नवी दिल्ली : तब्बल एक महिन्याच्या उपवासानंतर सोमवारी (३१ मार्च) देशभर ईद साजरी करण्यात आली. ईदच्या विशेष नमाज पठणात हजारो मुस्लिमांनी एकत्रित नमाज पठण करुन परमेश्वराचे चिंतन केले. दिल्लीत जामा मशिदीसह देशभरातील मोठ्या शहरात, गावागावातील मशिदी आणि ईदगाहवर नमाज पठण झाले. दिवसभर ईदच्या शुभेच्छा देताना शीर खुर्मा, बिर्याणीची दावत आयोजित करण्यात आली होती. (Ramjan Eid)
रमजान हा मुस्लीमांच्या पवित्र महिना असतो. या महिन्यात महिनाभर कडक उपवास केला जातो. दोन मार्चला रमजान महिन्यास सुरुवात झाली. काल रविवारी चंद्र दर्शनानंतर सोमवारी (३१ मार्च) देशभर रमजान ईद साजरी करण्यात आली. गेले आठवडाभर ईद साजरी करण्यासाठी नवीन कपडे, खिरीचे साहित्य खरेदीसाठी मुस्लिम भाविकांनी मोठी गर्दी होती. बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली. सोमवारी सकाळी नवीन कपडे घालून मुस्लिम बांधव नमाज पठणास गेले. एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. (Ramjan Eid)
या ईदला मिठी ईदही म्हटले जाते. कारण घरोघरी पक्वानांची रेलचेल असते. नातलग आणि मित्रमंडळींच्या घरी शीर खुर्माचे वाटप करण्यात आले. शीर खुर्माचा आस्वाद घेण्यासाठी अनेकांना आमंत्रणही देण्यात आले. खाण्यापिण्यातून प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. गरीब आणि गरजूंना मदत करण्यात आली. (Ramjan Eid)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शुभेच्छा
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “ईद-उल-फित्रच्या शुभ प्रसंगी, मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना, विशेषतः मुस्लिम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देतो.ईद-उल-फित्र हा पवित्र रमजान महिन्यातील उपवास आणि नमाज संपवण्याचा दिवस आहे. हा सण बंधूता, सहकार्य आणि करुणेची भावना मजबूत करतो. हा सण सामाजिक बंधनाला प्रोत्साहन देतो आणि आपल्याला एक सुसंवादी, शांत आणि समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी प्रेरित करतो. ईद ही सहानुभूती, करुणा आणि दानधर्माच्या भावनेला प्रोत्साहन देण्याचा एक प्रसंग आहे. हा सण सर्वांच्या आयुष्यात शांती, प्रगती आणि आनंद घेऊन येवो आणि सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जाण्यासाठी आपल्याला बळ देवो.” (Ramjan Eid)
कोल्हापूरात ईदनिमित्त मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर नमाज पठण
कोल्हापूर शहरात दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर सामूहिक नमाज पठण झाले. यावेळी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू छत्रपती, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, शिवसेना उप नेते विजय देवणे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कनेशकर, डॉ. प्रमोद बुलबुले उपस्थित होते. दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष अदिल फरास, संचालक पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, जहांगीर अत्तार, रफीक शेख, फारुक पटवेगार, रियाज सुभेदार, बापूसो मुल्ला, नसिर धारवाडकर आदी उपस्थसित होते. (Ramjan Eid)
हेही वाचा :
देशातील थोर संतांनी राष्ट्रीय विचार जिवंत ठेवले