– प्रा. डॉ. जगन कराडे
विजयादशमीदिनी, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. भारताच्या इतिहासात ही क्रांतिकारी घटना होती. आजही धम्माचा स्वीकार करून वाटचाल करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तथापि, काही आव्हानेही उभी राहत आहेत. धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त विशेष लेख.
सम्राट अशोकाच्या आगमनानंतर इ. स. तिसऱ्या शतकापूर्वीपासून सुमारे हजार वर्षापेक्षा अधिक काळ भारतात बौद्ध धम्माचे वर्चस्व होते. हजार वर्षाचा हा कालावधी भारताच्या इतिहासात सर्वांगाने ‘सुवर्णयुग’ म्हणून गणला गेला. या काळातील शिक्षणपद्धतीमुळे ‘नालंदा’ आणि ‘तक्षशीला’ विद्यापीठे जगामध्ये नावलौकिकास पोहोचली होती. परदेशातून कितीतरी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी भारतात येत असत. नालंदा विद्यापीठाचे साहित्य किमान एक वर्षे जळत होते. बुद्ध धम्माचा प्रभाव भारतातल्या विविध संत अणि अनेक संस्कृतीवर झालेला दिसतो. अठराव्या शतकाच्या मध्यापासून भारतात धम्माचे पुनरुज्जीवन व्हायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
अनागरीक धम्मपालांचे कार्य
जानेवारी १८९१ साली श्रीलंकेतील अनागरीक धम्मपाल (१८६४-१९३३) या तरुण बौध्द यात्रेकरुच्या आगमनाने बौद्ध धम्माची चळवळ गतिमान झाली. सारनाथ आणि बुध्दगया येथील केविलवाणी स्थिती पाहून ते फार दु:खी झाले. धम्माच्या चळवळीला चालना देण्यासाठी त्यांनी ३१ मे १८९१ रोजी ‘महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. धम्म विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘महाबोधी अँड युनायटेड बुद्धीस्ट वर्ल्ड’ या नावाचे मासिकही सुरु केले. यानंतरच्या ४० वर्षाच्या कालावधीत बौद्ध तीर्थस्थळांना उजाळा मिळाला. अनागरीक धम्मपालाची महान आणि अत्युत्तम कृती म्हणजे बुध्दाच्या प्रथम प्रवचनाचे पवित्र ठिकाण सारनाथ येथील मूलगंधकुटी विहाराची निर्मिती होय. या निर्मितीमुळे जागतिक बौध्दांचे महत्त्वाचे आकर्षण केंद्र झाले. यांच्या कार्यातून धर्मानंद कोसंबी (१९०२) बोधानंद (१९१४), आनंद कौसल्यायन (१९२८), राहुल सांकृत्यायन (१९३०) आणि जगदीश कश्यप (१९३४) यांनी स्वत:ला धम्मकार्यासाठी वाहून घेतले. त्यामुळे भारतात धम्माच्या पुनरुज्जीवनाची चळवळ गतिमान झाली.
यापुढील टप्पा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करावा लागतो. १३ ऑक्टोबर १९३५ साली येवले येथे झालेल्या परिषदेमध्ये आपल्या बांधवांना त्यांनी धर्मांतरांचे आवाहन केले. असे असले तरी, तब्बल २० वर्षांनी त्यांनी कोणत्याही प्रबोधनाला बळी न पडता विविध धर्माचा सखोल अभ्यास केला. भारतीय व्यवस्थेमध्ये ‘देव’ आणि ‘मानव’ यांच्यातील दुवा म्हणून पुरोहित वर्ग तयार झाला होता. याच्याशिवाय कोणतेही कर्मकांड चालत नसे. अशा समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या ५ लाख अनुनयांना २२ प्रतिज्ञा देऊन धम्माची दीक्षा दिली. ही घटना मानसिक परिवर्तन घडविणारी भारतातीलच नव्हे; तर, जगातील एकमेव घटना आहे. त्यामुळे या क्रांतीला ‘धम्मक्रांती’ असे संबोधले जाते.
बुध्दाचा धम्म हा प्रज्ञा, शील आणि करुणेची शिकवण देतो. तो बुद्धीवादी असून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारा आहे. दलाई लामा यासंदर्भात म्हणतात, “हा साधा धर्म आहे. या धर्मात देवळांची गुंतागुंतीच्या तत्त्वज्ञानाची आवश्यकता नाही. आपली कार्यरत असणारी बुध्दी आणि आपले मन हेच देवळासमान आहे. कारण याचे तत्त्वज्ञान दयाळूपणाचे आहे”. या विचारामुळे अनेक लोक आपापल्या धर्माची तुलना करु लागले. ज्यांना-ज्यांना त्यांच्या धर्मात अन्यायी व्यवस्था तसेच भेदभावाचे चटके दिसू लागले किंवा अनुभवास आले त्यांना धम्माचे आकर्षण वाटू लागले. धम्म स्वीकारणारे कोणतीही अभिलाषा न बाळगता केवळ त्यांची तार्किकतेची बौद्धिक वाढ या कारणाने धम्म स्वीकारत आहेत.
देशभर प्रभाव
भारतातील बौद्धांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर ७३-७४ वर्षानंतरही ते त्यांच्या प्रभावाखाली आहेत. बुद्धाच्या विचारसरणीने अनेक लोकच नव्हे; तर राज्ये आणि देशही प्रभावीत झाले आहेत. भारतामध्ये विशेषत: महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, छत्तीसगडमध्ये बौध्दांची लोकसंख्या वाढत असताना दिसत आहे.
५ नोव्हेंबर २००१ साली उदितराज यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विविध जातींच्या ६० हजार लोकांनी तसेच विश्व बौध्द संघाचे सचिव भदंत संघप्रिय यांनी गुजरातमधील बडोदरा येथील ३ हजार लोकांनी तसेच यलप्पा वैदू, ॲड. एकनाथ आव्हाड, ॲड. शिवराज कोळीकर, प्रा. सुषमा अंधारे यांच्यासोबत ४२ भटक्या जमातींच्या प्रतिनिधीनी तसेच मातंग समाजातील १०० कार्यकर्त्यानी, ओबीसी महासंघाच्या तेली, कुणबी, कुंभार, लोहार आणि बंजारा या जातीच्या कार्यकर्त्यांनी तसेच माजी खासदार के. एस. आर. मूर्ती यांनी हैदराबाद येथे १ लाख लोकांसह धम्माचा आणि कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे १ लाख लोकांसह बौध्द धम्माचा स्वीकार केला. दिल्ली येथे १२ आय.ए.एस. अधिकाऱ्यासह ४ हजार लोकांनी धम्माचा स्वीकार केला. हैदराबाद, विशाखापट्टम, चेन्नई तिरुअनंतपुरम, भुवनेश्वर, रायपूर इत्यादी ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम झाले. संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १५०० पारधी लोकांनी तर परभणी जिह्यातील बोरी, ता. जिंतूर या गावातील श्रावस्तीनगर येथील पारधी, होलार, मातंग आणि मराठा पारधी आणि नाईकडा या आदिवासी जमातीच्या २०० कुटुंबीयांनी धम्माचा स्वीकार केला. या उल्लेखनीय घटनांवरून धम्माकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होते.
लक्षणीय प्रगती
बौध्दांमधील परिवर्तन पाहताना अनेक ठिकाणी बौद्ध अस्मिता जिवंत झालेल्या आहेत. त्यांची वैचारिक प्रगल्भता वाढलेली आहे. ते जात, धर्म आणि प्रांत या संकल्पनांच्या सीमारेषा पार करु लागले आहेत. बौद्धांची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. कारण बाबासाहेबांनी केलेल्या धम्मक्रांतीमुळे या समूहाची लक्षणीय प्रगती झालेली आहे. अनेक वर्षे वापरात न आलेले मनुष्यवळ कार्यरत झाले आहे. त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन सकारात्मक होत आहे. त्यांच्यामधील आत्मविश्वास अधिक वाढलेला आहे. त्यांनी शिक्षण, साहित्य, सांस्कृतिकविषयक निर्माण केलेला अवकाशही कौतुकास्पद आहे.
असे असले तरी जितका बदल व्हावयास हवा होता तितका बदल झालेला नाही. कारण मुळात जातीव्यवस्था हे भारताचे एक वेगळे वैशिष्ट्य असल्याने बऱ्याचअंशी जातीची मानसिकता घेऊन तो वावरतो आहे. जे-जे धम्म स्वीकारणारे आहेत तसेच अबौद्ध लोक धम्म स्वीकारतात त्याची नोंद शासन दरबारी अनुसूचित जातीमध्ये बौध्द यांची वेगळी नोंद होत नाही. तसेच बौद्ध स्थळांवरील अबौद्ध लोकांचा प्रभाव आहे. बौध्दांच्या हाती असणाऱ्या स्थळांवरही शासन पुन्हा कब्जा करताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या उदाहरणावरुन दिसून येते. त्यामुळे विहारे हीसुद्धा मंदिरांमध्ये रुपांतरीत होताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या आव्हानांना बौद्धांना सामोरे जावे लागत आहे.