वॉशिंग्टन : कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेटसाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हिसा रद्द करण्यात आला. त्यानंतर तिने अमेरिकेतून स्वत:हून बाहेर पडणे पसंत केले. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) तसे जाहीर केले. रंजनी श्रीनिवासन असे तिचे नाव आहे. अमेरिकन सरकारने तिच्यावर हमासला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. (Ranjani)
तसेच हमासच्या हिंसाचाराचे समर्थन केल्याचाही आरोप केला. ५ मार्च २०२५ रोजी रंजनीचा व्हिसा रद्द करण्यात आला. तिने ११ मार्च रोजी सीबीपी होम अॅप वापरून अमेरिकेतून स्वतःहून बाहेर पडणे पसंत केले. (Ranjani)
‘‘अमेरिकेत राहून शिक्षण घेणे हा विशेषाधिकार आहे. मात्र दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना तो दिला जाऊ नये. जेव्हा तुम्ही हिंसाचार आणि दहशतवादाचा पुरस्कार करता तेव्हा तो विशेषाधिकार रद्द केला पाहिजे. तुम्ही या देशात असता कामा नये. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांपैकी कोलंबिया विद्यापीठातील एकाने स्वतःहून देशांतर करण्यासाठी सीबीपी होम अॅप वापरल्याचे पाहून मला आनंद झाला,’’ अशी एक्स पोस्ट होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी केली आहे. (Ranjani)
- रंजनी श्रीनिवासन कोण आहे?
- रंजनी ही मूळ भारतीय आहे आणि कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेटची विद्यार्थिनी आहे.
- तिच्यावर हमासला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे.
- तिची शैक्षणिक कारकीर्द उत्तम आहे आणि ती फुलब्राइट स्कॉलर आहे.
- तिने कोलंबिया विद्यापीठातून शहरी नियोजनात एम.फिल, हार्वर्ड विद्यापीठातून डिझाइनमध्ये मास्टर्स आणि भारतातील सीईपीटी विद्यापीठातून डिझाइनमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे. (Ranjani) तिचे संशोधन भारतीय शहरांच्या उपनगरीय भागातील जमीन-कामगार संबंध, राजकीय अर्थव्यवस्था आणि स्थानिक राजकारण यावर आहे.
- व्हिसा का रद्द करण्यात आला?
- हमासला पाठिंबा देऊन हिंसाचार आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप अमेरिकन सरकारने रंजनीवर केला.
- ५ मार्च २०२५ रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तिचा व्हिसा ‘सुरक्षा कारणा’ मुळे रद्द केला.
- अमेरिकेत पॅलेस्टिनी समर्थक कार्यात सहभागी असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांवरील व्यापक कारवाईचा हा एक भाग आहे.
- वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी रहिवासी असलेल्या लेका कोरडिया या आणखी एका विद्यार्थिनीला तिच्या व्हिसाची मुदत संपल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी २०२४ मध्ये कोलंबिया विद्यापीठातील निदर्शनांमध्ये भाग घेतल्याबद्दल तिला ताब्यात घेण्यात आले होते.
- तसेच, ग्रीन कार्डधारक असलेल्या कोलंबिया विद्यापीठातील पदवीधर महमूद खलीलची अटक आणि संभाव्य हद्दपारीमुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. यामुळे अमेरिकेतील ग्रीन कार्डधारकांच्या हक्कांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. (Ranjani)
- सरकारच्या धोरणांशी जुळवून घेण्यात अयशस्वी होणारी महाविद्यालये सरकारचा निधी गमावू शकतात, असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. यहुदी-विरोधी मतभेदांना तोंड देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करून प्रशासनाने विद्यापीठांचे ४०० दशलक्ष डॉलरचे अनुदान रद्द केले आहे.
सेल्फ-डिपोर्टेशन म्हणजे काय?
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात स्थलांतरितांच्या प्रवेश आणि निर्गमन प्रक्रियेसाठी ‘सीबीपी वन’ नावाचे ॲप विकसित करण्यात आले होते. त्याचे स्वरूप बदलून ट्रम्प प्रशासनाने सीबीपी होम हे ॲप विकसित केले आहे. या ॲपअंतर्गत स्थलांतरितांना सरकारने औपचारिकरित्या देशाबाहेर काढण्याऐवजी स्वत:हून स्वेच्छेने देशाबाहेर जाण्याचा पर्याय निवडता येतो. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर विविध कारणांनी स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याचा कार्यक्रम प्रशासनाने हाती घेतला. सीबीपी ॲपमुळे अटक व अमेरिकन छावणीमधील वास्तव्य टाळून थेट देशाबाहेर जाण्याचा पर्याय स्थलांतरितांना उपलब्ध आहे. आपणास अमेरिकेतून बाहेर पडण्याची इच्छा असून त्यासाठी पुरेसा पैसा आणि मूळ देशाचा वैध पासपोर्ट असल्याचे घोषणापत्र ॲपवर स्थलांतरितांना द्यावे लागते. त्यानंतर, इमिग्रेशन न्यायाधीश संबंधित स्थलांतरितांनी देशाबाहेर जाण्यासंबंधीचा निर्णय देतात.
हेही वाचा :
सुनीता विल्यम्सना आणण्यासाठी ड्रॅगन झेपावले
‘इसिस’चा म्होरक्या ठार