जळगाव; प्रतिनिधी : मोक्याच्या चेकपोस्टवर नियुक्ती करण्यासाठी तीन लाखाची लाच घेणाऱ्या जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. आरटीओ दीपक पाटील यांनी कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, ठाणे या ठिकाणीही काम केले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या एसीबी पथकाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव आरटीओमधील कार्यरत असलेल्या नवापूर चेकपोस्टवर बदली करण्यासाठी दीपक पाटील यांनी खासगी पंटर भिकन भावे यांच्यामार्फत तक्रारदार असलेल्या अधिकाऱ्याकडे लाच मागितली होती. तक्रारदार अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खातरजमा केली. आज गुरुवारी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी पंटर भिकन भावे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराच्या घरात लाच घेताना रंगेहाथ पकडले. संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे, पोलिस निरीक्षक अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कारवाई केली. दरम्यान दीपक पाटील यांच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, ठाणे यांनी घरांची झडती घेण्यास पथके रवाना करण्यात आली आहेत.