Home » Blog » RCB Captain : रजत पाटिदार ‘आरसीबी’चा कर्णधार

RCB Captain : रजत पाटिदार ‘आरसीबी’चा कर्णधार

आगामी आयपीएलमध्ये सांभाळणार नेतृत्वपदाची धुरा

by प्रतिनिधी
0 comments
RCB Captain

बेंगळुरू : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या आगामी मोसमासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या कर्णधारपदी रजत पाटिदारची निवड करण्यात आली. मागील तीन वर्षे दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डूप्लेसिसकडे बेंगळुरू संघाचे नेतृत्व होते. मात्र, मागील वर्षी झालेल्या लिलावापूर्वी आरसीबीने डूप्लेसिसला मुक्त केल्यामुळे त्यांना नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागला. (RCB Captain)
गुरुवारी बेंगळुरू संघाचे संचालक मो बोबट आणि मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्या उपस्थितीत पाटिदारची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. ३१ वर्षीय पाटिदार २०२१ पासून बेंगळुरू संघामधून खेळत आहे. त्याने बेंगळुरूकडून आतापर्यंत २७ सामन्यांमध्ये १५८.८५ च्या स्ट्राइकरेटने ७९९ धावा केल्या आहेत. त्याने बेंगळुरूकडून १ शतक आणि ७ अर्धशतकेही लगावली आहेत. आयपीएलमध्ये बेंगळुरूचे नेतृत्व करणारा पाटिदार हा आठवा कर्णधार ठरणार आहे. “रजतच्या शांतपणे विचार करण्याच्या वृत्तीमुळे तो आयपीएलसारख्या स्पर्धेत कर्णधार म्हणून उपयुक्त ठरेल. तणाव चांगल्या पद्धतीने हाताळता येणे ही आयपीएलमध्ये महत्त्वाची गोष्ट ठरते. त्याला यापूर्वी सईद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये मध्य प्रदेश संघाचे कर्णधारपद भूषवताना आम्ही पाहिले आहे. हा अनुभव त्याच्यासाठी आयपीएलमध्ये मोलाचा सिद्ध होईल,” असे प्रशिक्षक फ्लॉवर म्हणाले. (RCB Captain)
बेंगळुरूच्या कर्णधारपदासाठी विराट कोहलीच्या नावाचाही विचार संघव्यवस्थापनातर्फे करण्यात आल्याचे यावेळी बोबट यांनी सांगितले. बेंगळुरूचे फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिक यांच्याशीही आम्ही कर्णधारपदाबाबत चर्चा केली. विराटशीही आम्ही सविस्तर चर्चा केली. सर्व बाबींचा विचार केल्यानंतर एकमताने आम्ही रजतकडे नेतृत्व सोपवण्याच्या निर्णयाप्रत आलो, असे बोबट म्हणाले. यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट मोसमात पाटिदारने मध्य प्रदेशकडून कर्णधारास साजेशी कामगिरी केली होती. त्याने मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत ९ डावांत ६१.१४च्या सरासरीने ४२८, तर विजय हजारे स्पर्धेत ५६.५०च्या सरासरीने २२६ धावा फटकावल्या. (RCB Captain)
यापूर्वी, विराट आणि प्लेसिसबरोबरच राहुल द्रविड, केविन पीटरसन, अनिल कुंबळे, डॅनिएल व्हिट्टोरी, शेन वॉटसन यांनी आयपीएलमध्ये बेंगळुरूचे कर्णधारपद भूषवले आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेस २१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. (RCB Captain)

हेही वाचा :

कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी होणार

भारताचा इंग्लंडला ‘व्हाइटवॉश’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00