेतात दाखल झाले. भविकट्टी हे अंध असल्याने त्यांनी आपली जमीन कसण्यासाठी वाटेकरी ठेवले होते. मात्र, या वाटेकराने तुरीच्या पिकात गांजाची लागवड केली होती.
पोलिसांनी तेथे छापा टाकल्यानंतर आरोपी पळून गेला. या ठिकाणाहून पोलिसांनी ४७२ किलो गांजा जप्त केला, ज्याची अंदाजे बाजारमूल्य नुसार ४० लाख रुपये आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे आणि हवालदार राज सावंत, विनोद सकटे, तोहीद मुल्ला, योगेश पाटोळे यांनी मोलाचे योगदान दिले. (Sangli News)
सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली डोर्ली येथे हिवरे रोडवर असणाऱ्या मारुती रामू रुपनूर यांच्या शेतावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी गोपनीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गांजाची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी तेथून बारा पोती गांजा जप्त केले, ज्याचे वजन ६० किलो होते आणि याची किंमत सुमारे ६ लाख रुपये होती.
या कारवाईत सहाय्यक निरीक्षक बिराप्पा लातूरे, उपनिरीक्षक मनीषा नारायणकर, सुनील व्हनखंडे, केरबा चव्हाण, प्रथमेश ऐवळे आणि पार्वती चौगुले हे सहभागी होते. जत तालुक्यातील या दोन्ही मोठ्या कारवायांमुळे पोलिसांनी गांजाच्या अवैध लागवडीवर मोठा आघात केला आहे. अशा कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे रोखण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
- जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, हरियाणात भाजपने घेतली आघाडी
- संविधान रक्षणाची लढाई करण्याऱ्या राहूल गांधींना शक्ती द्या; शाहू छत्रपतींचे आवाहन
- हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी