महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मला न्याय मिळाला. पण हे चार महिने तुरुंगात कसे काढले, त्याची कल्पनाही करवत नाही. तरीही माझ्यासोबत ज्यांनी हे कृत्य केले, त्या सर्वांना मी माफ करतो… (Taslim Ali)
चार महिने तुरुंगात सडत राहिलो. कुटुंबाची आबाळ झाली. पैसे नसल्यामुळे मुलांनी शाळा सोडली. आजही उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. आजही मी बांगडी विक्रीसाठी वेगवेगळ्या राज्यात जातो. पण आता एकट्याने जायला भीती वाटते. त्यामुळे भाऊ किंवा अन्य सहकारी सोबतील घेऊन जातो, हे सांगताना तस्लीम अली यांच्या मनात असलेली भीती लपून राहत नाही…
तस्लीम मूळचे उत्तर प्रदेशच्या हरदोई गावचे. बांगड्या विक्री हा त्यांचा व्यवसाय. बहुसंख्य हिंदू असलेल्या भागात बांगड्या विकतो म्हणून जमावाने इंदौरमध्ये त्यांच्यावर हल्ला केला. जबर मारहाण केली. हिंदूंच्या गल्लीत पुन्हा पाऊल ठेवायचे नाही, अशी धमकीही दिली. २२ ऑगस्ट २०२१ ला ही घटना घडली. काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी हा हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर जाहीर झाला. अर्थात संवेदनशील नागिरकांनी त्या विरोधात निदर्शनेही केली. (Taslim Ali)
तस्लीम यांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली. रितसर गुन्हा दाखल झाला. मला मारहाण झाली. रोख दहा हजार रूपये, आधारकार्ड आणि इतर कागदपत्रेही लंपास केली. शिवाय २५ हजाराच्या बांगड्याही लुटल्या, असे तस्लीमने दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते.
पण काही चक्रे फिरली आणि पोलिसांनी तस्लीम यांच्याविरोधातच पोक्सो, विनयभंग, फसवणुकीसह ९ कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीने विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती. तस्लीम यांच्यावर खटला दाखल केला.
विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे तत्कालीन गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही शहानिशा न करता तस्लीम हिंदू नावाने बांगड्या विकत होते. त्यांच्याकडे दोन बनावट आधारकार्डही मिळाली होती, असे वक्तव्य केले होते.
दरम्यानच्या काळात राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. धर्माच्या आधारे अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला बहुसंख्याक असलेल्या परिसरात आल्यावर मारहाण कशी काय केली जाते, अशी विचारणा आयोगाने इंदौरच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली.
पण ‘पोक्सो’ न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी तस्लीम यांची निर्दोष सुटका केली. तस्लीमनी विनयभंग केला किंवा आपली ओळख लपविल्याचे पोलिस सिद्ध करू शकले नाहीत.
असे असले तरी तस्लीम यांना किमान चार महिने तुरुंगवासात खितपत पडावे लागले. ‘मला न्याय मिळाला. पण हे चार महिने तुरुंगात कसे काढले, त्याची पुन्हा कल्पनाही करवत नाही,’ या शब्दांत तस्लीम यांनी आपला दु:खावेग व्यक्त केला. तरीही माझ्यासोबत ज्यांनी हे कृत्य केले, त्या सर्वांना मी माफ करतो. माझा देशाच्या राज्यघटनेवर विश्वास आहे. सुटका झाल्यानंतर तस्लीम अलीची ही बोलकी प्रतिक्रीया. त्याची संवेदनशीलता सांगून जाते.
पण यानिमित्ताने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे…
तस्लीम यांचे वकील शेख अलीम सांगतात, ज्या मुलीने तक्रार दाखल केली असे सांगितले गेले त्या मुलीने तस्लीमला ओळखले नाही. शिवाय पोलिसांनी तिचा म्हणून जो जबाब नोंदवला होता तोही तिचा नव्हता, असे सिद्ध झाले आहे. या मुलीची काही लोकांनी दिशाभूल केली. घटनेच्या तीन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
बनावट आधारकार्ड असल्याचा आरोपही निराधार होता. याकडे शेख अलीम यांनी लक्ष वेधले. तस्लीम यांच्या गावचे विद्यमान आणि माजी सरपंचांची साक्ष येथे नोंद घेण्यासारखी आहे. आधारकार्डवरील नंबर एकच आहे आणि तस्लीम यांना दोन नावाने गावात ओळखले जाते, असे या दोघांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र अनावधानाने त्यांच आडनाव चुकीचे लावले गेले होते. ही दोन्ही कार्ड तस्लीम यांच्याकडे आहेत, असे शेख म्हणाले.
हेही वाचा :
- अभिनेत्रीच्या बहिणीने प्रियकराला जाळून मारले
- शेतकरी पुन्हा मोदी सरकारला घेरणार
- ३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटक्यांची शिक्षा, कोण आहेत नरगिस मोहम्मदी?