प्रा. प्रशांत नागावकर : ‘मारा-साद’ ही जागतिक रंगभूमीवरील आधुनिक अभिजात नाट्यकलाकृती. जागतिक कीर्तीचे श्रेष्ठ नाटककार पीटर वाइस यांनी १९६४ साली हे नाटक लिहिले. ते जागतिक रंगभूमीवर गाजले. कोनरॅड स्वीनारस्की, पीटर ब्रुक अशा विख्यात दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले होते. रंगमंच आणि नाटक यांच्या शक्यतांचा शोध घेणारे चर्चात्मक आणि चर्चेला प्रेरित करणारे असे हे नाटक. (sangeet Mateevilay)
पीटर वाइस हे मूळ जर्मनी लेखक नाझींच्या विरोधी कारवायांमुळे त्यांना १९३४ मध्ये देश सोडून परागंदा व्हावे लागले. १९१६ ते १९८३ हा त्यांचा जीवनकाळ. वाइस यांनी साहित्य, चित्रकला, चित्रपट अशा विविध क्षेत्रात काम केले. नाटककार म्हणून त्यांची ख्याती अधिक आहे. १९६३ साली ‘नाईट विथ गेट्स’ आणि त्यानंतर १९६४ साली ‘मारा-साद’ हे नाटक लिहिले. (sangeet Mateevilay)
जॉ पॉल मारा आणि मार्कविस द साद हे दोघे फ्रेंच राजक्रांतीच्या काळातील विचारवंत समोरासमोर आले आहेत. या दोघांच्या विचारातील भेद हा नाटकाचा संघर्षात्मक गाभा आहे. मारा मनोरुग्णालयात कधीही नव्हता. परंतु त्वचारोगाच्या असह्य पिडेमुळे त्याला सतत बाथटबमध्ये बसून राहावे लागत असे. तसा तो बसलेला असतानाच त्याचा खून झाला, ही एक ऐतिहासिक गोष्ट.
साद मात्र मनोरुग्णालयातच होता. साद इतिहासातील एक चमत्कारिक मनुष्य विकृत म्हणून ओळखला गेला. अश्लील पुस्तके लिहिणारा, नीतीभ्रष्ट आणि वेडा असलेला तत्त्ववेत्ता होता. आपल्या जीवनात आणि साहित्यातून लैंगिक विकृतीचे दर्शन घडवलेले आहे. क्रौर्य हा लेखनाचा विषय बनवणारा पहिला लेखक. १८०१ ते १८१४ पर्यंतच्या वास्तव्यात त्याने तेथे नाटके बसवली. त्या वास्तव्याच्या काळात १८०८ रोजी मनोरुग्णालयाच्या सहकाराने मनोरुग्णालयातच नाटक साकार केले जाते, अशी कल्पना नाटककराने नाटकात केली आहे. सादच्या पुस्तकातून व्यक्त होणारे क्रौर्य आणि फ्रान्सच्या जनजीवनातून व्यक्त झालेले काव्य यांच्यातील परस्पर संबंधांचे चित्रण ‘मारा – साद’मध्ये झाले आहे. या नाटकात मात्र साद हा विकृत नीतीभ्रष्ट असा इथे राहत नाही तर अत्यंत संवेदनशील लेखक म्हणून व्यक्त होतो.(sangeet Mateevilay)
हे नाटक फ्रेंच राज्यक्रांतीवरचे प्रखर भाष्य आहे. जग हे मनोरुग्ण आहे. त्यातले मनोरुग्ण वेगवेगळ्या भूमिका करतात. क्रांतिकारकाच्या भूमिकाही हे रुग्ण करतात. याचा मागचा खास अर्थ म्हणजे क्रांतिकारकांचा हा वेडसरपणाचा काळ होता, हे सूचित करायचे आहे. क्रांतीच्या वेडसर वातावरणाची चित्रण करायचे तर मनोरुग्णालयाखेरीज अन्य समर्पक जागा नाही. क्रांती म्हणजे मनोरुग्णाच्या दडपलेल्या वासनांचा, विचारांचा प्रक्षोभक अनिर्बंध उद्रेक. या नाटकातून ती तीव्रतेने व्यक्त होतो.
या नाटकाचे मराठी रूपांतर ‘संगीत मतिविलय’ या नावाने कौस्तुभ नाईक यांनी केले आहे. तर यातील गाणी शिवप्रवण अळवणी आणि कौस्तुभ नाईक यांनी रचली आहेत. या नाटकात मुक्तछंदातील संवाद आहेत. लयबद्ध संवादांना अशी दृश्यांची जोड मिळाल्यामुळे नाटक निव्वळ शब्दप्रधान रहात नाही. हे संगीत मतिविलय या नाटकाच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य.(sangeet Mateevilay)
या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समूहाचा केलेला कलात्मक वापर. कलाकारांतील उत्स्फूर्तपणा आणि तितकीच सहजता यामुळे अवघा रंगमंचीय अवकाश व्यापून राहतो. साहजिकच मारा आणि साद यांच्यातील चर्चेचे केवळ नाटक राहत नाही. या दोन व्यक्तींच्या आसपास क्रांतीनंतरच्या काळातील जनता आहे, याचे भान रुग्णांचा समूह करून देत असतो. यामुळे फाशीचे दृश्य, हात तोडणे, डोके उडवणे, डोके खाली पडल्यावर त्याचा चेंडू करून खेळणे विजयी, किंकाळ्या फोडणे अशी विविध दृश्ये साकार होत राहतात. क्रांतीनंतरचे हिंसेचे थैमान या समूहाच्या हालचालीतून समर्थपणे व्यक्त होते. समूहातील कलाकारांच्या उन्माद निर्देशक हालचाली, असे विरोधभास तयार होतात क्रूरतेच्या या पार्श्वभूमीवर मारा आणि साद यांचा संवाद नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो.(sangeet Mateevilay)
या बरोबरच मारा, साद, सिमोन, कोर्डे या प्रमुख व्यक्तिरेखा अनुक्रमे रोहित पोतनीस, राजन जोशी, शलाका करवीरकर, रमा घोलकर यांनी साकारल्या आहेत. रोहित पोतनीसने माराचे सततचे सातत्याने अंग खाजवणे, आणि संवाद म्हणणे या गोष्टी सहजने केल्या आहेत. राजन जोशी कोल्हापूरच्या रंगभूमीवरील अनुभवी रंगकर्मी. सादचे तत्वज्ञानात्मक विचार त्यांनी ठामपणे व्यक्त केले आहेत.
शलाका करवीरकर यांनी सिमोन साकारली आहे. वैशिष्ट्यपूर्ण जखडल्यासारखी शरीराची ठेवण, वक्र आणि विचित्र हालचाली तिने अतिशय कष्टपूर्वक साकारल्या आहेत.
माराची हत्या करणाऱ्या कोर्डेची भूमिका रमा घोलकरनी केली आहे. निद्राव्याधी आणि खेदोन्माद जडलेल्या मुलीची भूमिका करणे सोपे नव्हते पण तिने ती जबाबदारीने साकारली आहे.
सतीश तांदळे यांनी दिग्दर्शकीय रचनेत पात्रांच्या तोंडी असलेल्या शब्दांनाच नव्हे तर आवाज, मुद्राभिनय, हावभाव, शारीरिक हालचाली, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य प्रकाश संगीत या साऱ्यांना महत्त्व दिले आहे
नाटक मुक्त छंदसदृश शैलीत लिहिलेले आणि चर्चात्मक आहे. असे असले तरी दृश्यात्मकतेकडे दुर्लक्ष झालेले नाही. मुद्राभिनय, देह विभ्रम, विविध अंगी अविर्भाव, हालचाली या साऱ्यांचा दिग्दर्शकाने कुशलतेने उपयोग केलेला आहे. तसेच रंगमंचावर असलेल्या पात्रांनी प्रसंगांमध्ये सहभागी असणे घटित्ताचा भाग बनणे हे त्यांच्या नाट्यकृतीचे वैशिष्ट्य आहे. नाटकात गंभीर आणि विनोदी, उदात्त आणि सवंग, काव्यात्मक आणि ओबडधोबड, बौद्धिक आणि शारीरिक अशा गोष्टी एकापुढे एक ठेवल्या गेल्या आहेत.
मारा आणि साद यांच्यातील वैचारिक द्वंद गायक आणि रुग्णांनी निर्माण केलेला समूहवृंद विचार संपन्न स्वगत, भाषणाच्या समकाल उभी राहिलेली दृश्यात्मकता या साऱ्यांनीच या नाटकाला बळ दिले आहे. त्यामुळे रूढार्थाने नाटकाला कथानक नसून हे नाटक खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. याबरोबर शब्द, ध्वनी आणि प्रतिमा या तिन्ही गोष्टींचा कलात्मक उपयोग केला आहे. यामुळे मारा आणि साद या ऐतिहासिक व्यक्तिरेखा न राहता त्यांचे कोणत्याही काळातील आत्मसंघर्ष अनुभवणाऱ्या व्यक्तिरेखांत रूपांतर होते. इथला समूह फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातल्या अभावग्रस्त जनतेचे प्रतिनिधित्व केवळ करत नाही तर कोणत्याही राजकीय सामाजिक स्थितीतील जनतेचे प्रतिनिधित्व करतो.
या नाटकातून क्रांतीला सार्वत्रिक कामभावनेचे यांत्रिक स्वरूप आलेले आहे, हे सूचित होते. कामभावनेच्या घोषातच हे नाटक संपते. रंगमंचावर आरडाओरडा, गोंधळ, धावपळ, एक अराजकता माजते या आराजकाला छेद देणारा एक स्वर मात्र उमटतो.
एकूणच नाटकाचे सादरीकरण खूपच चांगले झाले. या निमित्ताने एका जागतिक दर्जाच्या आधुनिक अभिजात नाट्यकलाकृतीचे पुन:स्मरण झाले.
(छाया : अर्जुन टाकळकर)
नाटक : संगीत मतिविलय
- लेखक : कौस्तुभ नाईक
- दिग्दर्शक : सतीश सदाशिव तांदळे
- सादरकर्ते : परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर
- संगीत/पार्श्वसंगीत : ऋषिकेश देशमाने
- स्वर रचना : शिवप्रणव अळवणी
- गीते : शिवप्रणव व कौस्तुभ नाईक
- नेपथ्य/वेशभूषा : अभय मणचेकर
- नृत्यदिग्दर्शन : आकाश लिगाडे
- प्रकाशयोजना : पार्थ घोरपडे
- रंगभूषा : सदानंद सूर्यवंशी
- निर्मिती प्रमुख : किरणसिंह चव्हाण
भूमिका आणि कलावंत
- मारा : रोहित पोतनीस
- साद : राजन जोशी
- सिमोन : शलाका करवीरकर
- कोर्डे : रमा घोलकर
- जॅक शास्त्री : गंधार जोग
हेही वाचा :
ताणलेल्या कॅनव्हासवरील ‘फर्सिकल इव्हेंट’
अस्वस्थ करणारे नाटक : कोंडमारा