Home » Blog » Ranji Champions : विदर्भ तिसऱ्यांदा रणजी विजेता

Ranji Champions : विदर्भ तिसऱ्यांदा रणजी विजेता

केरळविरुद्ध पहिल्या डावातील आघाडी निर्णायक

by प्रतिनिधी
0 comments
Ranji Champions

नागपूर : विदर्भ संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यामध्ये यश मिळवले आहे. केरळविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राहिल्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भाला विजेता घोषित करण्यात आले. (Ranji Champions)

नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर हा सामना रंगला. या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये विदर्भाने ३७ धावांची आघाडी घेतल्यानंतर चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद २४९ धावा केल्या होत्या. त्याचवेळी सामना अनिर्णित राहणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. अखेरच्या दिवशी विदर्भाने सुमारे ५४ षटके खेळून काढत दुसऱ्या डावात ९ बाद ३७५ धावा करून आपली आघाडी चारशेपार नेली. त्यानंतर, सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. विदर्भाकडून दुसऱ्या डावात करुण नायरने शतक झळकावत २९५ चेंडूंमध्ये १० चौकार व २ षटकारांसह १३५ धावांची खेळी केली. तळातील दर्शन नळकांडेने ९८ चेंडूंमध्ये ३ चौकार व एका षटकारासह नाबाद ५१ धावा फटकावल्या. केरळकडून आदित्य सरवटेने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. (Ranji Champions)

अंतिम सामन्याच्या पहिल्या व दुसऱ्या डावात अनुक्रमे १५३ व ७३ धावा करणारा विदर्भाचा दानिश मालेवार सामनावीर ठरला. संपूर्ण स्पर्धेमध्ये ४७६ धावा आणि ६९ विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करणारा विदर्भाच्याच हर्ष दुबेला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला. विदर्भाने यापूर्वी २०१७-१८ आणि २०१८-१९ या सलग दोन मोसमांमध्ये रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. (Ranji Champions)

संक्षिप्त धावफलक : विदर्भ – पहिला डाव ३७९ आणि दुसरा डाव १४३.५ षटकांत ९ बाद ३७५ (करुण नायर १३५, दानिश मालेवार ७३, दर्शन नळकांडे नाबाद ५१, आदित्य सरवटे ४-९६, बासिल १-१८) अनिर्णित विरुद्ध केरळ – पहिला डाव ३४२.

हेही वाचा :

भारत साखळीत अपराजित

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00