कोलकाता : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या मुंबईच्या मदतीला पुन्हा एकदा तळाचे फलंदाज धावून आले. शम्स मुलाणी व तनुष कोटियनच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने हरियाणाविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या दिवसअखेर ८ बाद २७८ धावा केल्या. (Ranji Quarter Final)
रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना शनिवारपासून सुरुवात झाली. इडन गार्डन्सवर सुरू असलेल्या लढतीत मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु, हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला नाही. आघाडीचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाल्यामुळे तिसाव्या षटकामध्ये मुंबईची अवस्था ७ बाद ११३ अशी झाली होती. कर्णधार अजिंक्य रहाणेने ३१ धावा करून थोड्याफार प्रतिकाराचा प्रयत्न केला, परंतु त्याला दुसऱ्या बाजूने तोलामोलाची साथ लाभली नाही. या सामन्यासाठी मुंबई संघात परतलेला भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला केवळ ९ धावा करता आल्या. शिवम दुबेने ३२ चेंडूंमध्ये ४ चौकार व एका षटकारासह २८ धावा फटकावल्या. (Ranji Quarter Final)
मुंबईचा डाव दीडशे धावांमध्येच आटोपणार, असे वाटत असतानाच मुलाणी आणि कोटियन यांनी आठव्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी रचली. मुलाणीचे शतक मात्र अवघ्या ९ धावांनी हुकले. तो १७८ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ९१ धावा करून बाद झाला. त्यानंतर कोटियनने दिवसअखेरपर्यंत मोहित अवस्थीसोबत किल्ला लढवला. खेळ थांबला, तेव्हा कोटियन १५४ चेंडूंमध्ये ११ चौकारांसह ८५ धावांवर खेळत होता. हरियाणाकडून अंशुल कंबोजने ३, तर सुमीत कुमारने २ विकेट घेतल्या. (Ranji Quarter Final)
अन्य सामन्यांमध्ये, विदर्भाने तमिळनाडूविरुद्ध पहिल्या दिवशी पहिल्या डावामध्ये ६ बाद २६४ धावा केल्या. विदर्भाकडून करुण नायरने १८० चेंडूंमध्ये १४ चौकार व एका षटकारासह नाबाद १०० धावांची खेळी केली. त्याचे हे यंदाच्या रणजी मोसमातील तिसरे शतक ठरले. दानिश मलेवारने ११९ चेंडूंमध्ये १३ चौकारांसह ७५ धावा करून त्याला योग्य साथ दिली. तिसऱ्या सामन्यात जम्मू आणि काश्मीरने केरळविरुद्ध पहिल्या डावामध्ये ८ बाद २२८ धावा केल्या. चौथ्या सामन्यामध्ये, गुजरातने सौराष्ट्राचा पहिला डाव २१६ धावांत संपवून प्रत्युत्तरादाखल दिवसअखेरपर्यंत बिनबाद २१ धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : मुंबई – पहिला डाव ८१ षटकांत ८ बाद २७८ (शम्स मुलाणी ९१, तनुष कोटियन खेळत आहे ८५, अजिंक्य रहाणे ३१, अंशुल कंबोज ३-५८, सुमित कुमार २-५७) विरुद्ध हरियाणा.
हेही वाचा :