Home » Blog » Delhi Sahitya Sammelan शिंदे-पवार आणि संमेलनाचे राजकारण

Delhi Sahitya Sammelan शिंदे-पवार आणि संमेलनाचे राजकारण

by प्रतिनिधी
0 comments

राजधानी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार समारंभ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद्चंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ झाल्यामुळे दिल्लीसह महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. तसे ते स्वाभाविकही आहे. कारण या कार्यक्रमानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावरच टीका केली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न इथे आहे.(Delhi Sahitya Sammelan)

एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभाची जी निमंत्रण पत्रिका होती, त्यावर `सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली` यांच्यातर्फे महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार असा उल्लेख आहे. या समारंभात एकनाथ शिंदे यांना संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या निमंत्रण पत्रिकेत पुरस्कर्ते – एकनाथ शिंदे असा उल्लेख होता. खरेतर ते पुरस्कारार्थी किंवा सोप्या भाषेत गौरवमूर्ती असे असावयास हवे होते. पण अनवधानाने का होईना संयोजकांनी खरे छापले. म्हणजे पुरस्कर्ते. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनी पुरस्कृत केलेला पुरस्कार एकनाथ शिंदे यांना दिला गेला. ते खरेही आहे.

पुरस्कार कुणी दिला?

कार्यक्रमाच्या पत्रिकेवर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नाव आहे. दिल्ली साहित्य संमेलनाचा उल्लेख आहे. पत्रिकेवर दिल्ली साहित्य संमेलनाचे आणि सरहद संस्थेचे लोगो आहेत. निमंत्रकांमध्ये साहित्य महामंडळाशी संबंधित कुणाची नावे नाहीत. वैभव डांगे, ज्ञानेश्वर मुळे, सचिन इटकर, निवेदिता वैशंपायन, राजेश खरात, लेशपाल जवळगे आणि अतुल बोकरिया यांची नावे आहेत. ही सगळी मंडळी संमेलनाच्या संयोजन समितीतली आहेत. त्यांचा महामंडळाशी काही संबंध नाही.

शरद पवार आणि एकनाथ शिंदे

सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा म्हणजे शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार. त्यावर संजय राऊत यांनी कठोर शब्दात टीका यामुळे दिल्लीतील वातावरण तापले आहे.

आपल्याला आठवत असेल, मुंबईत पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी संमेलनाध्यक्ष वसंत बापट यांनी केलेल्या टीकेवरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्य संमेलनाला बैलांचा बाजार म्हटले होते. त्यानंतर पंचवीस वर्षांनी ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दिल्लीतील संमेलन हे दलालांचे संमेलन असल्याचे म्हटले आहे. पंचवीस वर्षांत साहित्य संमेलनाने बैलबाजारापासून दलालांच्या संमेलनापर्यंतची प्रगती केली असं म्हणायचं का? संजय राऊत यांनी केलेली टीका अत्यंत कडवट आहे. परंतु ही वेळ संमेलनावर का आली, याचाही विचार करावयास हवा.(Delhi Sahitya Sammelan)

यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात…

पहिला प्रश्न म्हणजे महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार नेमका कुणाचा आहे? साहित्य महामंडळाचा तर असा काही पुरस्कार ऐकिवात नाही. निमंत्रण पत्रिकेवर महामंडळाच्या संमेलनाचा लोगो आहे. म्हणजे महामंडळाला हात झटकता येणार नाहीत. महामंडळाला न विचारता संयोजकांनी परस्पर केलेला हा कारभार दिसतो आहे. महामंडळाचे लोक आश्रितासारखे संयोजकांच्या मेहेरबानीवर असल्यासारखे वागायला लागतात तेव्हा संयोजक मुजोर बनतात. आणि संमेलनाच्या मांडवात संयोजकांच्या सोयीचे साहित्यबाह्य, औचित्यभंग करणारे बरेच काही घडत राहते. एकशे चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या संमेलनाला कुणीही कसेही वाकवायला लागते, तेव्हा महामंडळावरच्या मंडळींची फक्त फक्त लाचारीच दिसून येते. जी यापूर्वी अनेकदा दिसून आली आहे. यावेळी ती पुन्हा दिसली. दुर्दैवाची बाब म्हणजे देशाच्या राजधानीतल्या संमेलनात ती दिसली.(Delhi Sahitya Sammelan)

सरहद संस्थेचा हा पुरस्कार असेल तर त्यांनी साहित्य संमेलनाचा लोगो का वापरला? कारण संयोजकांना माहीत आहे, की आपण कसेही वागलो तरी महामंडळ आपले काही बिघडवू शकणार नाही. एखादा बाईट प्रसारमाध्यमांना देऊन हात चोळीत बसतील.
दुसरा मुद्दा असा की, महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना कोणत्या निकषावर दिला? महादजी शिंदे साता-याचे आणि एकनाथ शिंदेही साता-याचे म्हणून! व्वा ! अर्थात पुरस्कार कुणाला द्यायचा हा तो देणा-या संस्थेचा अधिकार असतो. त्यानुसार सरहद संस्थेने तो दिला. त्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते. परंतु त्यासाठी त्यांनी संमेलनाच्या नावाचा वापर करावयास नको होता.

संमेलनाचे राजकारण

संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीत मराठीचा डंका वाजवायचा उद्देश त्यामागे असू शकतो. दिल्लीत महाराष्ट्राचा डंका वाजवायचा तर महाराष्ट्रात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. मोठी माणसं आहेत. एकनाथ शिंदे यांचं अलीकडचं राजकारण, दिल्लीच्या सत्तेपुढं लाचार होऊन केलेला कारभार हे निश्चितच महाराष्ट्राला कमीपणा आणणारं आहे. अलीकडच्या काळात त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात दुय्यम, तिय्यम महत्त्व मिळू लागलंय. त्या पार्श्वभूमीवर त्यांचं मार्केटिंग करण्यासाठीचा हा उपद्व्याप होता का?
आपलं महत्त्व वाढवण्यासाठी त्यांच्याकडून पुन्हा पक्ष फोडीचं राजकारण केलं जातंय. ऑपरेशन टायगरसारख्या वावड्या उडवल्या जाताहेत. हे महाराष्ट्रासाठी कोणत्याही पातळीवर भूषणावह नाही. या सगळ्या राजकारणात साहित्य संमेलन सहभागी झालंय का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. साहित्य संमेलन राजकारण्यांच्या आश्रयानं होणं यात काही गैर नाही. परंतु ते कुणाच्यातरी राजकारणासाठी वापरणं गैरच नव्हे, तर निषेधार्ह आहे.
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे कर्तृत्ववान नेते म्हणून दिल्लीत डंका वाजवणे म्हणजे महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून इंडिया गॉट लॅटेंटसारख्या भाडिपाच्या कार्यक्रमाचं किंवा लोककला म्हणून म्हणून गौतमी पाटीलच्या भोजपुरी स्टाईल नाचगाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासारखं आहे.

राहिला मुद्दा शरद पवार यांचा…

शरद पवार, नितीन गडकरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातले वेगळ्या स्कूलचे नेते आहेत. त्यांच्या विचारधारा वेगळ्या असल्या तरी त्यांचं राजकारण उदारमतवादी आहे. उद्या शरद पवारांना अजित पवारांच्या सत्काराला बोलावलं तरी ते हजर राहतील. आणि अजित पवारांच्या कार्यशैलीचं नेमकेपणाने गुणवर्णन करतील. नितीन गडकरींना नाना पटोलेंच्या सत्काराला बोलावलं तरी ते जातील आणि नाना पटोलेंच्या धडाडीचं कौतुक करतील. महाराष्ट्राच्या राजकारणातले हे दोघे दुर्मीळ नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही उदारमतवादी परंपरा संपुष्टात आली आहे. त्यामुळं त्यांच्या दृष्टिकोनातून शरद पवार किंवा नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्याकडे पाहणे योग्य ठरणार नाही. (Delhi Sahitya Sammelan)

संजय राऊत यांची टीका

तरीसुद्धा संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर केलेली टीका रास्तच म्हणावी लागेल. कारण एकनाथ शिंदे यांनी जे राजकारण केले त्याचे खोलवर घाव उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षावर झाले आहेत. ते कधीही न भरून येणारे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सत्काराला गेल्यामुळं राऊत यांनी शरद पवारांच्यावर टीका करणं चुकीचं म्हणता येणार नाही. त्यांची भावना त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केली. याचा अर्थ लगेच पवार-ठाकरे यांच्यात दरी निर्माण होईल असंही समजण्याचं कारण नाही.

मराठी माणसांचे हसे

साहित्य संमेलन दिल्लीत होतंय. त्याची चर्चा साहित्याच्या अंगाने व्हायला हवी. मराठी भाषा,साहित्याच्या अनुषंगाने चर्चा व्हायला हवी. दुर्दैवाने त्याऐवजी राजकारणाची चर्चा होतेय. संमेलन गाजवण्याच्या नादात संमेलनाचे बारा वाजवण्याचे उद्योग सुरू आहेत. एकशे चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या ९८ व्या संमेलनाच्या निमित्ताने एवढा उथळपणा बरा नव्हे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राच हसे केले तेवढे पुरेसे आहे. संमेलनाच्या निमित्ताने मराठी माणसांचे सामर्थ्य दाखवण्याच्या नादात मराठी समूहाचे हसे होणार नाही, याची काळजी साहित्य महामंडळाने आणि संमेलनाच्या आयोजकांनी घ्यायला हवी.

हेही वाचाः
Chhawa : ‘छावा’ची ओपनिंग १० कोटींकडे
Sanjay D. patil : राज्यपालांच्या हस्ते डॉ. संजय डी. पाटील यांचा गौरव
Prakash pawar : डॉ. प्रकाश पवार चिकित्सक विश्लेषक

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00