मायामी : बेलारुसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंकाने रविवारी मायामी ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यामध्ये तिने ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. (Sabalenka)
जागतिक क्रमवारीत सबालेंका पहिल्या, तर पेग्युला चौथ्या स्थानी आहे. या स्पर्धेपूर्वी अमेरिकेतच झालेल्या इंडियन वेल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत सबालेंकाला मिरा अँड्रिव्हाकडून पराभूत झाल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यावेळी, पेग्युलाही तिला असाच पराभवाचा धक्का देणार का, याविषयी उत्सुकता होती. मात्र, सबालेंकाने यावेळी प्रतिस्पर्ध्याला वरचढ ठरू दिले नाही. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी मिळून तब्बल सातवेळा परस्परांची सर्व्हिस ब्रेक केली. या सेटमध्ये सबालेंका ६-५ अशी आघाडीवर असताना पेग्युलासमोर सर्व्हिस राखण्याचे आव्हान होते. मात्र, मोक्याच्या क्षणी फोरहँड ड्रॉपचा फटका खेळून सबालेंकाने तिची सर्व्हिस भेदली आणि हा सेट ७-५ असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. (Sabalenka)
दुसऱ्या सेटमध्ये, सुरुवातीच्या चार गेममध्ये सबालेंकाने दोनवेळा पेग्युलाची सर्व्हिस भेदत ३-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतरही तिने पेग्युलाला पुनरागमनाची संधी दिली नाही आणि अवघ्या २७ मिनिटांमध्ये हा सेट जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. सबालेंकाला प्रथमच मायामी ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यात यश आले. त्याचप्रमाणे, यंदाच्या मोसमातील डब्ल्यूटीए-१००० दर्जाचे तिचे हे दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी, जानेवारीमध्ये ती ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन ओपन टेनिस स्पर्धेची विजेती ठरली होती. २६ वर्षीय सबालेंकाने व्यावसायिक टेनिस कारकिर्दीत जिंकलेल्या एकूण १९ पैकी १७ स्पर्धा हार्ड कोर्टवरच्या आहेत. तिच्या नावावर आतापर्यंत तीन ग्रँड स्लॅम विजेतेपदे असून या तिन्ही ग्रँड स्लॅम स्पर्धाही तिने हार्डकोर्टवरच जिंकलेल्या आहेत. तिने २०२३ व २०२४ ची ऑस्ट्रेलियन ओपन आणि २०२४ ची अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. (Sabalenka)
हेही वाचा :