कटक : भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डेमध्ये शानदार शतक झळकावताना काही विक्रमांच्या याद्यांमध्येही आगेकूच केली. वन-डेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने भारताचे माजी फलंदाज राहुल द्रविड यांना मागे टाकले. वन-डेमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. (Rohit Sharma)
रोहितने रविवारी ९० चेंडूंमध्ये १२ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करत ११९ धावांची खेळी केली. त्याचे हे वन-डेतील ३२ वे शतक ठरले. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने या सामन्यात इंग्लंडचा ४ विकेटनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. रोहितने या खेळीदरम्यान काही विक्रमांवर नाव कोरले. (Rohit Sharma)
- रोहितच्या नावावर वन-डेमध्ये १०,९८७ धावा आहेत. इंग्लंडविरुद्धच्या खेळीदरम्यान त्याने राहुल द्रविड (१०,८८९ धावा) यांना मागे टाकले. भारताकडून वन-डेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो आता चौथ्या, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहाव्या स्थानी पोहोचला आहे. भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (१८,४६३) नावे असून त्याच्याखालोखाल विराट कोहली (१३,९११) व सौरव गांगुली (११,३६३) हे आहेत.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारांत मिळून रोहितचे हे ४९ वे शतक ठरले. त्याने ४८ शतके नोंदवणाऱ्या राहुल द्रविड यांना मागे टाकले. या यादीत रोहित ‘टॉप टेन’मध्ये पोहोचला असून ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरसह संयुक्तरीत्या दहाव्या स्थानी आहे. रोहितने आतापर्यंत कसोटीमध्ये १२, वन-डेमध्ये ३२ आणि टी-२० क्रिकेटमध्ये पाच शतके झळकावली आहेत.
- रोहितच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये ३३८ षटकार आहेत. सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत तो ख्रिस गेलला (३३१ षटकार) मागे टाकत दुसऱ्या स्थानी पोहोचला. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहीद आफ्रिदी (३५१ षटकार) अग्रस्थानी आहे. तिन्ही प्रकारांत मिळून रोहितच्या नावावर ६३१ षटकार असून सहाशेचा टप्पा ओलांडणारा तो एकमेव फलंदाज आहे.
- वन-डेमध्ये धावांचा पाठलाग करताना रोहितने ६,०२६ धावा केल्या आहेत. या यादीत तो सचिन तेंडुलकर (८,७२०) आणि विराट कोहली (७,८५७) यांच्याखालोखाल तिसऱ्या स्थानावर आहे.
- वन-डे क्रिकेटमध्ये तीनशेहून अधिक धावांचा पाठलाग करताना रोहितने पाचवे शतक झळकावले. या यादीत तो इंग्लंडच्या जेसन रॉयसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी पोहोचला असून भारताचा विराट कोहली ९ शतकांसह अग्रस्थानी आहे.
हेही वाचा :