ब्युनॉस आयरिस : भारताचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात पुरुष गटामध्ये सुवर्णपदक जिंकले. भारताने हे स्पर्धेतील दुसरे सुवर्ण असून याबरोबरच भारतीय नेमबाजांनी जिंकलेल्या एकूण पदकांची संख्या चारवर पोहोचली आहे. (Rudrankksh Patil)
मूळचा ठाण्याचा असणाऱ्या २१ वर्षीय रुद्रांक्षला मागील वर्षी पॅरिस ऑलिंपिककरिता भारतीय संघात स्थान मिळवता आले नव्हते. त्यावेळी पदकाची हुकलेली संधी त्याने वर्ल्ड कपमध्ये साधली. सोमवारी १० मी. एअर रायफलच्या प्राथमिक फेरीमध्ये तो ६३३.७ गुणांसह दुसऱ्या स्थानी होता. विशेष म्हणजे, भारताचाच अर्जुन बाबुता प्राथमिक फेरीत ६३४.५ गुणांसह अग्रस्थानी होता. अंतिम फेरीत मात्र त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. रुद्रांक्षने मात्र अंतिम फेरीच्या पहिल्या राउंडपासूनच आघाडी टिकवून ठेवली. (Rudrankksh Patil)
पहिल्या राउंडअखेर ५३.२, तर दुसऱ्या राउंडअखेर १०५.९ गुण मिळवून तो आघाडीवर होता. या दोन्ही राउंडमध्ये त्याने प्रत्येक शॉटवर दहापेक्षा अधिक गुणांचा वेध घेतला. एलिमिनेशन राउंडमध्ये त्याने ही आघाडी वाढवत नेली. संपूर्ण अंतिम फेरीत एक ९.९ गुणांचा शॉट वगळता रुद्रांक्षचे सर्व शॉट्स १० गुणांपलीकडचे होते. एलिमिनेशन राउंडमध्ये तर त्याने दोनवेळा सर्वोच्च १०.९ गुण मिळवले. या राउंडअखेर २५२.९ गुणांसह त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले.(Rudrankksh Patil)
हंगेरीचा इस्तवान पेनी २५१.७ गुणांसह रौप्य, तर यजमान अर्जेंटिनाचा मार्सेलो गुटिरेझ हा २३०.१ गुणांसह ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. अर्जुनला अंतिम फेरीत केवळ १४४.९ गुणच मिळवता आल्यामुळे तो सातव्या स्थानावर राहिला. या स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या सिफत कौर समाराने ५० मी. रायफल थ्री पोझिशन प्रकारात महिला गटामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. चैन सिंहने याच प्रकारातील पुरुष गटांत ब्राँझपदक मिळवले. याशिवाय, भारताच्या एशा सिंहने २५ मी. पिस्टल प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. (Rudrankksh Patil)
हेही वाचा :
बुमराह मुंबई संघात परतला