Home » Blog » RR Borade बोराडे नावाचे साहित्य शिवार

RR Borade बोराडे नावाचे साहित्य शिवार

रा. रं. बोराडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची नाही, हे स्वतःपुरते ठरवले होते. ते कधीही त्या राजकारणात उतरले नाहीत. RR Borade

by प्रतिनिधी
0 comments

रा. रं. बोराडे सर गेले. महाराष्ट्र सरकारचा विंदा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्याकडची व्यवस्था अत्यंत निबर आहे. त्यामुळे लेखक-कलावंतांना चालते बोलते हिंडते फिरते असताना त्यांची दखल कुणाला घ्यावीशी वाटत नाही. बोराडे सरांना योग्य वेळी हा पुरस्कार मिळाला असता तर त्यांचे आयुष्य आणखी वाढले असते. परंतु मधल्या काळात प्रकाशझोतातल्या, सत्तेच्या जवळ असलेल्या आणि मोर्चेबांधणी वगैरे करणा-या काही लेखकांना हा पुरस्कार दिला गेला. बोराडे सर अशा कुठल्याच वर्गातले नसल्यामुळे मागे राहिले.(RR Borade)

बोराडे सर तत्त्वनिष्ठ होते. प्राचार्य म्हणून ते खूप कडक होते, असे अनेक लोक सांगतात. मला त्याचा अनुभव नाही. परंतु लेखक म्हणून, जिव्हाळ्याचे वडिलधारे स्नेही म्हणून त्यांच्याशी साडेतीन दशकांचा परिचय आहे. या काळात त्यांच्यातील सहृदयतेचाच अनुभव आला.

दमसा परिवाराचे घटक

तीसेक वर्षांपूर्वी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करायचे ठरवले होते. डॉ. रवींद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठात नोंदणीही केली होती. परंतु त्याच सुमारास दुस-या एका विद्यापीठात त्यांच्या साहित्यावर पीएचडी नुकतीच पूर्ण झाली होती. त्या तांत्रिक मुद्द्यावर नोंदणी रद्द करावी लागली. परंतु दरम्यानच्या काळात बोराडे सरांचं बहुतेक साहित्य वाचून झालं होतं. त्यांच्याशी जिव्हाळ्याचं नातंही निर्माण झालं होतं. प्रा. चंद्रकुमार नलगे सर हे त्यांचे स्नेही. त्यांच्यामुळं कोल्हापूरला त्यांचं वेळोवेळी येणं व्हायचं. नंतर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या कार्यक्रमासाठी मीही संपर्क साधू लागलो. आम्ही निरोप द्यायचा आणि त्यांनी यायचं. एवढा अकृत्रिम जिव्हाळा निर्माण झाला. मराठवाड्यात असूनही ते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या परिवाराचे घटक बनले होते. (RR Borade)

करुणेचा झुळझुळता झरा

भेटीमध्ये खूप मोकळेपणानं गप्पा व्हायच्या. वयात मोठं अंतर असूनही सरांनी ते कधी जाणवू दिलं नाही. ग्रामीण साहित्य चळवळीच्या प्रारंभीच्या काळातल्या खूप गोष्टी सांगायचे. डॉ. आनंद यादव सरांनी धरलेली समरसतेची वाट त्यांना पटलेली नव्हती. त्याबद्दल त्यांची नाराजी तीव्र होती. परक्या माणसाला वरवर रूक्ष वाटणा-या सरांच्या हृदयात करुणेचा झरा झुळझुळत असायचा. त्यांच्या साहित्यातून त्याचं दर्शन घडायचं. त्यांच्या नात्यागोत्यांच्या कथा आपल्याच नात्यातल्या माणसांच्या वाटतात. आमदार सौभाग्यवती कादंबरी आणि त्याचं झालेलं नाट्यरुपांतर यामुळं सरांना पुण्या-मुंबईतल्या साहित्य क्षेत्राच्या केंद्रस्थानी आणलं होतं. पाचोळा हा त्यांच्यासह मराठीतल्या हजारो वाचकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला. अंगभूत मर्यादांसह बोराडे सर लेखक म्हणून मोठे होतेच. माणूस म्हणून तेवढेच मोठे होते. त्यांनी नात्यागोत्यांच्या नुसत्या गोष्टी लिहिल्या नाहीत, तर व्यक्तिगत आयुष्यात अनेक माणसं जोडली. टिकवली. नांदायला गेलेल्या लेकीच्या आठवणींनी व्याकूळ होणा-या बापासारखे जिव्हाळ्याच्या माणसांच्या आठवणींनी ते व्याकूळ व्हायचे. (RR Borade)

साहित्य संस्कृती मंडळाला शिस्त

प्राचार्य म्हणून त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव होता. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याचा त्यांना चांगला उपयोग झाला. त्यांनी मंडळाच्या कामाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मंडळाकडून अनुदान दिल्या जाणा-या साहित्य संस्थांच्या कामालाही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. काहींना ते स्वायत्ततेसाठी बाधक वाटले, तरी सरांनी आग्रह सोडला नाही. मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत चांगल्या पुस्तकांनाच अनुदान मिळावे, यासाठी ते आग्रही होते. त्यासाठी परीक्षकांचे जे पॅनल होते त्यावर त्यांनी माझे नाव घेतले होते. अनेक कवितासंग्रह गठ्ठ्यागठ्ठ्यांनी माझ्याकडं यायचे. ती पुस्तके पाठवण्याचे काम कार्यालयीन पातळीवर होत असते. एकदा एक संग्रह मधेच माझ्याकडे आला. मंडळाचे अध्यक्ष असलेल्या बोराडे सरांनी फोन करून सांगितलं की, त्या संग्रहावरचं तुमचं स्पष्ट मत कळवा म्हणून. मी ते कळवलं.

नंतर मला कळलं की तो संग्रह नेमका संबंधित कवीच्या नातेवाईक असलेल्या परीक्षकांकडं गेला होता. त्याला अनुदान देण्याची शिफारस संबंधित परीक्षकांनी केली होती. कशी कुणास ठाऊक, बोराडे सरांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तो फेरपरीक्षणासाठी माझ्याकडं पाठवायला सांगितला. आणि व्यक्तिशः मला फोनही केला. इतक्या छोट्या गोष्टीमध्ये अध्यक्षांनी लक्ष घालण्याची आवश्यकता नव्हती. पण सर कामकाजाबाबत किती काटेकोर होते, हे यावरून लक्षात येते.(RR Borade)

ठाकरेंच्या राजकारणाचा फटका

अध्यक्षपदी असताना तत्कालीन राजकारणाचा मोठा फटका सरांना बसला. जेम्स लेनच्या पुस्तकाच्या वादाच्या काळात शिवसेनेची भूमिका चुकीची होती. त्या वादाला वेगळे वळण देण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील एका पुस्तकातील उतारा पुढचे मागचे संदर्भ वगळून जाहीर सभेत वाचून दाखवला. ठाकरे यांनी तो मुद्दाम खोडसाळपणा केला होता. ते पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले होते. त्याच्याशी बोराडे सरांचा तसा अर्थाअर्थी संबंध नव्हता. परंतु ठाकरे यांनी चिथावणी दिल्यामुळे त्याचा फटका मंडळाचे अध्यक्ष असलेल्या बोराडे सरांना बसला. सरांनी कांगावा न करता आणि विचलित न होता तो काळ शांतपणे व्यतीत केला. परंतु त्या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचे जाणवत होते.

तल्लख विनोदबुद्धी

सरांची प्रकृती गंभीर असली तरी विनोदबुद्धी तल्लख होती. एकदा कोल्हापुरात बोराडे सर, पानतावणे सर, बापूराव जगताप सर आणि नलगे सर आणि मी एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. दुपारची वेळ होती. त्या हॉटेलमध्ये Drinks strictly Prohibited अशी पाटी लावली होती. पाटी दोन ओळींमध्ये होती. वरच्या ओळीत Drinks strictly आणि खालच्या ओळीत Prohibited असे होते. भिंतीत खिळ्यांनी पाटी लावली होती. दोन्ही बाजूला जे खिळे होते, ते पहिल्या ओळीतल्या Drinks च्या आधी आणि strictly च्या नंतर आले होते. त्याकडे बघून बोराडे सर म्हणाले, `विजय, बापूराव म्हणतात Drinks strictly च्या पुढं फुल स्टॉप आहे. विचारता का हॉटेलवाल्याला?`.
सगळ्यांना ते पटलं आणि सगळे खळखळून हसले.

बापटांच्या भाषणाबद्दल नाराजी

बेळगावच्या साहित्य संमेलनात पूर्वाध्यक्ष वसंत बापट यांनी जोरदार भाषण केले. श्रोत्यांमध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सांस्कृतिक कार्यमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे बसले होते. (मुख्यमंत्रीसुद्धा साहित्य संमेलनाला श्रोत्यांमध्ये बसत होते, तो काळ फार लांबचा नाही.) समोर मुख्यमंत्री वगैरे पाहून वसंत बापटांना जरा चेवच आला होता. त्या उत्साहात त्यांनी सत्ताधा-यांना थोडे सुनावले. उद्घाटन समारंभ संपल्यानंतर मंडपातून बाहेर पडतानाच बोराडे सर भेटले. मला म्हणाले, `बापटांची बहुजन समाजातल्या नेत्यांप्रतीची मळमळ ऐकली का…..` बापटांचे बोलणे बोराडे सरांना आवडले नव्हते. औचित्यपूर्ण वाटले नव्हते.

संमेलनाध्यक्षपदाबाबत भूमिका

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची नाही, हे त्यांनी स्वतःपुरते ठरवले होते. आणि ते कधीही त्या राजकारणात उतरले नाहीत. फेसबुकवर ते सक्रीय होते. उतारवयात नव्या माध्यमाशी त्यांनी जुळवून घेतले, हे कौतुकास्पद होते. डोळ्यांचा त्रास सुरू होईपर्यंत ते तिथे मोकळेपणाने व्यक्त होत होते.

चार वर्षांपूर्वी औरंगाबादला शिवछत्रपती महाविद्यालयात माझे व्याख्यान होते. बोराडे सर आवर्जून कार्यक्रमाला आले होते. शेवटपर्यंत थांबले आणि संपल्यानंतर भेटूनही गेले. दुस-या दिवशी सरांचा फोन आला. म्हणाले, `विजय, कालचे तुमचे भाषण उत्तम झाले. मी सार्वजनिक समारंभांमध्ये जात नाही पण तुम्ही येणार म्हणून मुद्दाम आलो होतो. सुदैवाने माझे कानातले मशीन काम करीत होते, त्यामुळे भाषण चांगले ऐकता आले. खूप छान वाटले.`
बोराडे सरांच्या जाण्याने सगळे शिवार पोरके झाल्यासारखे वाटत आहे. सरांना भावपूर्ण आदरांजली!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00